संरक्षण मंत्रालय
ज्यांना शांतता व सदिच्छेची भाषा कळत नाही त्यांच्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे चोख प्रत्युत्तर आहे- संरक्षण मंत्री
प्रविष्टि तिथि:
02 DEC 2025 4:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025
ज्यांना शांतता व सदिच्छेची भाषा कळत नाही त्यांच्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे चोख प्रत्युत्तर आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारताच्या या दहशतवादविरोधी कृतीची तुलना त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मजबूत इच्छाशक्ती व नेतृत्वाशी केली . सरदार पटेल यांनी अशा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नेहमीच वाटाघाटींचा मार्ग स्वीकारला होता, परंतु हैद्राबाद संस्थानाच्या भारत विलीनीकरणाच्या बाबतीत गरज पडल्यावर मात्र त्यांनी कडक कारवाई करण्यास मागेपुढे पाहिले नाही असे सिंह यांनी सांगितले. संरक्षण मंत्री गुजरातमधील वडोदरा इथे 2 डिसेंबर 2025 रोजी आयोजित सरदार सभेत भाषण करत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित 'मेरा युवा भारत' एकता यात्रेदरम्यान ते बोलत होते.
ऑपरेशन सिंदूर च्या यशस्वी अंमलबजावणीत सशस्त्र दलांनी दाखवलेल्या समर्पण भावना आणि साहसाची प्रशंसा करताना संरक्षण मंत्री म्हणाले, कि भारतीय सैनिकांचे शौर्य व अजोड क्षमतेची नोंद सर्व जगाने घेतली आहे. या मोहिमेतून स्पष्ट संदेश गेला आहे, कि "आम्ही एक शान्तताप्रिय देश आहोत, पण आमच्याकडे जर वाकडी नजर करून कोणी पाहिले, तर आम्ही त्याला योग्य धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही".
भारताच्या एकात्मतेत सरदार पटेल यांची महत्वाची भूमिका असून पटेल यांच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' या स्वप्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अधिक बळ मिळाले, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू व काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पूर्वीच्या तुलनेत,जग आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे म्हणणे ऐकते. भारत एक मोठी अर्थव्यवस्था आणि धोरणात्मक शक्ती म्हणून आगेकूच करत असून सरदार पटेल यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळेच हे शक्य झाले आहे, असे ते म्हणाले. आमचे सरकार भारताला सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि आर्थिक एकतेच्या धाग्याने बांधत आहे. आम्ही एक भारत श्रेष्ठ भारत या दृष्टिकोनानुसार भविष्याकडे वाटचाल करत आहोत. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा आमचा निर्धार आहे, असेही त्यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि शस्त्रात्रे आणि दारुगोळा यांच्या देशांतर्गत उत्पादनावर भर देणाऱ्या सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय सुरक्षा विषयक दृष्टिकोनाला अनुसरून केंद्र सरकार कार्य करत असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. मेक इन इंडिया उपक्रमामुळे आज आपण संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहोत, त्याचवेळी मित्र राष्ट्रांना संरक्षण सामग्रीची निर्यात करत आहोत. गेल्या 11 वर्षात आपल्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत सुमारे 34 पटींनी वाढ झाली आहे.वर्ष 2029 पर्यंत संरक्षण उत्पादन 3 लाख कोटी करण्याचा आणि संरक्षण क्षेत्रातील निर्यात 50,000 कोटी रुपये करण्याचा आमचा संकल्प आहे, असे ते म्हणाले.
आपल्या राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्याची जबाबदारी सरदार पटेल यांनी देशाच्या भावी पिढीच्या खांद्यावर सोपवली आहे असे सांगून युवकांनी अथक परिश्रम करुन विकसित भारताचे स्वप्न साकार करावे असे आवाहन संरक्षण मंत्र्यांनी केले. देश आणि समाजाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण सरदार पटेल यांच्या मूल्यांना संपूर्ण निष्ठेने आणि सचोटीने आत्मसात करण्याची आणि त्यादृष्टीने भावी पिढी निर्माण करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. सरदार पटेल यांच्या वारशाला ही खरी मानवंदना ठरेल, असे ते म्हणाले.
सुषमा काणे/उमा रायकर/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2197650)
आगंतुक पटल : 11