दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
संपूर्ण भारतात म्युच्युअल फंडांची व्याप्ती वाढवण्यासाठी टपाल विभाग आणि बीएसई यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2025 7:29PM by PIB Mumbai
देशभरात आर्थिक समावेशकता मजबूत करण्याच्या तसेच गुंतवणूक उत्पादनांपर्यंत पोहोच वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या टपाल विभाग (डीओपी) आणि आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज, बीएसई म्हणजेच मुंबई शेअर बाजार यांनी 12 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे एक ऐतिहासिक सामंजस्य करार केला.
हा उपक्रम 2025-26 च्या अर्थसंकल्पीय घोषणेशी सुसंगत आहे, ज्यामध्ये ग्रामीण आणि निम-शहरी भागात आर्थिक क्रियाकलापांसाठी उत्प्रेरक म्हणून इंडिया पोस्टच्या विशाल टपाल जाळ्याचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. देशभरात आपल्या व्यापक उपस्थितीसह, इंडिया पोस्ट आर्थिक पोहोच वाढविण्यात आणि समावेशक वाढ सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
या धोरणात्मक भागीदारीमुळे इंडिया पोस्टला आपल्या विशाल टपाल जाळ्याद्वारे म्युच्युअल फंड उत्पादनांचे वितरक म्हणून काम करण्यास सक्षम केले जाणार असून त्यामुळे ग्रामीण, अर्ध-शहरी आणि वंचित भागातील नागरिकांना लक्षणीय फायदा होऊ शकेल.
दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टपाल विभागाच्या महाव्यवस्थापक (सीसीएस आणि आरबी) मनीषा बन्सल बादल आणि बीएसईचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन राममूर्ती यांनी औपचारिकपणे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या करारांतर्गत निवडक टपाल कर्मचाऱ्यांना म्युच्युअल फंड वितरक म्हणून प्रशिक्षित आणि प्रमाणित केले जाईल, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांना सेवा प्रदान करू शकतील आणि बीएसई स्टार एमएफ प्लॅटफॉर्मद्वारे म्युच्युअल फंड व्यवहार सुलभ करू शकतील. हा सामंजस्य करार 12.12.2025 ते 11.12.2028 दरम्यान तीन वर्षांसाठी वैध असेल ज्यामध्ये नूतनीकरणाच्या तरतुदी असतील.
हे सहकार्य जनतेसाठी उपलब्ध असलेल्या वित्तीय सेवांची श्रेणी विस्तृत करण्यासाठी आणि देशभरातील सेवा वितरण मजबूत करण्यासाठीच्या टपाल विभागाच्या प्रयत्नांना अधोरेखित करते. या उपक्रमानुसार बीएसईच्या तंत्रज्ञान व्यासपीठाची इंडिया पोस्टच्या व्याप्तीशी सांगड घातल्याने सेवा सुलभता सुधारेल, गुंतवणूकदार जागरूकता वाढेल आणि औपचारिक वित्तीय बाजारपेठांमध्ये व्यापक सहभागाला पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे.
या उपक्रमाचा परिणाम
या भागीदारीमुळे श्रेणी -2, श्रेणी -3 आणि ग्रामीण भागात म्युच्युअल फंडांची व्याप्ती वाढेल, माहितीपूर्ण गुंतवणूक व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या जागरूक तसेच सक्षम लोकसंख्या निर्माण करण्याच्या भारताच्या व्यापक ध्येयामध्ये योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे.

Ms. Manisha Bansal Badal, General Manager (CCS & RB), Department of Posts,
and Shri Sundararaman Ramamurthy, MD & CEO, BSE
***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2203380)
आगंतुक पटल : 7