वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
फिक्कीच्या 98 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पीयूष गोयल यांनी जगातील सर्व प्रमुख व्यापारी देशांसोबत व्यापार वाटाघाटी सुरु असून व्यापार संबंध अधिक मजबूत होत असल्याचे केले अधोरेखित
आत्मनिर्भरता भारताच्या आर्थिक धोरणाच्या केंद्रस्थानी आहे: पीयूष गोयल
12 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या संशोधन निधीसह उदयोन्मुख तंत्रज्ञानात नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज : गोयल
प्रविष्टि तिथि:
28 NOV 2025 1:07PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारताने ऑस्ट्रेलिया, यूएई, मॉरिशस, ब्रिटन आणि चार देशांच्या ईएफटीए गटासोबत संतुलित आणि समान व्यापार करार केले आहेत आणि सध्या अमेरिका, युरोपियन संघ , जीसीसी देश, न्यूझीलंड, इस्रायल, युरेशिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि मर्कोसुर गटासह सुमारे 50 राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 14 देशांबरोबर किंवा गटांबरोबर चर्चा सुरु आहे. गोयल आज नवी दिल्ली येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की ) च्या 98 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करत होते.
युवा लोकसंख्या, वाढता डिजिटल अवलंब आणि प्रतिभावंतांची मोठी संख्या यामुळे भारताच्या नवोन्मेष आणि तंत्रज्ञानातील सामर्थ्याला बळ मिळाल्याचे गोयल यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, भारतातील ‘स्टेम’ पदवीधरांची मोठी संख्या आणि व्यापक इंटरनेट प्रवेश यामुळे उपयोजित कृत्रिम प्रज्ञा , ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि डीप -टेक इनोव्हेशन यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये प्रबळ संभावना निर्माण झाल्या आहेत.
त्यांनी नमूद केले की, अलीकडे जाहीर केलेला 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा संशोधन, विकास आणि नवप्रवर्तन निधी, तसेच स्टार्टअप्स आणि डीप-टेक उद्योगांना दिला जाणारा सातत्यपूर्ण पाठिंबा, भारताच्या नवप्रवर्तन परिसंस्थेला आणखी गती देईल. जागतिक पातळीवरील विस्तृत घडामोडींवर प्रकाश टाकताना, गोयल सांगितले की, अलीकडील भू-राजकीय आणि आर्थिक आव्हानांनी विश्वसनीय भागीदारांची आणि मजबूत- विनाखंड पुरवठा साखळींची आवश्यकता अधोरेखित केली आहे. भारताचे विस्तारित होत असलेले मुक्त व्यापार करार आणि आर्थिक भागीदारीचे जाळे हे न्याय, पारदर्शकता आणि परस्पर लाभ या तत्त्वांवर आधारित दीर्घकालीन सहकार्यास बळकटी देण्याच्या उद्देशानेच उभारले जात आहे, असे ते म्हणाले.
राजकीय पातळीवर “कमीतकमी सरकार, जास्तीतजास्त सुशासन” या तत्त्वांना वचनबद्ध असलेल्या स्थिर आणि पूर्वानुमानयोग्य सरकारमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. आर्थिक क्षेत्रात, राष्ट्रीय उत्पादन अभियान आणि 25,000 कोटींचे निर्यात प्रोत्साहन अभियानासारख्या उपक्रमांमुळे भारत जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. नवप्रवर्तनाला चालना देणे, संशोधन व विकास अधिक सखोल करणे, उद्योग-विद्यापीठ सहकार्य बळकट करणे आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रवासाला समर्थन देणे यासाठी संस्थेने ध्येयाधिष्ठित दृष्टिकोन स्वीकारावा, असे मंत्र्यांनी फिक्कीला आवाहन केले. उद्योग, सरकार आणि नागरिकांचे एकत्रित प्रयत्नच भारताला सक्षम, स्पर्धात्मक आणि आत्मनिर्भर जागतिक आर्थिक शक्ती म्हणून उभे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
***
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2195875)
आगंतुक पटल : 5