ग्रामीण विकास मंत्रालय
नववर्षानिमित्त केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी, कामगार आणि ‘लखपती दीदीं’ना शुभेच्छा दिल्या
गावे, गरीब, शेतकरी, कामगार, युवक व महिलांना सक्षम करून ‘विकसित भारताची पायाभरणी करण्याचा निर्धार : शिवराज सिंह
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2025 2:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2025
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देशवासियांना, विशेषतः शेतकरी, कामगार, श्रमिक बंधू-भगिनी आणि ‘लखपती दीदीं’सह महिलांना नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार गावे, गरीब, शेतकरी, कामगार, युवक आणि महिलांना सक्षम करून ‘विकसित भारत’ची भक्कम पायाभरणी करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
चौहान यांनी आपल्या नववर्ष संदेशात म्हटले की, येत्या वर्षात कृषी उत्पादन वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वृद्धिंगत करण्यासाठी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठीच्या प्रयत्नांना अधिक वेग दिला जाईल. शेतकरी हे राष्ट्राचे अन्नदाता आहेत, तर कामगार आणि श्रमिक हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, त्यामुळे त्यांची समृद्धी हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, यावर चौहान यांनी भर दिला.
‘लखपती दीदी’ मोहिमेसारख्या उपक्रमांचा उल्लेख करताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, स्वयं-सहायता गटांशी जोडलेल्या ग्रामीण महिलांना कौशल्य प्रशिक्षण, परवडणारे कर्ज आणि बाजारपेठेशी जोडणी उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यांनी असेही म्हटले की या उपक्रमाचा हेतू प्रत्येक गावात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कुटुंबे निर्माण करण्याचा आहे आणि आजपर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक ‘लखपती दीदी’ स्वावलंबी होत असून इतर महिलांसाठी प्रेरणास्थान बनत आहेत.
नववर्षात ग्रामीण विकास अधिक सक्षम करण्यासाठी रस्ते संपर्क, वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, डिजिटल संपर्क आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच सुधारण्यावर विशेष भर देण्यात येईल, असे चौहान यांनी सांगितले. या उपक्रमांमुळे ग्रामीण विकासाला गती मिळेल आणि गावांमधील जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘विकसित भारत – जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून कामगारांसाठी रोजगाराच्या संधी विस्तारल्या जातील, तसेच महिला आणि शेतकऱ्यांना एकाच वेळी सक्षम केले जाईल, असे चौहान यांनी आपल्या संदेशात सांगितले. या योजनेमुळे ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल आणि गावकरी केवळ लाभार्थी न राहता विकास प्रक्रियेतील सक्रिय भागीदार बनतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
चौहान यांनी सर्व शेतकरी, कामगार, मजूर, भगिनी, युवक आणि ‘लखपती दीदी’ बनण्याच्या मार्गावर आगेकूच करणाऱ्या महिलांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वसमावेशक वाढ आणि शाश्वत विकास यांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या हितासाठी सरकार नव्या आणि अर्थपूर्ण उपाययोजना करत राहील, असे चौहान यांनी आश्वासन दिले.
येत्या वर्षात सामूहिक प्रयत्नांमुळे ग्रामीण भारत अधिक सक्षम होईल आणि स्वावलंबी, समृद्ध व विकसित राष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात साकार होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
निलिमा चितळे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210556)
आगंतुक पटल : 9