संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री आणि त्यांचे रशियन समकक्ष यांनी नवी दिल्ली येथे लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्यावरच्या 22 व्या भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाचे सह-अध्यक्षपद भूषविले
भारत-रशिया संबंध विश्वास, समान तत्त्वे आणि परस्पर आदराच्या सखोल भावनेवर आधारित असल्याचा दोन्ही बाजूंकडून पुनरुच्चार
विशिष्ट तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवण्यासाठी नवीन संधींवर राजनाथ सिंह यांनी दिला भर
संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी भारताला सहयोग देण्यास रशियन संरक्षण उद्योग तयार आहे - आंद्रेई बेलुसोव्ह
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2025 7:56PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलुसोव्ह यांनी 4 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्यावरच्या 22 व्या भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या (आयआरआयजीसी-एम अँड एमटीसी) 22 व्या सत्राचे सहअध्यक्षपद भूषवले. दोन्ही बाजूंनी पुनरुच्चार केला की भारत-रशिया संबंध विश्वासाच्या सखोल भावनेवर, समान तत्त्वांवर आणि परस्पर आदरावर आधारित आहेत. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेपूर्वी झाली.

राजनाथ सिंह यांनी 'आत्मनिर्भर भारत' चे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने स्थानिक उत्पादन आणि निर्यातीसाठी स्वदेशी संरक्षण उद्योगाची क्षमता वाढविण्यासाठी भारत सरकारचा दृढनिश्चय व्यक्त केला. त्यांनी उभय देशांमधील विशिष्ट तंत्रज्ञानामध्ये सहकार्य वाढवण्याच्या नवीन संधींवरही भर दिला.

रशियन संरक्षणमंत्र्यांनी उभय देशांमधील परस्पर विश्वासावर आधारित संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की दोन्ही देश अनेक वर्षांची मैत्री आणि धोरणात्मक सहकार्याने एकत्र वाटचाल करीत आहेत. त्यांनी सांगितले की संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताला सहयोग देण्यास रशियन संरक्षण उद्योग तयार आहे. बेलुसोव्ह यांनी 2026 मध्ये होणाऱ्या आयआरआयसी-एम अॅन्ड एमटीसीच्या 23 व्या सत्राचे सह-अध्यक्षपद भूषविण्यासाठी राजनाथ सिंह यांना रशियाला भेट देण्याचे आमंत्रण देखील दिले.

शेवटी, दोन्ही मंत्र्यांनी 22 व्या आयआरआयजीसी-एम अॅन्ड एमटीसी बैठकीच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली ज्यामध्ये सहकार्याच्या विद्यमान आणि संभाव्य क्षेत्रांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

बैठकीपूर्वी, संरक्षण मंत्री आणि रशियन संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले आणि देशाच्या सेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय वीरांना आदरांजली वाहिली. भेट देणाऱ्या मान्यवरांनी तिन्ही सेवेतील जवानांची मानवंदना स्वीकारली.

***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199133)
आगंतुक पटल : 3