नौवहन मंत्रालय
मुंबईत जागतिक आयएएलए परिषदेच्या तिसऱ्या सत्राचे सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन, दीपगृह पर्यटनासाठी डिजिटल पोर्टलचे केले अनावरण
सागरी नौवहन सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील उच्चस्तरीय जागतिक चर्चासत्रात 30 हून अधिक देश सहभागी
"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक सागरी नवोन्मेषक म्हणून उदयास येत आहे" : - सर्बानंद सोनोवाल
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2025 7:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत आंतरराष्ट्रीय सागरी नौवहन सहाय्य्यता संघटनेच्या (आयएएलए) परिषदेच्या तिसऱ्या सत्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. केंद्रीय मंत्र्यांनी दीपगृह पर्यटनासाठी डिजिटल तिकिटिंग पोर्टलचे देखील अनावरण केले, जे भारतातील दीपगृहांपर्यंत सुधारित प्रवेशासाठी डिजिटल अभ्यागत सेवांच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
8–12 डिसेंबर दरम्यान होत असलेला हा प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रम बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय अंतर्गत दीपगृह आणि लाईटशिप महासंचालनालयाद्वारे आयोजित केला जात आहे. आयएएलए परिषदेचे 42 सदस्य, एआयएमजी चे तीन सदस्य, 11 निरीक्षक, आयएएलए सचिवालय प्रतिनिधी आणि 30 हून अधिक देशांचे प्रतिनिधी यानिमित्ताने एकत्र आले आहेत.
उद्घाटन सत्रात बोलताना केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, मुंबईत परिषदेच्या आयोजनातून जागतिक सागरी मानकांचे भविष्य घडवण्यात भारताची वाढती भूमिका प्रतिबिंबित होते. सर्बानंद सोनोवाल यांनी हडप्पा काळातील भारताच्या सागरी वारशाचा उल्लेख केला आणि लोथल येथे भारत विकसित करत असलेल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाचा उल्लेख केला ज्यामध्ये भारताचा सागरी भूतकाळ आणि भविष्य दर्शवणारे समर्पित दीपगृह संग्रहालय समाविष्ट आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी स्वायत्त नौवहन, उपग्रह-सक्षम प्रणाली आणि डिजिटल जहाज व्यवस्थापनासह सागरी नौवहनाला तंत्रज्ञान आकार देत असताना जागतिक सहकार्याची वाढती प्रासंगिकता अधोरेखित केली. सोनोवाल यांनी जगभरातील नौवहन मानकांमध्ये सुसंवाद साधण्यात आयएएलएच्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले आणि सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत सागरी नौवहनाच्या प्रयत्नात भारताच्या भागीदारीचा पुनरुच्चार केला.
या कार्यक्रमात बोलताना, सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारताचे सागरी क्षेत्र पायाभूत सुविधांचा विस्तार आणि डिजिटल नवोन्मेषापासून ते हरित आणि शाश्वत नौवहनापर्यंत मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. पंतप्रधान मोदीजींच्या धोरणात्मक उद्दिष्टामुळे भारताने केवळ एक प्रमुख सागरी राष्ट्र म्हणून नव्हे तर जागतिक मानके, सुरक्षितता आणि सहकार्यासाठी एक विश्वासार्ह योगदानकर्ता म्हणून स्थान मिळवले आहे.”
या कार्यक्रमादरम्यान, सर्वानंद सोनोवाल यांनी दीपगृह पर्यटनासाठी डिजिटल तिकीट पोर्टल सुरू केले, ज्यामुळे 75 दीपगृह स्थळांवर पर्यटकांना डिजिटल प्रवेश, पारदर्शकता आणि सोय-सुविधा मिळणार आहे.मंत्र्यांनी नमूद केले की भारतातील सर्व दीपगृह आता सौरऊर्जेवर चालतात आणि गेल्या दशकात या ठिकाणी पर्यटनात लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे.
सर्बानंद सोनोवाल यांनी उपस्थितांना सांगितले की, "मुंबईत आयएएलए परिषदेच्या तिसऱ्या सत्राचे आयोजन करणे ही भारतासाठी खूप अभिमानाची बाब आहे. स्वायत्त शिपिंग, उपग्रह-आधारित नौवहन प्रणाली आणि डिजिटलायझेशन यासारखे तंत्रज्ञान वेगाने विकास होत असताना, नौवहन मानकांच्या जागतिक सुसंवादात आयएएलएची भूमिका आणखी महत्त्वपूर्ण बनते. सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत नौवहनच्या प्रयत्नात भारत आयएएलएच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे."
सोनोवाल यांनी राष्ट्रीय सागरी उपक्रमांवर प्रकाश टाकताना ‘मेरिटाइम इंडिया व्हिजन 2030’ आणि ‘मेरिटाइम अमृत काळ व्हिजन 2047’ मधील सुधारणांचा उल्लेख केला. या धोरणांत बंदर निगडीत पायाभूत सुविधा मजबूत करणे, जहाजबांधणी क्षमता वाढवणे, लॉजिस्टिक्स कार्यक्षमता सुधारणे, हरित नौवहनाला प्रोत्साहन देणे व डिजिटल परिवर्तनाला गती देणे यांचा समावेश आहे. हे सर्व उपक्रम पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील भारताच्या दीर्घकालीन सागरी धोरणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांनी असेही नमूद केले की, नौवहन सहाय्य प्रणाली समुद्री सुरक्षिततेचे मुख्य केंद्र आहे आणि भारत आधुनिक एटोन प्रणाली, डिजिटल नौवहन उपाययोजना आणि विकसनशील सागरी देशांसाठी क्षमता-वृद्धी कार्यक्रमांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे.
सोनोवाल म्हणाले, “आपले गतिशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहसी सुधारणांद्वारे आणि भविष्याभिमुख आराखड्याद्वारे भारताची सागरी प्रगती नव्याने परिभाषित केली आहे. दीपगृह पर्यटनासाठी डिजिटल तिकीट व्यवस्था असो, आधुनिक नौवहन प्रणाली असो किंवा हरित नौकानयनाचे उपक्रम — प्रत्येक टप्पा भारताला सुरक्षित, स्मार्ट आणि शाश्वत सागरी कार्यप्रणालीतील जागतिक अग्रगण्य बनविण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.”
भारत आयएएलएच्या परिषद सदस्य देशांपैकी एक असून, तांत्रिक सहकार्य, प्रशिक्षण आणि जागतिक मानक-निर्धारणात सातत्याने योगदान देत आहे. सुरक्षित नौवहन पद्धती बळकट करण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत सहकार्य करत आहे.
मुंबईत तिसऱ्या आयएएलए परिषद अधिवेशनाचे आयोजन करणे हे जागतिक सागरी सहकार्य बळकट करण्यासाठी आणि नौवहन, सुरक्षा आणि शाश्वततेतील आंतरराष्ट्रीय मानकांना पुढे नेण्यासाठी भारताच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे.




निलीमा चितळे/सुषमा काणे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201067)
आगंतुक पटल : 21