शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयटी मुंबईने नव्या धोरणात्मक आराखड्यासह जागतिक नेतृत्वाची महत्वाकांक्षा ठेवत भारतातील पहिल्या इनक्यूबेटर-लिंक्ड डीप टेक व्हीसी फंड चा केला शुभारंभ

प्रविष्टि तिथि: 09 DEC 2025 8:18PM by PIB Mumbai

मुंबई, 9 डिसेंबर 2025

आयआयटी मुंबईने, आज सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप (एसआयएनई), आयआयटी मुंबई, याच्या सहयोगाने भारतातील पहिल्या इनक्यूबेटर-लिंक्ड डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंड चा शुभारंभ केला. याद्वारे आयआयटी मुंबईने शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये एक महत्वाचा टप्पा गाठला असून, 2026-2030 आणि त्यापुढील आपल्या धोरणात्मक आराखडा जाहीर केला आहे.

आयआयटी मुंबईच्या धोरणात्मक आराखड्यात 2030 साला पर्यंत जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान विद्यापीठांमध्ये संस्थेला स्थान देण्याच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाची रूपरेषा आहे. हे धोरण शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि सामाजिक प्रभाव, या क्षेत्रातील उत्कृष्टतेला बळकटी देण्यावर भर देत, दीर्घकालीन संस्थात्मक प्रगतीसाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करण्यावर भर देते. ही योजना तीन प्रमुख धोरणात्मक संकल्पनांवर आधारित आहे. शिक्षण-केंद्रित शिक्षण, विद्यार्थी-केंद्रित आणि अनुभवात्मक शिक्षणाच्या दिशेने परिवर्तनकारी बदल घडवून, जागतिक शैक्षणिक मार्गांचा विस्तार करण्यावर आणि ऑनलाइन पदवी आणि प्रमाणपत्र कार्यक्रमांद्वारे डिजिटल शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यावर भर देते.

फ्रंटियर रिसर्च लीडरशिप, एआय/एमएल, क्लायमेट टेक, हेल्थकेअर/मेडटेक, क्वांटम टेक्नॉलॉजीज, सेमीकंडक्टर्स, ॲडव्हान्स्ड मटेरियल्स आणि स्पेस अँड डिफेन्स यासारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये लक्ष केंद्रित करण्याची रूपरेषा मांडते. उद्योग आणि समाज-सापेक्ष संशोधन आणि भाषांतर, हे निकटचे औद्योगिक सहकार्य, मजबूत स्टार्टअप समर्थन आणि संशोधनाचे  बाजारपेठेसाठी सज्ज उपायांमध्ये जलद रूपांतर, यावर भर देते.

या संकल्पना सहा प्रमुख स्तंभांवर आधारित आहेत: प्राध्यापकांच्या मूल्य प्रस्तावाला बळकटी देणे, नेट झिरो  कॅम्पस सह जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, प्रशासकीय प्रक्रियेचे आधुनिकीकरण, दीर्घकालीन आर्थिक स्थैर्याची सुनिश्चिती, माजी विद्यार्थी आणि कॉर्पोरेट यांच्यातील सहयोग वाढवणे आणि विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या कल्याणाला प्राधान्य देणे.

या धोरणात्मक आराखड्याला आयआयटी मुंबई नियामक मंडळाने मान्यता दिली, आणि 8 डिसेंबर 2025 रोजी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्याचे औपचारिक अनावरण करण्यात आले. प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील भागीदार आणि कर्मचारी यांनी दिलेल्या विस्तृत माहितीच्या आधारावर हा आराखडा विकसित करण्यात आला आहे.

त्याच दिवशी, आयआयटी मुंबईच्या एसआयएनई  ने 250 कोटी रुपयांचा Y-Point व्हेंचर कॅपिटल फंड सुरू केला. शैक्षणिक क्षेत्राशी जोडलेल्या इनक्यूबेटरद्वारे त्याचे व्यवस्थापन होणार असून, तो  भारतातील पहिला डीप टेक व्हीसी फंड आहे. प्रारंभिक टप्प्यातील डीप टेक स्टार्टअप्सना प्रेरणा देणे आणि प्रयोगशाळेतील संशोधनापासून ते बाजारपेठेचा अवलंब करण्याच्या त्यांच्या प्रवासाला समर्थन देणे, हे या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

नवोन्मेष आणि उद्योजकता संस्थेला (एसआयएनई)  500 पेक्षा अधिक स्टार्टअप्स आणि 1,000 पेक्षा अधिक नवोन्मेषकांना मार्गदर्शन करण्याचा दोन दशकांहून अधिक अनुभव आहे.  या संस्थेने  विकासाचे दीर्घ चक्र , भांडवलावर आधारित तंत्रज्ञान तसेच विशेष कौशल्यांची आवश्यकता अशा प्रकारच्या डीप-टेक संस्थापकांना भेडसावणाऱ्या, विविध आव्हानांविषयी मूलभूत जाण प्राप्त केली आहे. ‘वाय-पॉईंट फंड’ अर्थात प्रारंभिक टप्प्यातील उद्यम भांडवल निधीची कमतरता दूर करण्यासाठी 25–30 प्री-सीड आणि सीड-स्टेज स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली जाते, ज्यामध्ये प्रति स्टार्टअप जास्तीत जास्त 15 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असू शकते. हा निधी आयआयटी मुंबई तसेच इतर नामांकित संस्थांमधून उदयास येणाऱ्या उपक्रमांना पाठबळ देतो.

हा निधी कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत संगणन, प्रगत उत्पादन, प्रगत साहित्य, अणु तंत्रज्ञान, अवकाश आणि संरक्षण, हवामान आणि स्वच्छ तंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान आणि आरोग्यसेवा यासारख्या उच्च-प्रभावी क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. “हा निधी जागतिक दर्जाचे प्रतिभावंत आणि अत्याधुनिक संशोधन यांचा लाभ घेऊन जागतिक स्पर्धेच्या युगात कायमस्वरूपी टिकणाऱ्या उपक्रमांची निर्मिती करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल,” असे डॉ. के. राधाकृष्णन यांनी सांगितले.

संस्थेच्या नवोन्मेष परिसंस्थेला बळकटी देण्यात एसआयएनई  च्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी प्रकाश टाकला, तर प्रा. मिलिंद अत्रे यांनी मजबूत बौद्धिक संपदा आणि सामाजिक प्रभावाच्या आधारे यश मिळवण्याच्या निधीच्या क्षमतेवर भर दिला.

मुख्य कार्यकारी अधिकारी शाजी वर्गीस यांनी सांगितले की या निधीचे  संकलन 6–9 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्यासंदर्भातील प्राथमिक मूल्यांकन सुरू झाले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी दोन्ही उपक्रमांच्या यशस्वी  आरंभाबद्दल आयआयटी मुंबईचे अभिनंदन केले. प्राध्यापक निशांत शर्मा  यांनी आभार मानले. या दोन महत्त्वाच्या घोषणांनी एकत्रितपणे, भारताच्या डीप-टेक क्षेत्राला बळकटी देण्याच्या, जागतिक दर्जाच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या, उद्योजकतेस सशक्त करण्याच्या आणि देशाच्या तांत्रिक नेतृत्वाचा विस्तार करण्याच्या प्रवासात एक निर्णायक टप्पा  निर्माण केला आहे.

निलीमा ‍चितळे/राजश्री आगाशे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2201116) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Tamil