कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रतिभेला कौशल्याची जोड देण्यासाठी उद्योग-सरकार यांच्यातील सहकार्याला चालना’ या विषयावर मुंबईत उच्च-स्तरीय उद्योग संवादाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
13 DEC 2025 8:43PM by PIB Mumbai
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि भारतीय उद्योग महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबईतील ताज महाल पॅलेस येथे ‘प्रतिभेला कौशल्याची जोड देण्यासाठी उद्योग-सरकार यांच्यातील सहकार्याला चालना’ या विषयावर उच्चस्तरीय उद्योग संवाद आयोजित करण्यात आला. कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी या संवादाचे अध्यक्षस्थान भूषविले. या बैठकीत उद्योगाशी सुसंगत कौशल्य प्रशिक्षण रचना अधिक सक्षम करण्यावर आणि रोजगार क्षमतेत सुधारणा करण्यावर चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेत शिक्षण, आरोग्य, आदरातिथ्य, बँकिंग आणि उत्पादन क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि प्रतिनिधींनी सहभाग घेतला. उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ नेतृत्वाने या संवादात सक्रीय सहभाग नोंदवला.
उपस्थितांना संबोधित करताना जयंत चौधरी यांनी सांगितले की भारत सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे, जिथे वेगवान तांत्रिक बदल, कामकाजाच्या पद्धतींमधील रूपांतरे आणि लोकसंख्येतील बदल यामुळे विविध क्षेत्रांतील कौशल्य-गरजा वेगाने बदलत आहेत. मोठ्या प्रमाणावर युवा लोकसंख्या उपलब्ध असतानाही उद्योगांना उपयुक्त मनुष्यबळ मिळण्यात येणाऱ्या अडचणी, हे कौशल्य विसंगतीचे स्पष्ट उदाहरण असून, यासाठी अधिक सखोल आणि संरचित उद्योग–शासन सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंत्र्यांनी उत्कृष्टता केंद्रांसाठी एक सुसंगत राष्ट्रीय चौकट उभारण्याची सरकारची भूमिका स्पष्ट केली. या चौकटीचा भर प्रगत कौशल्ये, उद्योग सुसंगती आणि मोजता येणाऱ्या रोजगार परिणामांवर असेल, असे त्यांनी सांगितले. उत्कृष्टता केंद्रे ही उच्चस्तरीय कौशल्य प्रशिक्षण, प्रशिक्षक उत्कृष्टता आणि अभ्यासक्रम नवोन्मेषासाठी केंद्रबिंदू म्हणून विकसित केली जातील आणि ती थेट उद्योगांच्या गरजांशी जोडलेली असतील, असे त्यांनी अधोरेखित केले.
जयंत चौधरी यांनी सरकारच्या पीएम-सेतू मोहिमेचा उल्लेख करत, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करून त्यांना आकर्षक, आधुनिक आणि परिणामाभिमुख संस्था बनविण्याच्या दृष्टीने ही एक परिवर्तनकारी सुधारणा असल्याचे सांगितले. त्यांनी स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय केंद्रांची जागतिक रोजगार संधींसाठीची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली आणि उद्योग क्षेत्राने या केंद्रांच्या कार्यान्वयनात सक्रीय भागीदार व्हावे, असे आवाहन केले. ही केंद्रे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आणि परदेशी रोजगाराच्या संधींसाठी प्रवेशद्वार म्हणून कार्य करतील, असे त्यांनी नमूद केले.
मंत्र्यांनी मंत्रिमंडळाने अलीकडेच दिलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या कौशल्य प्रवेगक उपक्रमातील भारताच्या सहभागाच्या मंजुरीचा उल्लेख केला. या उपक्रमामुळे भारताची कौशल्य प्रणाली जागतिक सर्वोत्तम पद्धती आणि भविष्यातील मनुष्यबळ प्रवाहांशी अधिक सुसंगत होईल, असे त्यांनी सांगितले.
संवाद सत्रादरम्यान उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी भारतीय उद्योग महासंघ आणि मंत्र्यांसोबत विचारांची देवाणघेवाण केली. उद्योग क्षेत्र सरकारच्या भागीदारीसह कौशल्य विकासासाठी कसा अधिक प्रभावीपणे योगदान देऊ शकतो, यावर चर्चा झाली. उद्योग सुसंगत प्रशिक्षण कार्यक्रम आणि मजबूत रोजगार जोडणीमुळे प्रशिक्षणार्थींची नोंदणी आणि रोजगार संधी लक्षणीयरीत्या वाढू शकतात, असे तज्ज्ञांनी नमूद केले.
या चर्चांमध्ये उद्योगांच्या नेतृत्वाखालील कौशल्य मॉडेल बळकट करणे, प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण, प्रशिक्षणार्थींसाठी संधींचा विस्तार आणि श्रम बाजाराच्या गरजांना जलद प्रतिसाद देण्यावर भर देण्यात आला. सरकार आणि उद्योग यांच्यातील सातत्यपूर्ण सहकार्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला आणि जागतिक स्पर्धात्मकतेला पूरक असे कुशल, आत्मविश्वासपूर्ण आणि भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ तयार होईल, यावर सर्व सहभागींचे एकमत झाले.





***
माधुरी पांगे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2203641)
आगंतुक पटल : 15