दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार लेखा महानियंत्रक कार्यालयाच्या पश्चिम विभागाची आढावा परिषद गोव्यामध्ये संपन्न
प्रविष्टि तिथि:
02 DEC 2025 6:25PM by PIB Mumbai
पणजी,2 डिसेंबर 2025
गोव्यामध्ये कांदोळी येथे आयोजित दूरसंचार लेखा महानियंत्रक कार्यालयाच्या (सीजीसीए) दोन दिवसीय पश्चिम विभाग आढावा परिषदेचा आज समारोप झाला. या परिषदेला सीजीसीए चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी यावेळी सीजीसीए च्या प्रमुख कार्यक्षेत्रांचा आढावा घेतला, तसेच पश्चिम विभागात सीजीसीए ची परिचालन क्षमता वाढवण्यासाठीच्या उपायांवर चर्चा केली.

दूरसंचार लेखा महानियंत्रक वंदना गुप्ता या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्या नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून परिषदेत सहभागी झाल्या. पश्चिम विभागाचे प्रधान दूरसंचार लेखा नियंत्रक (पीआर. सीसीए) संजय कुमार बरियार यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची प्रत्यक्ष कार्यवाही पार पडली.

परिषदेच्या दोन दिवसांच्या कालावधीत महसूल, निवृत्तीवेतन, डिजिटल भारत निधी आणि दूरसंचार संचालनालयाच्या कार्यक्षेत्रातील युनिट्सच्या अंतर्गत लेखापरीक्षणासह प्रमुख क्षेत्रांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पश्चिम विभागातील सर्व सीसीए कार्यालयांनी हाती घेतलेल्या कामांचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला. परिषदेदरम्यान हे अधोरेखित करण्यात आले की या प्रदेशातील सीसीए कार्यालये एकत्रितपणे 1 लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना सेवा देतात, आणि वार्षिक अंदाजे 5,000 कोटी रुपये वितरीत करतात. याव्यतिरिक्त, ते परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्काद्वारे सुमारे 6,000 कोटी रुपये महसूल गोळा करतात. हा महसूल भारत सरकारच्या बिगर-कर महसुलात मोठी भर घालतो.

दूरसंचार विभागाच्या महासंचालक सुनीता चंद्रा यांनी या परिषदेला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले आणि सीजीसीए आणि सीसीए कार्यालयांच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. क्षेत्रीय संघटनासाठी त्यांनी दिलेल्या सहकार्याची दखल घेत, सुधारित सेवा वितरणासाठी सहकार्यावर भर दिला .
आपल्या समारोपाच्या भाषणात, सीजीसीए वंदना गुप्ता यांनी वेळेवर निवृत्तीवेतन वितरण, तक्रार निवारण आणि कार्यक्षम महसूल संकलन यामधील सीसीए च्या कार्यालयांनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली. त्यांनी आपल्या पथकासह पश्चिम विभागात उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि परिचालन कार्यक्षमता आणखी मजबूत करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याजोग्या शिफारशी केल्या.
पश्चिम विभागाचे प्रधान सीसीए संजय कुमार बरियार यांनी सीजीसीए च्या पथकाने दिलेल्या अभ्यासपूर्ण माहितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि परिषदेदरम्यान झालेल्या रचनात्मक चर्चासत्रांची प्रशंसा केली.
महाराष्ट्र आणि गोवा येथील दूरसंचार लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांनी सीजीसीए वंदना गुप्ता यांच्या मार्गदर्शनाची दखल घेतली आणि चर्चासत्राच्या आयोजनासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कुमार बरियार यांची प्रशंसा केली. त्यांनी सर्व प्रतिनिधींच्या सक्रिय सहभागाबद्दल आणि त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल आभार मानले.
सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2197797)
आगंतुक पटल : 13