पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधित
श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठ आपल्या स्थापनेचा 550 वा वर्धापनदिन साजरा करत आहे, हा खरोखरच एक ऐतिहासिक प्रसंग आहे. गेल्या 550 वर्षांमध्ये, या संस्थेने काळाच्या असंख्य वादळांचा सामना केला; युगे बदलली, काळ बदलले, राष्ट्र आणि समाजाने अनेक स्थित्यंतरे अनुभवली, तरीही, बदलत्या काळात आणि आव्हानांमध्ये मठाने आपली दिशा कधीही गमावली नाही. याउलट, ते लोकांना मार्ग दाखवणारे एक मार्गदर्शक केंद्र म्हणून उदयाला आले: पंतप्रधान
असे काही काळ होते, ज्या काळात गोव्यातील मंदिरे आणि स्थानिक परंपरांना गंभीर आव्हानांचा सामना करावा लागला, ज्या काळात भाषा आणि सांस्कृतिक अस्मितेवर दबाव आला, तरीही, या परिस्थितीत समाजाचा आत्मा कमकुवत होऊ शकला नाही; उलट, या आव्हानांनी तो अधिक मजबूत केला: पंतप्रधान
गोव्याचे हे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे की येथील संस्कृतीने प्रत्येक बदलातून आपले सार जपले आहे आणि कालपरत्वे स्वतःचे पुनरुत्थानही केले आहे; या प्रवासात पार्तगळी मठासारख्या संस्थांनी मोठी भूमिका बजावली आहे: पंतप्रधान
आज भारत एका उल्लेखनीय सांस्कृतिक पुनरुत्थानाचा साक्षीदार होत आहे. अयोध्येतील राम मंदिराची पुनर्स्थापना, काशी विश्वनाथ धामचा भव्य जीर्णोद्धार आणि उज्जैनमधील महाकाल महालोकचा विस्तार— या सर्व गोष्टी आपल्या राष्ट्राच्या जागृतीचे प्रतिबिंब आहेत, ज्या आपल्या आध्यात्मिक वारशाला नव्या सामर्थ्याने समोर आणत आहेत: पंतप्रधान
आजचा भारत आपल्या सांस्कृतिक अस्मितेला नव्या संकल्पासह आणि नव्याने प्राप्त झालेल्या आत्मविश्वासाने पुढे घेऊन जात आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
28 NOV 2025 6:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी आपले मन गहन शांतीने भरले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. संतांच्या उपस्थितीत, त्यांच्या सोबत बसणे हा स्वतःच एक आध्यात्मिक अनुभव आहे, यावर त्यांनी भर दिला. येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांमुळे या मठाची शतकानुशतके जुनी जिवंत शक्ती आणखी वाढली आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, आज या समारंभात लोकांमध्ये उपस्थित राहणे हे आपले भाग्य आहे. येथे येण्यापूर्वी आपल्याला राम मंदिर आणि वीर विठ्ठल मंदिराला भेट देण्याचा सौभाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले. तेथील शांतता आणि तिथल्या वातावरणामुळे या समारंभाची आध्यात्मिकता अधिक सखोल झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मोदी म्हणाले, “श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठ आपला 550 वा वर्धापनदिन साजरा करत आहे, जो एक अत्यंत ऐतिहासिक प्रसंग आहे. गेल्या 550 वर्षांमध्ये या संस्थेने अनेक उलथापालथींना तोंड दिले; युगे बदलली, काळ बदलला आणि देश आणि समाजात असंख्य स्थित्यंतरे झाली, तरीही मठाने कधीही आपली दिशा गमावली नाही. याउलट, हा मठ लोकांसाठी एक मार्गदर्शक केंद्र म्हणून उदयास आला आणि त्याची सर्वात मोठी ओळख ही आहे की, इतिहासात रुजलेला असूनही तो काळाबरोबर पुढे सरकत राहिला आहे.”
मठाची ज्या भावनेने स्थापना करण्यात आली, ती भावना आजही तितकीच जिवंत आहे. ती भावना म्हणजे साधनेला सेवेशी आणि परंपरेला लोककल्याणाशी जोडणे, असे त्यांनी नमूद केले. अध्यात्माचा खरा उद्देश जीवनाला स्थैर्य, संतुलन आणि मूल्ये प्रदान करणे हा आहे, हे या मठाने पिढ्यानपिढ्या समजावून सांगितले आहे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. मठाचा 550 वर्षांचा हा प्रवास, कठीण काळातही समाजाला टिकवून ठेवणाऱ्या शक्तीचा दाखला आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी या ऐतिहासिक प्रसंगी मठाधिपती श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजी, समितीचे सर्व सदस्य आणि या सोहळ्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा एखादी संस्था सत्य आणि सेवेच्या पायावर उभी राहते, तेव्हा ती काळाच्या बदलांमुळे डळमळीत होत नाही, तर त्याऐवजी समाजाला तग धरण्याची शक्ती देते. आज याच परंपरेचे सातत्य ठेवत हा मठ एक नवा अध्याय लिहित आहे, यावर त्यांनी भर दिला.
येथे भगवान श्रीरामाचा 77 फूट उंच भव्य कांस्यधातूचा पुतळा स्थापित करण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले. तीन दिवसांपूर्वीच आपल्याला अयोध्येतील भव्य अशा श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर 'धर्म ध्वज' फडकवण्याचा सौभाग्य लाभले होते, आणि आज येथे भगवान श्रीरामाच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी रामायणावर आधारित थीम पार्कचेदेखील उद्घाटन करण्यात आले आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले.
या मठाशी संबंधित नवीन आयाम भविष्यातील पिढ्यांसाठी ज्ञान, प्रेरणा आणि आध्यात्मिक साधना यांचे कायमस्वरूपी केंद्र बनणार आहेत, यावर भर देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे विकसित होणारे संग्रहालय आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले त्रिमितीय नाट्यगृह मठाची परंपरा जपत आहेत आणि नवीन पिढीला त्याच्या वारशाबरोबर जोडणारे आहे, यावर भर दिला. त्यांनी नमूद केले की, त्याचप्रमाणे, देशभरातील लाखो भाविकांच्या सहभागाने 550 दिवसांहून अधिक काळ आयोजित केलेला श्री राम नाम जप यज्ञ आणि राम रथ यात्रा समाजातील भक्ती आणि शिस्तीच्या सामूहिक उर्जेचे प्रतीक बनली आहे. ही सामूहिक ऊर्जा आज देशाच्या कोनाकोपऱ्यात एक नवीन चेतना प्रसारित करीत आहे, यावर त्यांनी भर दिला.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाशी अध्यात्माला जोडणाऱ्या व्यवस्था आगामी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. या बांधकामाबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या भव्य उत्सवात, शतकानुशतके समाजाला एकत्र आणणाऱ्या आध्यात्मिक शक्तीला समर्पित अशा विशेष प्रसंगाचे प्रतीक म्हणून स्मृती नाणी आणि टपाल तिकिटे देखील जारी करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या मठामध्ये वाहणा-या निरंतर शक्तीचा प्रवाह द्वैत वेदांताचा दैवी पाया स्थापन करणाऱ्या महान गुरु परंपरेतून आला असल्याचे अधोरेखित करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवण करून दिली की, 1475 मध्ये श्रीमद् नारायण तीर्थ स्वामीजी यांनी स्थापन केलेला हा मठ त्या ज्ञान परंपरेचा विस्तार आहे. ज्याचे मूळ स्रोत अद्वितीय आचार्य, जगद्गुरु श्री मध्वाचार्य आहेत. यावेळी पंतप्रधानांनी या आचार्यांना आदराने नमन- वंदन केले. त्यांनी यावर भर दिला की, उडुपी आणि पार्तागली हे एकाच आध्यात्मिक नदीचे जिवंत प्रवाह आहेत आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्याच्या सांस्कृतिक प्रवाहाचे मार्गदर्शन करणारी गुरु-शक्ती एकच आहे. एकाच दिवशी या परंपरेशी संबंधित दोन कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळणे हा त्यांच्यासाठी एक विशेष योगायोग आहे, असेही त्यांनी असे नमूद केले.
या परंपरेशी संबंधित कुटुंबांनी पिढ्यानपिढ्या शिस्त, ज्ञान, कठोर परिश्रम आणि उत्कृष्टता यांना त्यांच्या जीवनाचा पाया बनवले आहे, ही गोष्ट अभिमानास्पद आहे; असे अधोरेखित करून, पंतप्रधान मोदी यांनी आवर्जुन सांगितले की, व्यापारापासून वित्तपुरवठा आणि शिक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत, त्यांच्यातील प्रतिभा, नेतृत्व आणि समर्पण या जीवनदृष्टीची खोलवर छाप पाडते. ते पुढे म्हणाले की, या परंपरेशी संबंधित परिवार आणि व्यक्ती म्हणजे यशाच्या अनेक प्रेरणादायी कथा आहेत आणि या सर्व यशामुळे ही मंडळी नम्र, मूल्ये जपतात आणि सेवेसाठी कार्यरत आहेत. या मूल्यांचे जतन करण्यासाठी हा मठ म्हणजे पायातील मूहूर्तमेढ आहे यावर भर देऊन, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की ही मुहूर्तमेढ भविष्यातील पिढ्यांना ऊर्जा देत राहील.
या ऐतिहासिक मठाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, शतकानुशतके समाजाच्या प्रत्येक घटकाला आधार देणारी सेवाभावी वृत्ती अधोरेखित करताना, पंतप्रधान मोदी यांनी आठवण करून दिली की, शतकांपूर्वी ज्यावेळी या प्रदेशात प्रतिकूल परिस्थिती आली आणि लोकांना आपले घरदार सोडून नवीन ठिकाणी आश्रय घ्यावा लागला, त्यावेळी याच मठाने समुदायाला पाठिंबा दिला, त्यांना संघटित केले आणि नवीन ठिकाणी मंदिरे, मठ आणि आश्रयस्थाने स्थापन केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मठाने केवळ धर्मच नाही, तर मानवता आणि संस्कृतीचेही रक्षण केले आणि कालांतराने हाच सेवाप्रवाह आणखी विस्तारला. त्यांनी अधोरेखित केले की, आज शिक्षणापासून वसतिगृहांपर्यंत, वृद्धांच्या काळजीपासून ते गरजू कुटुंबांना मदत करण्यापर्यंत, मठाने नेहमीच आपले संसाधने सार्वजनिक कल्याणासाठी समर्पित केली आहेत. त्यांनी नमूद केले की, मग ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये बांधलेली वसतिगृहे असोत, आधुनिक शाळा असोत किंवा कठीण काळात मदतकार्य असेल; प्रत्येक उपक्रम हा पुरावा आहे की, ज्यावेळी अध्यात्म आणि सेवा एकत्र चालतात, त्यावेळी समाजाला स्थैर्य मिळते आणि सर्वांना पुढे जाण्याची प्रेरणाही मिळते.
गोव्यातील मंदिरे आणि स्थानिक परंपरांवर संकटे आली, भाषा आणि सांस्कृतिक ओळखीवर दबाव आला, अशाही परिस्थितीमध्ये समाजाचा आत्मा कमकुवत झाला नाही. उलट तो अधिक मजबूत झाला, असे पंतप्रधानांनी नमूद केले. गोव्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बदलातून त्याची संस्कृती, तिचे मूळ सारतत्व जपून ठेवले जात आहे आणि काळाबरोबर स्वतःला पुन्हा जिवंत करत आहे, ज्यामध्ये पार्तगली मठासारख्या संस्थांची मोठी भूमिका आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
"आज भारत एका अद्भुत सांस्कृतिक पुनर्जागरणाचा साक्षीदार बनत आहे, यात अयोध्येतील राम मंदिराची पुनर्स्थापना , काशी विश्वनाथ धामचा भव्य पुनर्विकास आणि उज्जैनमधील महाकाल महालोकचा विस्तार यांचा समावेश आहे, हे सर्व आपल्या राष्ट्राची जागरूकता प्रतिबिंबित करतात जी आपल्या आध्यात्मिक वारशाला नव्या शक्तीसह पुनरुज्जीवित करत आहे", असे उद्गार मोदी यांनी काढले. रामायण सर्किट, कृष्ण सर्किट, गया जी येथील विकास कामे आणि कुंभमेळ्याचे अभूतपूर्व व्यवस्थापन यासारखे उपक्रम आजचा भारत आपली सांस्कृतिक ओळख नवीन संकल्प आणि आत्मविश्वासासह कशी पुढे नेत आहे याची उदाहरणे आहेत असे त्यांनी नमूद केले. ही जागरूकता भावी पिढ्यांना त्यांच्या मुळांशी जोडलेले राहण्यासाठी प्रेरित करत आहे यावर त्यांनी भर दिला.
गोव्याच्या पवित्र भूमीची स्वतःची विशिष्ट आध्यात्मिक ओळख आहे, ज्यामध्ये गेली अनेक शतके भक्ती, संत परंपरा आणि सांस्कृतिक प्रथेचा सातत्यपूर्ण प्रवाह दिसून येतो हे अधोरेखित करत मोदी म्हणाले की, या भूमीला तिच्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच 'दक्षिण काशी'ची ओळख देखील आहे, जी पार्तगळी मठाने अधिक दृढ केली आहे. त्यांनी नमूद केले की मठाचे नाते केवळ कोकण आणि गोव्यापुरते मर्यादित नाही, तर त्याची परंपरा देशाच्या विविध भागांशी आणि वाराणसीच्या पवित्र भूमीशी देखील जोडलेली आहे. वाराणसीचे खासदार म्हणून त्यांनी अभिमानाने नमूद केले की, संस्थापक आचार्य श्री नारायण तीर्थ यांनी उत्तर भारतातील त्यांच्या प्रवासादरम्यान वाराणसीमध्ये एक केंद्र स्थापन केले, ज्यामुळे मठाचा आध्यात्मिक प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे विस्तारला. आजही वाराणसीमध्ये स्थापन झालेले हे केंद्र समाजाच्या सेवेत कार्यरत आहे असे ते म्हणाले.
या पवित्र मठाला 550 वर्षे पूर्ण होत आहेत यावर भर देत मोदी म्हणाले की, आपण केवळ इतिहास साजरा करत नाही तर भविष्याची दिशा देखील निश्चित करत आहोत. त्यांनी नमूद केले की विकसित भारताचा मार्ग एकतेतून जातो आणि जेव्हा समाज एकत्र येतो, जेव्हा प्रत्येक प्रदेश आणि प्रत्येक वर्ग एकजुटीने उभा राहतो तेव्हा देश मोठी झेप घेतो. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाचे प्राथमिक ध्येय लोकांना जोडणे, मनांना जोडणे आणि परंपरा आणि आधुनिकतेमध्ये एक सेतू उभारणे हा आहे आणि म्हणूनच विकसित भारताच्या प्रवासात, हा मठ एका प्रमुख प्रेरणा केंद्राची भूमिका बजावत आहे.
मोदी म्हणाले की ज्यांच्याशी माझा स्नेह असतो तिथे मी आदरपूर्वक काही विनंती करतो. आज इथे तुमच्यामध्ये आलो असताना मनात स्वाभाविकपणे काही विचार येतात जे आपण सामायिक करू इच्छितो असे ते म्हणले. त्यांनी अधोरेखित केले की ते त्यांच्यासमोर नऊ आवाहने ठेवू इच्छितात जी त्यांच्या संस्थेद्वारे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवता येतील. ही आवाहने नऊ संकल्पांप्रमाणे आहेत यावर त्यांनी भर दिला. मोदी यांनी नमूद केले की विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण पर्यावरणाचे रक्षण हे आपले कर्तव्य मानू, कारण पृथ्वी ही आपली माता आहे आणि मठाची शिकवण आपल्याला निसर्गाचा आदर करण्यास शिकवते. म्हणून पहिला संकल्प जल संवर्धन , पाणी वाचवणे आणि नद्यांचे संरक्षण करणे हा असावा असे त्यांनी नमूद केले. दुसरा संकल्प वृक्षारोपण करण्याचा असावा, असे ते म्हणाले. त्यांनी अधोरेखित केले की “एक पेड माँ के नाम” या देशव्यापी मोहीमेला गती मिळत आहे आणि जर या संस्थेची ताकद त्यात सामील झाली तर त्याचा प्रभाव आणखी व्यापक होईल. तिसरा संकल्प स्वच्छता मोहिमेचा असावा , जेणेकरून प्रत्येक रस्ता, परिसर आणि शहर स्वच्छ राहील हे सुनिश्चित होईल यावर त्यांनी भर दिला. चौथा संकल्प स्वदेशीचा स्वीकार करण्याचा असावा हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी नमूद केले की आज भारत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीचा मंत्र घेऊन पुढे मार्गक्रमण करत आहे आणि देश “व्होकल फॉर लोकल” या मंत्रासह वाटचाल करत असून हा संकल्प आपणही पुढे नेला पाहिजे.
पाचव्या संकल्पाबद्दल बोलताना, मोदी म्हणाले की हा 'देशदर्शन'चा असावा, देशाच्या विविध भागांबद्दल जाणून घेण्याचे आणि समजून घेण्याचे प्रयत्न प्रत्येकाने करायला हवेत यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. सहावा संकल्प नैसर्गिक शेतीला जीवनाचा भाग बनवणे हा असायला हवा. सातवा संकल्प निरोगी जीवनशैली स्वीकारणे, 'श्री अन्न - भरड धान्यांचा अवलंब आणि जेवणात तेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करणे हा असावा असे त्यांनी नमूद केले. आठवा संकल्प योग आणि खेळांचा अवलंब करणे आणि नववा संकल्प गरिबांची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करणे हा असावा यावर त्यांनी भर दिला.
मठ या संकल्पांचे सामूहिक सार्वजनिक बांधिलकीमध्ये परिवर्तन करू शकतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. परंपरा ज्यावेळी काळानुरूप आपल्या जबाबदाऱ्यांचा विस्तार करतात, त्याचवेळी त्या समाजाला प्रवाहित ठेवतात. हे या मठाने 550 वर्षांच्या अनुभवाने आपल्याला शिकवले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या मठाने शतकांपासून समाजाला दिलेली उर्जा आता भविष्यवेधी भारत घडविण्यासाठी वळवली पाहिजे.
गोव्याचे आध्यात्मिक वैभव या राज्याच्या आधुनिक सुधारणांप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे अधोरेखित करत गोवा, हे सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या राज्यांपैकी एक असून पर्यटन, औषधनिर्मिती आणि सेवा क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्यांपैकी एक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अलीकडच्या वर्षांमध्ये गोव्याने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवे टप्पे साध्य केले असून केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे या राज्याच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. महामार्ग, विमानतळ आणि रेल्वे कनेक्टीव्हिटी यांच्या विस्तारामुळे भाविक आणि पर्यटक या दोघांसाठीही प्रवास सुलभ झाल्याचे ते म्हणाले. 2047 पर्यंत विकसित भारत हा राष्ट्रीय दृष्टीकोन साध्य करण्यासाठी पर्यटन हा महत्वाचा घटक असून यासाठी गोवा हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे यावर त्यांनी भर दिला.
"सध्या भारत एका निर्णायक टप्प्यातून जात आहे, जिथे तरुणांची ताकद, देशाचा वाढता आत्मविश्वास आणि सांस्कृतिक मुळांकडे त्यांचा कल एकत्रितपणे नवीन भारत घडवत आहे", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ज्यावेळी अध्यात्म, देशसेवा आणि विकास एकत्रित येवून पुढची वाटचाल करतील, त्याचवेळी विकसित भारताचा संकल्प पूर्ण होईल, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गोव्याची पवित्र भूमी आणि असे मठ या दिशेने महत्त्वाचे योगदान देत आहेत. या पवित्र प्रसंगी त्यांनी पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.
पार्श्वभूमी
श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षाच्या उत्सवानिमित्त, पंतप्रधानांनी दक्षिण गोव्यातील काणकोण येथील मठाला भेट दिली.
याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठामध्ये उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम यांच्या 77 फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले आणि मठाने विकसित केलेल्या 'रामायण संकल्पना उद्याना'चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी विशेष टपाल तिकिट आणि स्मृती नाणे देखील प्रकाशित केले.
श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ आहे. या मठाची स्थापना 13 व्या शतकात जगद्गुरु मध्वाचार्य यांनी केली. या मठाकडून द्वैत तत्वज्ञानाचे अनुसरण केले जाते. मठाचे मुख्यालय दक्षिण गोव्यामध्ये कुशावती नदीच्या काठावर पार्तगळी या एका लहानशा नगरामध्ये आहे.
***
गोपाळ चिप्पलकट्टी/निलिमा चितळे/शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2196066)
आगंतुक पटल : 10