उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींना आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांची आणि कामगिरीची माहिती देण्यात आली


आदिवासी क्षेत्रांमध्ये सिकल सेल ॲनिमियाचा सामना करण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांचे उपराष्ट्रपतींनी केले कौतुक

Posted On: 24 NOV 2025 9:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय मंत्री, जुएल ओराम, यांनी आज मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संसद भवनामध्ये उपराष्ट्रपती, सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान, आदिवासी जनतेच्या कल्याणासाठी मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात आली. या सादरीकरणामध्ये आदिवासी हक्क सुरक्षित करण्याचे प्रयत्न, शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठीचे उपाय, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, आदिवासी संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठीचे कार्यक्रम, आर्थिक सहाय्यासह आणि पारंपरिक कौशल्यांना उद्योगांमध्ये रूपांतरित करण्यासह उपजीविका योजना, देशभरात एकलव्य आदर्श निवासी शाळांचे  आधुनिकीकरण आणि विस्तार करण्याची मंत्रालयाची योजना, तसेच धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, पीएम- जनमन, आणि आदी कर्मयोगी अभियान यांसारख्या प्रमुख योजनांचा समावेश होता.

विशेषतः वंचित आदिवासी गटांच्या (PVTGs) कल्याणासाठी असलेल्या लक्ष्यित उपक्रमांची आणि त्यांच्या निवासस्थानाच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उपायांची माहिती देखील उपराष्ट्रपतींना देण्यात आली.

उपराष्ट्रपतींनी गेल्या अकरा वर्षांत मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत झालेल्या तिप्पट वाढीची प्रशंसा केली आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील संधींसह दर्जेदार उच्च शिक्षणामध्ये प्रवेश वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणामध्ये सहज संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण शैक्षणिक पाठबळ आणि देखरेख, शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करणे आणि विद्यापीठे व शाळा यांच्यात मजबूत दुवे निर्माण करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

आदिवासी समुदायांमधील सिकल सेल ॲनिमियाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करून काम केल्याबद्दल आणि आरोग्य सुविधांमधील गंभीर त्रुटी दूर केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी मंत्रालयाची प्रशंसा केली. विविध आदिवासी समुदायांतील विस्मृतीत गेलेल्या नायकांना प्रकाशात आणून त्यांच्या योगदानाकडे राष्ट्रीय लक्ष वेधण्याचे आवाहनही त्यांनी मंत्रालयाला केले.

कल्याणकारी योजनांचा लाभ आदिवासी लोकसंख्येच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचला पाहिजे, याचा पुनरुच्चार करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, 'विकसित भारताचे' स्वप्न केवळ तेव्हाच पूर्ण होऊ शकते, जेव्हा आदिवासी समुदायाचे उत्थान आणि कल्याण पूर्णपणे सुनिश्चित केले जाईल.


निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2193848) Visitor Counter : 5
Read this release in: English