56 व्या इफ्फीमध्ये हेसम फराहमंद आणि टोनिस पिल यांना संयुक्त पदार्पण सन्मान
56 व्या इफ्फीमध्ये ‘माय डॉटर्स हेअर’ आणि ‘फ्रँक’ यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा मिळाला पुरस्कार
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाना प्रथमच बनवलेल्या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. इराणी चित्रपट ‘माय डॉटर्स हेअर’ साठी हेसम फराहमंद आणि एस्टोनियन चित्रपट ‘फ्रँक’ साठी टोनिस पिल यांना हा पुरस्कार देण्यात आला. दोन्ही चित्रपट दूरदृष्टी आणि कलाकुसरीच्या बाबतीत वेगळे होते आणि या वर्षीच्या महोत्सवात चित्रपटाची परिभाषित करणारी ताकद, आवाज आणि भावनिक स्पष्टता यांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. विजेत्यांना रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि 10,00,000 रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले. हा पुरस्कार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, इफ्फी ज्युरीचे अध्यक्ष राकेश ओमप्रकाश मेहरा आणि महोत्सव संचालक शेखर कपूर यांच्या उपस्थितीत प्रदान केला.

ज्युरींनी नमूद केले की, “एक नव्हे तर दोन सिनेमॅटिक कलाकृतींच्या प्रतिभेने आम्हाला तितकेच प्रभावित केले. म्हणून, प्रभावी प्रतिभा दाखवणाऱ्या दोन दिग्दर्शकांना सन्मानित करताना आम्हाला आनंद होत आहे, ज्यांच्या कारकिर्दीतून भविष्यात अनेक उत्कृष्ट विचारप्रवर्तक कथा निर्माण होतील. आम्ही हेसम फराहमंद आणि टोनिस पिल यांना त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो.” या भावनेने एका सामायिक सन्मानाला जन्म दिला, ज्यात कलात्मक उत्कृष्टतेची दखल घेण्यात आली जी केवळ एका नावात समाहित होऊ शकली नसती.
56 व्या इफ्फीमधील संयुक्त पुरस्कार केवळ चित्रपटांना नव्हे तर पुढील प्रवासाला देखील दिशा देतो. हा महोत्सव दोन्ही दिग्दर्शकांना हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांच्या विकसित होत असलेल्या सर्जनशील मार्गांमधून अनेक गहन कथा समोर येतील अशी अपेक्षा करतो.
'माय डॉटर्स हेअर' चा सारांश

राहा ही एक किशोरवयीन मुलगी आहे जी अॅनिमेशन शिकत आहे, मात्र जेव्हा ती तिचा विद्यापीठाचा प्रकल्प सादर करणार असते, तेव्हा तिचा लॅपटॉप चोरीला जातो आणि तिला तिचे केस कापून ते विकावे लागतात आणि नवीन लॅपटॉप खरेदी करावा लागतो. तिचे वडील तोहीद आपल्या मुलीचे केस विकून मिळालेल्या पैशातून एक सेकंड-हँड लॅपटॉप खरेदी करतात. मात्र नवीन लॅपटॉपमुळे राहाच्या कुटुंबाला एका गूढ संकटाला सामोरे जावे लागते. लॅपटॉपच्या मालकीवरून एका श्रीमंत कुटुंबाशी संघर्ष होतो, ज्यामुळे तणाव वाढतो. हा चित्रपट चांगले जीवन आणि जगण्यासाठी धडपडणाऱ्या सामान्य लोकांच्या कठोर वास्तवांचे आणि त्यांच्या त्यागाचे चित्रण आहे.
'माय डॉटर्स हेअर' ची पीसी लिंक
‘फ्रँक’चा सारांश

फ्रँक हा एस्टोनियन चित्रपट एका पॉल नावाच्या 13 वर्षांच्या मुलाबद्दल आहे, जो त्याच्या अत्याचारी वडिलांशी झालेल्या हिंसक भांडणानंतर त्याच्या काकांसोबत राहण्यासाठी एका अनोळखी शहरात पळून जातो. आनंदाच्या शोधात असलेला पॉल अनेक चुकीचे निर्णय घेतो परंतु एका अनोळखी दिव्यांग व्यक्तीकडून त्याला अनपेक्षित आधार मिळतो जो त्याला त्याचे पतन रोखण्यास मदत करतो. हा चित्रपट तुटलेल्या कुटुंबांची, बालपणातील आघातांची आणि पौगंडावस्थेतील वेदनांची एक धाडसी कथा आहे, ज्यामध्ये आशा आणि उमेदीच्या क्षणांना परिपूर्ण वास्तववादाची जोड आहे. प्रभावी अभिनय आणि एस्टोनियामधील तरुणांच्या संघर्षांचे भावनिक, सत्य चित्रण केल्याबद्दल फ्रँकची प्रशंसा करण्यात येत आहे.
‘फ्रँक’ची पीसी लिंक
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2196496
| Visitor Counter:
6