वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत ओमान मुक्त व्यापार करारामुळे महत्त्वाच्या क्षेत्रातील नव्या संधी खुल्या होतील – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
प्रविष्टि तिथि:
17 DEC 2025 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025
भारत आणि ओमान यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, वाहन, मौल्यवान रत्ने व दागिने, कृषीरसायने, नवीकरणीय उर्जा आणि वाहनांचे सुटे भाग यासह विविध क्षेत्रात अनेक संधी खुल्या होतील. मस्कत इथे आज भारत ओमान व्यवसाय मंचावर केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हे विधान केले. भौगोलिक स्थानामुळे ओमान हा देश आखाती सहकार्य महामंडळ, पूर्व युरोप, मध्य आशिया व अफ्रिका यांचे प्रवेशद्वार असल्याचे अधोरेखित करुन भारतीय उद्योगांसाठी यामुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचे गोयल म्हणाले.
ओमानचे वाणिज्य, उद्योग व गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस अल युसूफ आपल्या भाषणात म्हणाले की, भारत ओमानचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे आणि विविध क्षेत्रातील भारतीय गुंतवणुकीसाठी ओमान हे एक प्रमुख ठिकाण भविष्यातही असेल. 2020 पासून भारताची ओमानमधील गुंतवणूक तिप्पट म्हणजेच 500 कोटी अमेरिकी डॉलर्स झाली आहे. ही गुंतवणूक हरित पोलाद, हरित अमोनिया, ऍल्युमिनियम उत्पादन व लॉजिस्टीक्स अशा व्यापक क्षेत्रांमध्ये झाली आहे असे त्यांनी सांगितले. या गुंतवणुकीतून ओमान हा दीर्घकालिन व्यापार तळ असल्याबद्दलचा भारताचा विश्वास प्रतिबिंबित होतो असे युसूफ म्हणाले.
दोन्ही देशांमधील आगामी मुक्त व्यापार करार द्विपक्षीय संबंधांमधील मैलाचा दगड ठरेल असे अधोरेखित करुन, ओमानचा गेल्या सुमारे वीस वर्षांमधील हा पहिला मुक्त व्यापार करार असल्याचे गोयल यांनी नमूद केले. दोन्ही देशांमधल्या कित्येक शतकांपासून चालत आलेल्या सागरी व्यापार संबंधांना त्यांनी उजाळा दिला. भारत ओमान व्यापारी संबंधांचे स्वरुप सांगताना, लोथलसारख्या बंदरांवरुन होणाऱ्या ऐतिहासिक माल वाहतुकीचे उदाहरण त्यांनी दिले.
व्यावसायिक सेवा, आर्थिक व्यवहार, व्यवसाय प्रक्रिया पुनर्रचना, संशोधन व विकास, पर्यन, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या सेवा क्षेत्रातील सहकार्याची क्षमताही गोयल यांनी अधोरेखित केली.
युवा आधारित विकासावर दोन्ही देश भर देत असल्याचा संदर्भ देऊन मंत्री गोयल यांनी भारताच्या विकसित भारत 2047 व ओमानच्या उद्दीष्ट 2040 मधील समानता अधोरेखित केली. दोन्ही देशांमधील युवा पिढीची उर्जा व उद्योजक वृत्ती दीर्घकालिन आर्थिक सहकार्याचा मजबूत पाया ठरेल असे ते म्हणाले.
विश्वास, समान इतिहास व परस्परपूरक सामर्थ्य यावर आधारित भारत ओमानमधील भागीदारी विकासाच्या एका नव्या पर्वाचा प्रारंभ करेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. विश्वासू भागीदार म्हणून एकमेकांसोबत काम करताना, दोन्ही देशांमधील व्यावसायिक या दृढ द्विपक्षीय संबंधांमुळे मिळणाऱ्या संधींचा पुरेपूर लाभ घेतील असे ते म्हणाले.
सुषमा काणे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2205481)
आगंतुक पटल : 23