इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीईआरटी-इन अर्थात भारतीय कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने परदेशी पत्रकारांसाठी केले भारताच्या सायबरसुरक्षा चौकटीसंदर्भात संवादाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 13 DEC 2025 9:34AM by PIB Mumbai

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) या संस्थेनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने 12 डिसेंबर 2025 रोजी युरोप, अमेरिका आणि मध्य आशियाई देशांमधील परदेशी पत्रकारांसाठी सायबर सुरक्षा परिचय भेट आणि संवादात्मक सत्राचे आयोजन केले.

नवी दिल्ली येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (मेइटी) महासंचालक, CERT-In आणि प्रमाणन प्राधिकरणाचे नियंत्रक  डॉ. संजय बहल यांनी या सत्राचे अध्यक्षस्थान भूषवले. मेइटीचे सहसचिव  कृष्ण कुमार सिंह यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले आणि 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'सह मंत्रालयाच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला.

डॉ. बहल यांनी सायबर सुरक्षा, संकट व्यवस्थापन, असुरक्षितपणाच्या जोखमीचे मूल्यांकन, माहितीची देवाणघेवाण, सायबर घटनांना समन्वयित प्रतिसाद, लेखापरीक्षकांचे पॅनेल आणि भारतातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये CERT-In ची भूमिका व जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या.CERT-In आपल्या संशोधन सहकार्यातून, सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून आणि आंतरराष्ट्रीय मंचांवरील सहभागातून 'डिजिटल इंडिया'च्या दृष्टिकोनानुसार एक मजबूत आणि विश्वासार्ह सायबर सुरक्षा संरचना तयार करत आहे.

CERT-In उदयास येत असलेल्या धोक्यांविरुद्ध संस्थांना आणि नागरिकांना अनावश्यक भीती न निर्माण करता, सक्रिय संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी वेळेवर सूचना  आणि योग्य स्वरुपातील सल्ला जारी करते, यावर डॉ. बहल यांनी  भर दिला.

400 हून अधिक स्टार्टअप्स आणि 6.5 लाखांहून अधिक कुशल व्यावसायिकांच्या जोरावर भारत एक जागतिक सायबर सुरक्षा केंद्र  म्हणून वेगाने उदयास येत आहे आणि हे व्यावसायिक 20 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या सायबर सुरक्षा उद्योगाला चालना देत आहेत यावर डॉ. बहल यांनी भर दिला.

ते म्हणाले की हे नवोन्मेषकर्ते जोखीम शोध, सायबर न्यायवैद्यकशास्त्र आणि एआय-आधारित निरीक्षण प्रणालींसाठी  प्रगत उपाययोजना तयार करत आहेत, ज्यामुळे सुरक्षित आणि लवचिक डिजिटल परिसंस्थेसाठी  भारताची बांधिलकी अधिक मजबूत होत आहे.

विकसित होत असलेल्या धोक्याच्या स्वरूपावर भर देऊन, डॉ. बहल यांनी असे निदर्शनाला आणले की आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता संरक्षण करणारे आणि हल्लेखोर अशा दोघांनाही सक्षम करण्याचे दुधारी तलवारीसारखे कार्य करते. CERT-In कशा प्रकारे एआय-आधारित विश्लेषणे  आणि ऑटोमेशनचा उपयोग करून सायबर घटनांना रिअल टाइममध्ये शोधते, प्रतिबंधित करते आणि प्रतिसाद देते, यावर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर, वाईट हेतूने एआयच्या मदतीने होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना  देखील विकसित करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

भारत भेटीसाठी आलेल्या पत्रकारांना CERT-In चे सातत्याने सुरू असलेले सराव, क्षमता-निर्माण उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याबद्दल माहिती देण्यात आली. CERT-In ने फ्रान्सच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सी  सोबत सहकार्य करून 'एआयमध्ये सायबर धोक्यांवर आधारित दृष्टिकोनातून विश्वास निर्माण करणेया शीर्षकाखाली एक संयुक्त उच्च-स्तरीय जोखीम विश्लेषण अहवाल प्रकाशित केला. CERT-In आंतरराष्ट्रीय भागीदार आणि जागतिक तसेच प्रादेशिक सायबर सुरक्षा मंचांसोबत संयुक्तपणे सराव आयोजित करते.भारतीय सहकारी बँकांमध्ये सायबर सुरक्षा लवचिकता मजबूत करण्याचा तसेच भारतीय नागरिकांच्या डिजिटल उपकरणांचे बॉट्स  आणि मालवेअरपासून संरक्षण करण्याचा CERT-In चा उपक्रम, जागतिक आर्थिक मंचाच्या 'जागतिक सायबर सुरक्षा दृष्टिकोन जानेवारी 2025' या अहवालात समाविष्ट होता. 2024 मध्ये भारतात 147 रॅन्समवेअर घटनांची नोंद झाली, परंतु रिअल-टाईम गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि फॉरेन्सिक हस्तक्षेपांद्वारे (forensic interventions) CERT-In च्या समन्वयित कृतींमुळे या घटनांचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला, असे डॉ. बहल यांनी नमूद केले.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) सहसचिव  कृष्ण कुमार सिंह यांनी इंडियाएआय मिशन, फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित होणारी एआय इम्पॅक्ट शिखर परिषद, स्वदेशी सायबर सुरक्षा उपायांचा विकास करणाऱ्या स्टार्टअप्सना धोरणात्मक पाठबळ, सायबर सुरक्षा संशोधन आणि विकास, तसेच MeitY च्या विविध राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम आणि प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.

या सत्राचा समारोप प्रश्नोत्तराच्या संवादात्मक सत्राने झाला, ज्यामध्ये या शिष्टमंडळाने सायबर गुन्हेविषयक घटनांचे निराकरण आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सीमापार सहकार्यावर  आपले विचार व्यक्त केले.

***

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2203425) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil