सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 23 डिसेंबर, 2025 रोजी जीडीपी, सीपीआय आणि आयआयपीच्या आधारभूत वर्षाच्या सुधारणेवर प्रकाशनपूर्व सल्लागार कार्यशाळेचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 23 DEC 2025 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 23 डिसेंबर, 2025 रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी), ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) यांच्या आधारभूत वर्षाच्या पुनरावलोकनावर दुसरी प्रकाशनपूर्व सल्लागार कार्यशाळा आयोजित केली. 

कार्यशाळेचा मुख्य उद्देश सहभागींसोबत प्रस्तावित पद्धतशीर आणि संरचनात्मक सुधारणा सामायिक करून, जीडीपी, सीपीआय आणि आयआयपीच्या सुधारित मालिका प्रसिद्ध करण्यापूर्वी पारदर्शकता वाढवणे, माहितीपूर्ण संवादाला चालना देणे आणि व्यापक सल्लामसलत सुनिश्चित करणे हा होता. राष्ट्रीय लेखा आणि आयआयपीच्या नवीन मालिका, ज्यांचे आधारभूत वर्ष 2022-23 आहे, अनुक्रमे 27 फेब्रुवारी 2026 आणि 28 मे 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहेत, तर आधारभूत वर्ष 2024असलेल्या सीपीआयची नवीन मालिका 12 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांच्यासह इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यशाळेत प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, वित्तीय संस्था आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, विषय-तज्ज्ञ, प्रमुख सांख्यिकीचे  वापरकर्ते आणि केंद्र व राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी यांसारखे विविध क्षेत्रांतील सहभागी एकत्र आले होते.

आपल्या उद्घाटनपर भाषणात, नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुमन के. बेरी यांनी मंत्रालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या आकडेवारीच्या विश्वासार्हतेशी आणि वैधतेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध डेटा वापरकर्ते आणि भागधारकांशी संवाद साधण्याच्या महत्त्वावर भर दिला.  प्रकाशनपूर्व सल्लागार कार्यशाळा हे त्या दिशेने एक स्वागतार्ह पाऊल असल्याचे,ते म्हणाले.  देश अल्प ते मध्यम मुदतीत उच्च-मध्यम उत्पन्न गटातील देशाकडे वाटचाल करत असल्याने, या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी अचूक आकडेवारीची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग यांनी आपल्या भाषणात, 'विकसित भारत 2047' चे ध्येय साध्य करण्यासाठी डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. उद्घाटन सत्रानंतर तीन तांत्रिक सत्रे झाली. यात राष्ट्रीय लेखा, ग्राहक किंमत निर्देशांक  आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक  या प्रत्येकावर एक सत्र होते.  यावेळी सुधारित मालिकेतील प्रस्तावित सुधारणा सादर करण्यात आल्या. नवीन मालिकेतील प्रस्तावित सुधारणा डिस्कशन पेपर्सच्या स्वरूपात मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (www.mospi.gov.in) उपलब्ध आहेत. राष्ट्रीय लेखा, सीपीआय आणि आयआयपी डेटाचे वापरकर्ते प्रस्तावित बदलांवर आपला अभिप्राय/टिप्पण्या/सूचना मंत्रालयासोबत सामायिक करू शकतात.

 

* * *

निलिमा चितळे/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2207961) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी