पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

छत्तीसगडमधील जगदलपूर येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 03 OCT 2023 1:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2023

 

जय जोहर!

छत्तीसगडचे राज्यपाल श्री. विश्वभूषण हरिचंदन जी, संसदेतील माझे दोन लोकप्रिय सहकारी, विधानसभेतील लोकप्रतिनिधी, खासदार, जिल्हा परिषदा, तालुका परिषदेतील प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो,

विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच साकार होईल जेव्हा प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक गाव विकसित होईल. या संकल्पाला बळकटी देण्यासाठी, आज, सुमारे 27,000 कोटी रुपयांच्या योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे. याबद्दल मी आपणा सर्वांचे आणि छत्तीसगडच्या जनतेचे हार्दिक अभिनंदन करतो.

माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,

भारताच्या विकासासाठी भौतिक, डिजिटल आणि सामाजिक पायाभूत सुविधा या देशाच्या भविष्यातील गरजांशी सुसंगत असाव्यात. म्हणूनच आपल्या सरकारने गेल्या नऊ वर्षांत पायाभूत सुविधांवरील खर्च अनेक पटीने वाढवला आहे. या वर्षी पायाभूत सुविधांवरील खर्च 10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे, जो पूर्वीपेक्षा 6 पट जास्त आहे.

मित्रांनो,

आज देशात बांधल्या जाणाऱ्या रेल्वे, रस्ते, विमानतळ, वीज प्रकल्प, वाहने, गरिबांसाठी घरे, शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांमध्ये पोलादाची भूमिका महत्त्वाची आहे. भारत पोलाद उत्पादनात आत्मनिर्भर व्हावा यासाठी गेल्या नऊ वर्षांत अनेक पावले उचलण्यात आली आहेत. पोलाद उत्पादक राज्य म्हणून छत्तीसगडला याचा मोठा फायदा होत आहे. याचाच एक भाग म्हणून, आज नागरनार येथे भारतातील सर्वात आधुनिक पोलाद प्रकल्पांपैकी एकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. येथे उत्पादित होणारे पोलाद भारताच्या ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी आणि वेगाने वाढणाऱ्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात मोठे योगदान देईल, परिणामी या क्षेत्रांना नवीन ऊर्जा मिळेल. बस्तरमध्ये उत्पादित होणारे पोलाद केवळ आपल्या सैन्याला बळकटी देणार नाही तर देशाच्या संरक्षण निर्यातीलाही चालना देईल. या पोलाद प्रकल्पामुळे बस्तर आणि परिसरातील सुमारे 50,000 तरुणांना रोजगार मिळेल. बस्तरसारख्या आकांक्षी जिल्ह्यांच्या विकासावर केंद्र सरकारचा भर आहे आणि या पोलाद प्रकल्पामुळे जिल्हा विकासाची गती लक्षणीयरीत्या वाढेल. या यशाबद्दल मी बस्तर आणि छत्तीसगडच्या तरुणांचे मनापासून अभिनंदन करतो.

मित्रांनो,

गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने संपर्क प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. छत्तीसगडला आर्थिक कॉरिडॉर आणि आधुनिक महामार्ग देखील मिळाले आहेत. छत्तीसगडसाठीचे रेल्वे अंदाजपत्रक 2014 पूर्वीच्या तुलनेत जवळपास 20 पटीने वाढवण्यात आले आहे. राज्यात सध्या अनेक मोठे रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनीही छत्तीसगडमधील ताडोकी या गावाला आतापर्यंत रेल्वेच्या नकाशावर स्थान मिळाले नव्हते. आज, ताडोकी’ला नवीन रेल्वे मार्गाची भेट मिळत आहे. यामुळे केवळ आदिवासी समुदायांनाच सुविधा मिळणार नाही तर शेती, वनीकरण आणि वन उत्पादनांची वाहतूक देखील सुलभ होईल. ताडोकी आता रायपूर-अंतगढ डेमू ट्रेनशी जोडले गेले आहे, ज्यामुळे छत्तीसगडची राजधानी रायपूरपर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे. जगदलपूर-दंतेवाडा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणामुळे प्रवास करणे सोपे होईल आणि उद्योगांना येणाऱ्या लॉजिस्टिक्स खर्चात कपात होईल. या सर्व रेल्वे प्रकल्पांमुळे या परिसरात अनेक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

मित्रांनो,

छत्तीसगडमध्ये रेल्वे ट्रॅकचे 100% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे हे पाहून मला आनंद होत आहे. यामुळे केवळ गाड्यांचा वेग वाढणार नाही तर छत्तीसगडमधील हवा स्वच्छ राहण्यासही हातभार लागेल. छत्तीसगडमधील रेल्वे नेटवर्कचे संपूर्ण विद्युतीकरण झाल्यानंतर, राज्यात वंदे भारत एक्सप्रेसही धावायला लागेल. 

मित्रांनो,

भारत सरकार नजीकच्या भविष्यात छत्तीसगडमधील रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करण्याची योजना आखत आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत राज्यातील 30 हून अधिक स्थानके नुतनीकरणासाठी निश्चित केली गेली आहेत आणि यापैकी सात स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी आधीच झाली आहे. बिलासपूर, रायपूर आणि दुर्ग स्थानकांव्यतिरिक्त, जगदलपूर स्थानकाचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. भविष्यात, जगदलपूर स्थानक शहराचे एक प्रमुख केंद्र बनेल, ज्यामध्ये प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा असतील. गेल्या नऊ वर्षांत, राज्यातील 120 हून अधिक स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा पुरवण्यात आली आहे.

मित्रांनो,

भारत सरकार छत्तीसगडमधील लोकांचे, प्रत्येक भगिनीचे, कन्येचे आणि तरुणाचे जीवन सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आजच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यामुळे छत्तीसगडमधील प्रगतीचा वेग वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि नवीन व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल. सरकार याच निरंतर वेगाने छत्तीसगडला पुढे नेत राहील, याची मी तुम्हाला हमी देतो.. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात छत्तीसगड महत्त्वाची भूमिका बजावेल. या प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा छत्तीसगडच्या जनतेचे अभिनंदन करतो. हा एक छोटासा सरकारी कार्यक्रम असल्याने, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी फक्त 10 मिनिटांत दुसऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात छत्तीसगडशी संबंधित विविध विषयांबद्दल नागरिकांशी संवाद साधणार आहे. मी त्या कार्यक्रमात छत्तीसगडमधील नागरिकांसोबत विकासाच्या अनेक पैलूंवर चर्चा करणार आहे. या कार्यक्रमात राज्यपालांची उपस्थिती हे राज्याच्या प्रतिनिधित्वाचे चिन्ह आहे. राज्यपालांची छत्तीसगडबद्दलची चिंता, छत्तीसगडच्या विकासाबद्दलची काळजी ही स्वतःत एक सकारात्मक संदेश आहे. 

सर्वांचे खूप खूप आभार. 

नमस्कार!

 

* * *

आशिष सांगळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2202240) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam