वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी युरोपीय संघाचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांच्याशी उच्चस्तरीय चर्चा केली
भारत- युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यावर आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यावर दिला भर
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2025 10:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 8-9 डिसेंबर 2025 दरम्यान युरोपियन यूनियनचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधील एफटीए, अर्थात मुक्त व्यापार कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देण्याच्या दिशेने दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर, एफटीए बाबतच्या वाटाघाटी करणाऱ्या पथकांना धोरणात्मक मार्गदर्शन प्रदान करणे, हे या चर्चेचे उद्दिष्ट होते.
नवी दिल्ली येथे 3-9 डिसेंबर 2025 या कालावधीत भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार करारावरील प्रमुख सत्रांमध्ये झालेल्या तांत्रिक चर्चेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची ही भेट झाली. या चर्चासत्रात वस्तूंसाठी बाजारपेठ प्रवेश, उत्पत्तीचे नियम, सेवा, व्यापारातील तांत्रिक अडथळे, व्यापार आणि शाश्वत विकास या आणि इतर मुद्द्यांचा समावेश होता. युरोपीय संघाच्या व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्तांच्या भेटीपूर्वी 7 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे वाणिज्य सचिव आणि युरोपीय आयोगाचे व्यापार महासंचालक यांच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली. कालबद्ध आणि परस्पर फायदेशीर निष्कर्षापर्यंत वाटाघाटी पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या निश्चयाबरोबरच अधिक चांगला संवाद आणि सहकार्य वाढवण्याच्या सामायिक वचनबद्धतेवर यावेळी भर देण्यात आला.
या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि युरोपीय संघाचे व्यापार आयुक्त सेफकोविक यांनी प्रस्तावित कराराच्या प्रमुख क्षेत्रांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी वाटाघाटींच्या विविध टप्प्यांवर साध्य केलेल्या स्थिर प्रगतीची नोंद घेतली आणि सातत्त्यपूर्ण देवाणघेवाणीद्वारे सध्याची गती कायम ठेवण्याच्या गरजेवर सहमती दर्शवली. दोन्ही बाजूंनी सामायिक मूल्ये, आर्थिक प्राधान्यक्रम आणि नियमाधारित व्यापार चौकटीशी सुसंगत असा निष्पक्ष, संतुलित आणि महत्त्वाकांक्षी करार पूर्ण करण्याच्या धोरणात्मक महत्त्वावर भर दिला. दोन्ही बाजूंनी मंत्रीस्तरीय चर्चेतून प्रलंबित मुद्दे रचनात्मक सहभागाद्वारे सोडवण्याचा आणि सर्वसमावेशक, परस्पर फायदेशीर निष्पन्नासाठी काम करण्याच्या दृढ राजकीय निश्चयाचा पुनरुच्चार केला.
सेफकोविक यांची नवी दिल्ली येथील भेट सध्या सुरू असलेल्या भारत-युरोपीय संघ व्यापार संवादामधील एक महत्वाचा टप्पा असून, वैविध्यपूर्ण, लवचिक आणि भविष्यवेधी आर्थिक सहकार्यामध्ये युरोपीय संघाचा विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताचे स्थान अधोरेखित करत आहे. हा आधुनिक, व्यापक आणि परस्पर फायदेशीर करार लवकर पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न अधिक तीव्र करण्याचा दोन्ही देशांनी व्यक्त केलेला विश्वास आणि नवा निर्धार, यासह समृद्धी, शाश्वतता आणि नवोन्मेष या सामायिक तत्त्वांवर आधारित असलेली ही भेट संपन्न झाली.
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201214)
आगंतुक पटल : 18