आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा चौथा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात संपन्न


स्थापना दिनानिमित कायाचिकित्सा आणि कौमारभृत्य पंचकर्म थिएटरसह आरोग्य मूल्यांकन स्क्रीनिंग आणि दंतरोग ओपीडीचा शुभारंभ

प्रविष्टि तिथि: 11 DEC 2025 7:20PM by PIB Mumbai

                                                         पणजी, 11 डिसेंबर 2025

केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (ए. आय. आय. ए)  आपल्या चौथ्या स्थापना दिनानिमित संस्थेच्या आवारात कोलोरेक्टल कार्सिनोमासाठी एकात्मिक प्रोटोकॉल या विषयावर कार्यशाळा आणि पत्रकार परिषद आयोजित केली. या परिषदेला संचालक वैद्य. पी. के. प्रजापती,  अधिष्ठाता डॉ. सुजाता कदम आणि उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक चाकोर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

स्थापना दिनानिमित संस्थेने सुरू केलेल्या कायाचिकित्सा आणि कौमारभृत्य पंचकर्म थिएटरसह आरोग्य मूल्यांकन स्क्रीनिंग आणि दंत ओपीडीचे उद्घाटन संचालक वैद्य. पी. के. प्रजापती यांच्या हस्ते करण्यात आले. आयपीडीच्या सेवा आणखी मजबूत करण्यात आले असल्याची भावना श्री प्रजापती यांनी व्यक्त केली.

डॉ. प्रजापती यांनी सांगितले की, एआयआयए गोवाने NABH मान्यता प्राप्त केली असून हे संस्थेसाठी अभिमानाचे यश आहे. गुणवत्तेचे उच्च मानक आणि रुग्णसुरक्षेप्रती संस्थेची निष्ठा या मान्यतेतून अधोरेखित होते. नवीन सुविधांच्या समावेशासह संस्था आता 25 बाह्यरुग्ण विभागांसह कार्यरत आहे. यामध्ये मानसरोग चिकित्सा, व्यसनमुक्ती, स्वस्थ रक्षण, मधुमेह ओपीडी, आपत्कालीन सेवा, क्रिटिकल केअर युनिट यांसारख्या बहुविद्याशाखीय सेवा उपलब्ध आहेत. तसेच 17–19 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या दुसऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या शिखर परिषदेत पारंपारिक औषधांच्या सुरक्षिततेवर आणि पुराव्यावर आधारित अश्वगंधा उत्पादनांच्या जागतिक मान्यतेवर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिषदेतून पारंपारिक, पूरक, एकात्मिक आणि स्वदेशी औषधपद्धतींच्या आरोग्य प्रणालींमध्ये शाश्वत एकात्मतेचा दशकभराचा रोडमॅप तयार होण्याची अपेक्षा आहे, असे डॉ प्रजापती यांनी सांगितले.

अधिष्ठाता डॉ. कदम यांनी सांगितले की, दररोज 800 हून अधिक बाह्यरुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. संस्था स्थापनेपासून आजपर्यन्त एकूण 5 लाख 25 हजारहून अधिक बाह्यरुग्ण, 31 हजारहून अधिक आंतररूग्ण,  77 हजार 200 पंचकर्म आणि 1 लाख 35 हजार रुग्णांनी रेडिओलॉजी आणि प्रयोगशाळेतील तपासण्या आदि सुविधांचा रुग्णांनी लाभ घेतला आहे.

वैद्यकीय पर्यटन (Medical Value Travel) उपक्रमांतर्गत 233 परदेशी बाह्यरुग्ण व 16 आंतररुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच संस्थेने गोवा राज्यात 40 हजार 400 आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये सर्वसाधारण, रोगनिदान, शालेय आरोग्य तपासणी आणि सुवर्णप्राशन शिबिरांचा समावेश आहे.

संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये 400 पदवीपूर्व विद्यार्थी, 49 पदव्युत्तर अभ्यासक आहेत आणि संस्थेत आयुर्वेद आहारतज्ञ व पंचकर्म तंत्रज्ञ अभ्यासक्रम चालवले जात आहे. संस्थेने गोवा पर्यटन विभाग, सीएसआयआर -राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी, गोवा राज्य जैवविविधता मंडळ, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्याशी मोठे सहकार्य करार केले आहेत, तसेच एकात्मिक कर्करोग उपचारांसाठी आरोग्य सेवा संचालनालय, गोवा सरकार आणि कर्करोग संशोधन आणि शिक्षणासाठी टाटा मेमोरियल सेंटर यांच्यासोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केला असल्याची माहिती डॉ कदम यांनी दिली.

पीयआयबी पणजी/ अंबादास यादव/ प्रिती मालंडकर

                                  

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

(रिलीज़ आईडी: 2202546) आगंतुक पटल : 33
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी