वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
चांगल्या-वाईट काळात रशियाने नेहमी भारताला साथ दिली : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
पीयूष गोयल यांनी भारत-रशिया व्यापार भागीदारी अधिक संतुलित आणि वैविध्यपूर्ण करण्याचे केले आवाहन अपूर्ण क्षमतांकडे वेधले लक्ष
जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या स्थिर आर्थिक लवचिकतेवर गोयल यांनी टाकला प्रकाश
जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताची मजबूत आर्थिक लढाई अधोरेखित – श्री पीयुष गोयल
वाहनउद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, जड यंत्रसामग्री, वस्त्रोद्योग आणि अन्नउत्पादने रशियाशी वाढीव व्यापारामुळे लाभ घेऊ शकतात : श्री पीयुष गोयल
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2025 9:51PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित भारत-रशिया व्यापार मंच वर रशियाला "भारताचा सुख दुख का साथी" संबोधले, म्हणजेच रशिया नेहमीच चांगल्या काळात आणि कठीण काळातही भारताचा साथीदार राहिला आहे, असे सांगितले. रशियन फेडरेशनच्या अध्यक्षीय कार्यकारी कार्यालयाचे उपप्रमुख मॅक्सिम ओरेश्किन हे या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते होते. त्यांनी सांगितले की, "भारत-रशिया व्यापाराने उल्लेखनीय प्रगती केली आहे, याचे प्रमाण 70 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या जवळपास आहे, तरीही प्रचंड क्षमता अद्याप वापरात नाही, कारण रशियाच्या आयातीमध्ये भारताचा वाटा अजूनही 2% पेक्षा कमी आहे. हा आकडा आमच्या भागीदारीच्या खऱ्या महत्त्वाकांक्षेला पूर्ण करत नाही. आमचे सामायिक लक्ष्य अधिक संतुलित आणि परस्पर फायदेशीर व्यापाराला चालना देण्याचे आहे. 2030 पर्यंत 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त करण्याचे उद्दिष्ट आहे, जे मजबूत भारतीय निर्यातीद्वारे साध्य करता येईल. ग्राहकोपयोगी वस्तू, अन्न आणि शेती, औषधनिर्माण आणि वैद्यकीय पुरवठा, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक घटक आणि कुशल प्रतिभांच्या गतिशीलतेमधील सहकार्यासाठी आम्हाला विशेषत्वाने आशादायक मार्ग दिसत आहेत.”
भारत-रशिया व्यापार मंच "रशियाला विक्री करा" या संकल्पनेभोवती आयोजित करण्यात आला होता. अधिक संतुलित द्विपक्षीय व्यापार साध्य करणे, व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी नवीन संधी निर्माण करणे तसेच दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये सामायिक, शाश्वत विकासाला चालना देणे या उद्देशाने रशियन बाजारपेठेत भारताची निर्यात वाढविण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
अधिक समतापूर्ण आणि शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यासाठी उत्पादने आणि क्षेत्रांच्या बाबतीत द्विपक्षीय व्यापारात अधिक विविधता आणण्याची गरज गोयल यांनी अधोरेखित केली. गोयल यांनी स्पष्ट केले की, भारताकडून रशियाच्या गरजा पूर्ण करू शकणाऱ्या विविध प्रकारच्या मागण्या आहेत, रशियाच्या ताकदींमुळे भारताला फायदा होऊ शकतो अशी अनेक क्षेत्रे आहेत.
एकत्र काम करून, विशेषतः दोन्ही देशांमधील व्यावसायिक समुदायांच्या मजबूत सहभागाद्वारे व्यापार संबंधातील "अपूर्ण क्षमता" पूर्णपणे साकार करता येतील, असेही गोयल यांनी अधोरेखित केले. सहयोगी प्रयत्नांमुळे नजीकच्या भविष्यात व्यापार असमतोल दूर होण्यास मदत होईल तसेच दोन्ही बाजूंचे विद्यमान अडथळे कमी करण्यास आणि दूर करण्यास, व्यवसायासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यास आणि दोन्ही बाजूंच्या कंपन्यांसाठी नवीन संधी खुल्या करण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रशियामध्ये विविध प्रकारच्या औद्योगिक वस्तू आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांना मोठी मागणी आहे, ज्यामुळे भारतीय व्यवसायांसाठी मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे मंत्र्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, ऑटोमोबाईल्स, ट्रॅक्टर, जड व्यावसायिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, डेटा-प्रक्रिया उपकरणे, जड यंत्रसामग्री, औद्योगिक घटक, कापड आणि अन्न उत्पादने यासह अनेक क्षेत्रांमध्ये आधीच स्पष्ट क्षमता दिसून येत आहे.
मंत्र्यांनी सांगितले की, भारतातील तरुण, कुशल आणि वचनबद्ध कर्मचारीवर्ग रशियाच्या अंदाजे तीस लाख कुशल व्यावसायिकांच्या कमतरतेची पूर्तता करण्यास मदत करू शकतो. भारत दरवर्षी 2.4 दशलक्ष इतके जगातील सर्वात जास्त स्टेम पदवीधर तयार करतो आणि डिझाइन, विश्लेषण आणि संशोधन यासारख्या क्षेत्रातील त्यांच्या प्रतिभेमुळे रशियाची जागतिक स्पर्धात्मकता लक्षणीयरीत्या वाढू शकते, यावर त्यांनी भर दिला.
दोन्ही बाजूंनी विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी 2030 पर्यंत वार्षिक व्यापार 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे नेण्याचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, वस्तूंमध्ये संतुलित वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी, सेवांमध्ये व्यापार वाढविण्यासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच संचारसंपर्क, नवोन्मेष आणि आंतर-प्रादेशिक संबंधांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, जेणेकरून वाढत्या आर्थिक सहभागाचे रूपांतर भारत आणि रशियाच्या लोकांसाठी वाढत्या समृद्धीमध्ये होईल.
***
नितीन फुल्लुके/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199331)
आगंतुक पटल : 11