विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
डॉ. जितेंद्र सिंह यांनी बंगळुरू येथे पहिले स्वदेशी वैमानिक प्रशिक्षक विमान 'हंस-3 एनजी' चे केले उद्घाटन , 19 आसनी विमानाच्या योजनेचा घेतला आढावा
मंत्र्यांनी सारस एमके आयर्न बर्ड सुविधेचे केले उद्घाटन, भारताच्या लघु अंतराच्या प्रादेशिक संचारसंपर्क कार्यक्रमाला दिली चालना
डॉ. जितेंद्र सिंह यांनी एच ए एल येथे NAviMet प्रणालीला दाखवला झेंडा , भारताचे स्वदेशी हवामान तंत्रज्ञान आता देशभरातील आकाशाचे करते रक्षण असे केले प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
29 NOV 2025 6:11PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, भारत आपल्या अवकाश आणि हवाई वाहतूक परिसंस्थेत अभूतपूर्व परिवर्तन पाहत आहे, हे स्वदेशी तंत्रज्ञान, उद्योग भागीदारी आणि संपूर्ण सरकारी दृष्टिकोनाचे फलित आहे. बेंगळुरू येथील सीएसआयआर-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (एनएएल) येथे बोलताना मंत्री म्हणाले की, आज साध्य केलेले टप्पे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "हवाई चप्पल वाला भी हवाई जहाज में चलेगा" हा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतात आणि जागतिक हवाई वाहतूक केंद्र तसेच आत्मनिर्भर अवकाश उत्पादक राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारताच्या वाटचालीचे प्रतीक आहेत.
मंत्र्यांनी स्वदेशी बनावटीच्या हंस-3(एनजी) या प्रशिक्षण विमानाच्या उत्पादन आवृत्तीचे अनावरण केले, जे पीपीएल आणि सीपीएल प्रशिक्षणाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आरेखित केलेले भारतातील पहिले सर्व-संमिश्र एअरफ्रेम दोन-सीटर विमान आहे. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली येथे झालेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभाची आठवण करून दिली आणि समाधान व्यक्त केले की काही महिन्यांतच मेसर्स पायोनियर क्लीन ऍप्स या उद्योग भागीदाराने केवळ उत्पादन तयारीच सुरू केली नाही तर आंध्र प्रदेशातील कुप्पम येथे दरवर्षी 100 विमाने तयार करता येतील अशी 150 कोटी रुपयांची सुविधा उभारली आहे.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पुढील 15-20 वर्षांत भारताला जवळपास 30,000 वैमानिकांची आवश्यकता असेल आणि हंस-3 (एनजी) हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे ही देशांतर्गत गरज पूर्ण करण्याच्या दिशेने, परदेशी प्रशिक्षण विमानांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने आणि विमान वाहतूक क्षेत्रात उपजीविका आणि उद्योजकतेचे नवीन मार्ग निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले की, भारत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत अव्वल तीन देशांमध्ये स्थान मिळवण्याच्या मार्गावर आहे, त्याला मध्यमवर्गीय लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था यांचा पाठिंबा आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या उडान योजनेने हवाई प्रवासाचे लोकशाहीकरण केले आहे आणि एक अशी परिसंस्था निर्माण केली आहे जिथे प्रादेशिक संचारसंपर्क आणि किफायतशीर ऑपरेशन्स विक्रमी वेगाने विस्तारत आहेत. या वाढीच्या अनुषंगाने मंत्र्यांनी CSIR-NAL च्या 19-सीटर लाइट ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट सारस एमके-2 च्या सध्याच्या विकासावर प्रकाश टाकला, जो नागरी आणि लष्करी अशा दोन्ही ऑपरेशन्ससाठी आरेखित केलेला आहे. या विमानात प्रेशराइज्ड केबिन, डिजिटल एव्हियोनिक्स, ग्लास कॉकपिट, ऑटोपायलट, कमांड-बाय-वायर फ्लाइट कंट्रोल्स तसेच कमी वजन आणि ड्रॅगमध्ये लक्षणीय कपात असल्याने हे विमान प्रादेशिक संचारसंपर्काला बळकटी देईल आणि भारताच्या स्वदेशी लघु अंतराच्या प्रवासी विमानांच्या गरजा पूर्ण करेल.
मंत्री म्हणाले की, सारस एमके-2 ही फक्त सुरुवात आहे, कारण भारताला आता आपल्या वाढत्या विमान वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी 19-सीटर श्रेणीसह मोठ्या विमानांची संकल्पना आणि निर्मिती करण्याची अपेक्षा करावी लागेल.------------------------------------------------- या भेटीदरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह यांनी SARAS Mk-2 साठी आयर्न बर्ड फॅसिलिटीचे उद्घाटन केले. हे व्यासपीठ पूर्ण-प्रणाली एकत्रीकरण, ग्राउंड टेस्टींग आणि प्रमुख विमान उपप्रणालींच्या प्रमाणीकरणासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सुविधांमुळे उड्डाण चाचणीशी संबंधित जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होते आणि विकासाचा कालावधीही वेगाने पुढे जातो. तसेच अभियंत्यांना डिझाइन आणि सॉफ्टवेअर संबंधित त्रुटी लवकर ओळखता येतात आणि त्यांचे निराकरण करता येते. नागरी विमान वाहतूक, संरक्षण सेवा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसेच खाजगी उद्योगांसोबत एकाच वेळी काम करणारी CSIR-NAL ची प्रगत संशोधन आणि विकास परिसंस्था, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार अधोरेखित केलेल्या ‘संपूर्ण सरकार - संपूर्ण समाज’ या दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे, असे मंत्र्यांनी नमूद केले.
मंत्र्यांनी हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म्स (HAPs) साठी समर्पित उत्पादन सुविधेचे उद्घाटन देखील केले. दीर्घकाळ चालणाऱ्या मोहिमांसाठी 20 किमी उंचीपेक्षा वर उड्डाण करू शकणारी सक्षम सौरऊर्जेवर चालणारी मानवरहित विमाने विकसित करणाऱ्या निवडक राष्ट्रांच्या गटात भारताचा समावेश करण्याच्या उपक्रमाचा हा एक भाग आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि जपान अशा काही मोजक्या देशांमध्ये अशा तंत्रज्ञानांवर गुंतवणूक होत असल्यामुळे, या क्षेत्रात भारताचा प्रवेश त्याच्या वाढत्या वैज्ञानिक क्षमतेचे द्योतक आहे. CSIR-NAL च्या सबस्केल वाहनाने आधीच 7.5 किमी उंची गाठली आहे आणि 10 तासांपेक्षा जास्त उड्डाण केले आहे. 20 किमी उंचीवरील पहिल्या पूर्ण-प्रमाण उड्डाणाचे लक्ष्य 2027 मध्ये साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. HAPs हे उपग्रहांना किफायतशीर पर्याय ठरवून टेहळणी, दूरसंचार आणि पर्यावरणीय निरीक्षणासाठी नवी दिशा प्रदान करतील आणि भारताच्या एरोस्पेस क्षेत्रासाठी एक नवीन क्षितिज खुले होईल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी HAL विमानतळावर NAviMet प्रणालीचे उद्घाटन केले. CSIR-NAL च्या
DRISHTI, AWOS आणि NAviMet सारख्या प्रणाली नागरी आणि संरक्षण विमानतळावर तैनात असून विमान सुरक्षिततेमध्ये संस्थेचे दीर्घकालीन योगदान अधोरेखित करतात, असे सिंह यांनी सांगितले. 175 हून अधिक प्रणाली आधीच कार्यरत असल्याने, NAviMet सुरक्षित लँडिंग आणि टेक-ऑफसाठी आवश्यक असलेले रिअल-टाइम दृश्यमानता आणि हवामान मापदंड प्रदान करते. हे सार्वजनिक-खाजगी सहकार्याच्या माध्यमातून विकसित झालेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे आणखी एक यशस्वी उदाहरण आहे.
भारताच्या संरक्षण उत्पादन परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, मंत्र्यांच्या उपस्थितीत CSIR-NAL आणि मेसर्स सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड यांच्यात 150 किलो श्रेणीतील स्वदेशी ‘लोइटरिंग म्युनिशन यूएव्ही’ विकसित करण्यासाठीच्या सहकार्याचे औपचारिकीकरण झाले. एनएएलच्या प्रमाणित वँकेल इंजिनवर चालणारे यूएव्ही - 900 किमीची रेंज, 6-9 तास सहनशक्ती, 5 किमी सर्व्हिस सीलिंग आणि जीपीएस-रहित नेव्हिगेशन, कमी रडार क्रॉस-सेक्शन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम लक्ष्य ओळख यासारख्या प्रगत क्षमता प्रदान करेल. हे सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे प्रतीक असून यामुळे महत्त्वाच्या संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास देशातच होईल आणि व्यावसायिक-स्तरीय उत्पादनासाठी औद्योगिक क्षमता निर्माण होईल, असे मंत्र्यांनी सांगितले.





***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2196448)
आगंतुक पटल : 10