संरक्षण मंत्रालय
डीआरडीओने केली दोन प्रलय क्षेपणास्त्रांची एका मागोमाग एक यशस्वी चाचणी
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2025 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2025
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज 31डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता ओदिशाच्या किनारपट्टीवरून एकाच प्रक्षेपकावरून दोन 'प्रलय' क्षेपणास्त्रांची एकापाठोपाठ एक यशस्वी चाचणी केली. ही चाचणी वापरकर्त्यांच्या मूल्यमापन चाचण्यांचा एक भाग म्हणून घेण्यात आली. दोन्ही क्षेपणास्त्रांनी ठरवलेल्या मार्गावरून प्रवास करत सर्व उद्दिष्टे पूर्ण केली, ज्याची पुष्टी चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्राच्या ट्रॅकिंग सेन्सर्सनी केली आहे. त्या ठिकाणाजवळ तैनात असलेल्या जहाजावरील टेलिमेट्री प्रणालीनेही याची पुष्टी केली.
प्रलय' हे स्वदेशी बनावटीचे, घन इंधन वापरणारे क्वासी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून, अचूकतेसाठी यामध्ये अत्याधुनिक मार्गदर्शक आणि दिशादर्शक प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र विविध लक्ष्यांवर मारा करण्यासाठी अनेक प्रकारची स्फोटक सामग्री वाहून नेण्यासाठी सक्षम आहे.
443D.jpeg)
या क्षेपणास्त्राची निर्मिती हैदराबादमधील 'रिसर्च सेंटर इमारात' ने डी.आर.डी.ओ. च्या इतर प्रयोगशाळा आणि विकास व उत्पादन भागीदार (भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) यांच्या सहकार्याने केली आहे. या चाचणीसाठी यंत्रणांचे एकत्रीकरण याच दोन भागीदार कंपन्यांनी केले होते. डी.आर.डी.ओ. चे वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराचे प्रतिनिधी तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डी.आर.डी.ओ, हवाई दल, लष्कर आणि उद्योगांचे अभिनंदन केले. या चाचणीमुळे प्रलय क्षेपणास्त्राची विश्वासार्हता सिद्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डी.आर.डी.ओ. चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी संबंधित पथकांचे अभिनंदन केले आणि सांगितले की, हे यश म्हणजे ही क्षेपणास्त्र प्रणाली आता लष्करात सामील होण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे निदर्शक आहे.
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210294)
आगंतुक पटल : 14