आदिवासी विकास मंत्रालय
एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील नेतृत्व आणि प्रशासनाला बळकटी देण्यासाठी दोन दिवसीय मुख्याध्यापक परिषदेचे नेस्टस् कडून आयोजन
एनईपी आधारित सुधारणा, प्रमुख पुढाकार आणि सर्वोत्तम पद्धतीविषयी ईएमआरएस मुख्याध्यापकांना प्रशिक्षित करण्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रम
प्रविष्टि तिथि:
14 DEC 2025 6:07PM by PIB Mumbai
आदिवासी विद्यार्थी राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हणजेच नेस्टस् (NESTS)ने दिल्लीच्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (डीएआयसी) येथे दोन दिवसीय मुख्याध्यापक परिषदेचे आयोजन 16-17 डिसेंबरला केले आहे. देशभरातील एकलव्य आदर्श निवासी शाळांच्या (EMRSs) मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक, व्यवस्थापकीय, आर्थिक आणि नेतृत्व क्षमता बांधणीला बळकटी देण्याच्या उद्देशाने क्षमता बांधणीतील पुढाकार म्हणून परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
एकलव्य आदर्श निवासी शाळांचे (EMRSs) 499 मुख्याध्यापक या परिषदेत एकत्रित येणार असून, एनईएसटीएसच्या वेगाने होणाऱ्या विस्तारीकरणाच्या आणि शाळा व्यवस्थापनातील वाढत्या गुंतागुतींच्या पार्श्वभूमीवर शालेय नेतृत्व सक्षम करण्यावर एनईएसटीएसचा असलेला भर दिसून येईल. या कार्यक्रमाद्वारे, मुख्याध्यापकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) आणि एनईएसटीच्या धोरणात्मक प्राधान्याशी सुसंगत अद्ययावत ज्ञान, कार्यपद्धतीबाबत स्पष्टता आणि नेतृत्व क्षमतांनी सुसज्ज करण्यासाठी या कार्यक्रमाची आखणी केली आहे.
ईएमआरएसमध्ये राबवले जात असलेले, चालू प्रकल्प, प्रमुख पुढाकार आणि भागीदारांच्या सहकार्याने राबवत असलेल्या कार्यक्रमांची माहिती मुख्याध्यापकांना देणे ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. शाळा नेतृत्वाला या उपक्रमांचे उद्दिष्ट, महत्त्व आणि अपेक्षित परिणाम यांची स्पष्ट कल्पना असावी, जेणेकरून तळागाळातील पातळीवर वेळेवर, परिणामकारकरित्या आणि एकसमान अंमलबजावणी करता येईल, हे सुनिश्चित करणे हा या मागील उद्देश आहे.
एनईएसटीएसकडून, राष्ट्रीय संस्था आणि तज्ज्ञ संघटनांच्या सहकार्याने, हाती घेण्यात आलेल्या शैक्षणिक, डिजिटल, सांस्कृतिक, आरोग्य आणि क्षमता बांधणी पुढकारांबाबत मुख्याध्यापकांमध्ये आढळलेल्या माहितीच्या कमतरतेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न परिषदेचा असेल.
या विचारमंथनात शैक्षणिक आणि विद्यार्थी-केंद्रित विषयांची विस्तृत व्याप्ती समाविष्ट असेल. शैक्षणिक सुधारणा, सीबीएसईची दोन-परीक्षा प्रणाली, धडानियोजन, वर्गातील प्रक्रिया, विद्यार्थ्यांच्या अध्ययन परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या रणनीती, मानसिक आरोग्य आणि भावनिक कल्याण, तलाश (टीएएलएएसएच), भारत स्काऊट अँड गाईड, कौशल्य, भाषा प्रावीण्य तसेच वंचित विद्यार्थ्यांना सहाय्य देण्यासाठीच्या संरचित यंत्रणा यांचा यामध्ये समावेश असेल.
प्रशासकीय आणि मनुष्यबळाशी संबंधित विषयांवरही सविस्तर चर्चा केली जाईल. यामध्ये एपीएआर, परीविक्षा कालावधी मंजुरी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (एनपीएस), सुरक्षा उपाययोजना आणि शाळेच्या कामगिरीचा आढावा यांचा समावेश असेल. याशिवाय, आर्थिक साक्षरता, शासकीय ई-मार्केटप्लेस (जेम) कार्यपद्धती, खरेदी प्रणाली, पायाभूत सुविधांची देखभाल तसेच बांधकाम संस्थांकडून इमारती ताब्यात घेण्याच्या कार्यपद्धती यावरील सत्रांमुळे प्राचार्यांना आर्थिक आणि पायाभूत प्रशासकीय व्यवस्थापनाबाबत अधिक स्पष्टता मिळेल.
एनइएसटीएस -नेस्ट्सचे वरिष्ठ अधिकारी, सीबीएसईचे विषयतज्ज्ञ, युनिसेफचे प्रतिनिधी आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञ या सत्रांचे नेतृत्व करतील. ते शाळा व्यवस्थापनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन, तांत्रिक माहिती आणि व्यवहार्य उपाय सुचवतील. चर्चासत्रे, प्रश्नोत्तर सत्रे आणि समवयीन अध्ययन मंचांच्या माध्यमातून परिषदेचा परस्परसंवादी घटक अधिक बळकट केला जाईल. यामुळे प्राचार्यांना प्रत्यक्ष अनुभव मांडता येतील, अडचणी मांडता येतील आणि सामूहिकरीत्या आव्हाने व उपाय ओळखता येतील.
प्राचार्य, धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि भागीदार संस्था यांच्यात थेट संवाद साधून, या परिषदेच्या माध्यमातून नेतृत्वासाठीची तयारी वाढवणे, जबाबदारीची जाणीव बळकट करणे, सर्वोत्तम कार्यपद्धतींचे मानकीकरण प्रोत्साहित करणे आणि ईएमआरएसमध्ये नियामक चौकटींचे सातत्यपूर्ण पालन सुनिश्चित करणे अपेक्षित आहे.
प्राचार्य परिषद ही नेस्ट्सची सातत्यपूर्ण क्षमता-विकास, गुणवत्तावृद्धी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाविषयीची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करते. या कार्यक्रमामुळे प्राचार्यांना अधिक दूरदृष्टी, आत्मविश्वास आणि प्रशासकीय कार्यक्षमता प्राप्त होऊन ते आपल्या संस्थांचे प्रभावी नेतृत्व करू शकतील. परिणामी, उत्तम अध्ययन परिणामांसह सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध शैक्षणिक वातावरण सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा आहे.
***
शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी साने/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2203805)
आगंतुक पटल : 13