संरक्षण मंत्रालय
सशस्त्र दलांची क्षमता वृद्धींगत करण्यासाठी 79,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
29 DEC 2025 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 29 डिसेंबर 2025 रोजी संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक झाली. या बैठकीत तिन्ही दलांच्या सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या विविध खरेदी प्रस्तावांना आवश्यकतेची स्वीकृती (AoN) देण्यात आली. या बैठकीत भारतीय लष्करासाठी तोफखाना तुकडीसाठी लॉइटर म्युनिशन सिस्टम, कमी उंचीवरील हलक्या वजनाचे रडार, पीनाका या बहु प्रक्षेपक रॉकेट प्रणालीसाठी लांब पल्ल्याचा मार्गदर्शित रॉकेट दारुगोळा तसेच एकात्मिक ड्रोन वेधक नाशक प्रणाली Mk-II च्या खरेदीला मंजुरी देण्यात आली.
लॉइटर म्युनिशनचा वापर लष्करी लक्ष्यांवर अचूक मारा करण्यासाठी केला जाईल, तर कमी उंचीवरील हलके रडार हे लहान आकाराच्या आणि कमी उंचीवर उडणाऱ्या मानवरहित हवाई यंत्रणांचा शोध घेतील. लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटमुळे पिनाका प्रणालीच्या पल्ल्याची व्याप्ती आणि अचूकता वाढणार असून, याद्वारे महत्त्वाच्या लक्ष्यांवर प्रभावी मारा करणे शक्य होणार आहे. तसेच, अधिक पल्ला असलेल्या एकात्मिक ड्रोन वेधक नाशक प्रणाली Mk-II मुळे युद्धभूमी आणि अंतर्गत भागातील भारतीय लष्कराच्या महत्त्वाच्या मालमत्तांचे रक्षण करता येणार आहे.
भारतीय नौदलासाठी बोलार्ड पुल टग्ज, सॉफ्टवेअर चलीत उच्च ध्वनीलहरींचे रेडिओ मॅनपॅक यांची खरेदी आणि अति उंचावरील लांब पल्ल्याची विमान प्रणाली भाडेतत्त्वावर घेण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बोलार्ड पुल टग्ज बंदरात नौदलाच्या जहाजांचे आणि पाणबुड्यांचे नांगर टाकण्यासाठी तसेच ये जा करण्यासाठी मदतीचे ठरणार आहेत. सॉफ्टवेअर चलीत उच्च ध्वनीलहरींच्या रेडिओ मॅनपॅकमुळे मोहिमांदरम्यान लांब पल्ल्याचा सुरक्षित संवाद करता येणार आहे, तर उंचावरील लांब पल्ल्याच्या विमान प्रणालीमुळे हिंदी महासागर क्षेत्रात सतत देखरेख ठेवणे आणि सागरी क्षेत्राची नेमकी माहिती मिळत राहील याची सुनिश्चिती होणार आहे.
भारतीय हवाई दलासाठी स्वयंचलित टेक-ऑफ लँडिंग रेकॉर्डिंग प्रणाली, अस्त्र Mk-II क्षेपणास्त्रे, फुल मिशन सिम्युलेटर आणि स्पाइस-1000 या लांब पल्ल्याच्या मार्गदर्शक संचाच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. स्वयंचलित टेक-ऑफ लँडिंग रेकॉर्डिंग प्रणालीमुळे कोणत्याही हवामानात विमानांच्या उड्डाणाचे आणि उतरण्याचे उच्च गुणवत्तेचे चित्रिकरण उपलब्ध होईल. यामुळे हवाई सुरक्षेला अधिक बळकटी मिळेल. दूरवरचा पल्ला असलेल्या अस्त्र Mk-II या क्षेपणास्त्रांमुळे शत्रूची विमाने लांब अंतरावरूनच नष्ट करण्याची लढाऊ विमानांची क्षमता वाढणार आहे. फुल मिशन सिम्युलेटरमुळे तेजस या हलक्या लढाऊ विमानासाठी वैमानिकांचे प्रशिक्षण अधिक सुरक्षित वातावरणात आणि किफायतशीर खर्चात होऊ शकणार आहे, तर स्पाइस-1000 मुळे हवाई दलाची लांब पल्ल्याच्या अचूक माऱ्याची क्षमता अधिक विस्तारणार आहे.
* * *
निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209494)
आगंतुक पटल : 36