विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आयआयटी मुंबईच्या क्वांटंम् सेन्सिंग संशोधनाची डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली प्रशंसा, भारताच्या पहिल्या लिक्वीड हेलियम क्रायोजेनिक प्रणालीचे केले उद्घाटन
Posted On:
24 NOV 2025 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज आयआयटी मुंबई येथील क्वांटम संशोधन प्रयोगशाळांना भेट दिली आणि संस्थेतील नवीन लिक्विड हेलियम सुविधेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी अग्रणी तंत्रज्ञानाला पुढे नेण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. ही सुविधा क्वांटम विज्ञान, क्रायोजेनिक्स, अत्याधुनिक साहित्य आणि नेक्स्ट-जनरेशन कॉम्प्युटिंगच्या भारतातील वाढत्या परिसंस्थेमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे नमूद केले.
क्वांटम लॅबला भेट देताना, केंद्रीय मंत्र्यांनी भारतातील स्वदेशी क्वांटम सेन्सिंग आणि इमेजिंग प्लॅटफॉर्मच्या पहिल्या मालिकेचा आढावा घेतला. ही मालिका देशाच्या संशोधन आणि विकास क्षमतांमधील मोठी झेप दर्शवत आहे. नॅनोटेस्ला (nT) स्केलवर अति-अल्प चुंबकीय क्षेत्रे शोधण्यास सक्षम असलेले देशातील पहिले पोर्टेबल मॅग्नेटोमीटर, क्यूमॅगपायबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. एक कॉम्पॅक्ट आणि स्केलेबल सिस्टीम तयार करण्याच्या टीमच्या यशाबद्दल मंत्र्यांनी कौतुक केले, ज्यामुळे भारत अशा क्षमता असलेल्या निवडक राष्ट्रांमध्ये सामील झाला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या प्रगतीला सहकार्य केले आहे, ज्यामुळे गहन विज्ञानाचे वास्तविक-जगातील उपयोगांमध्ये रूपांतर करणे शक्य झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी आयआयटी मुंबईच्या PQuest समूहाने तयार केलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी क्वांटम डायमंड मायक्रोस्कोपची (QDM) देखील पाहणी केली.
आरोग्यसेवेत क्वांटम तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर भर देत, मंत्र्यांनी Q-Confocal प्रणालीचे परीक्षण केले. हा एक स्वदेशी कॉन्फोकल मायक्रोस्कोप आहे, जो नॅनोडायमंड्स मधील एनव्ही केंद्रांच्या क्वांटम गुणधर्मांचा वापर करण्यासाठी तयार केला आहे. डॉ. सिंह यांनी या नवोन्मेषकर्त्या चमूचे अभिनंदन केले आणि अशा क्वांटम-सक्षम बायोमेडिकल साधनांमुळे आरोग्य विज्ञान आणि उच्च तंत्रज्ञान यांचा भारतातील समन्वय वाढत असल्याचे अधोरेखित केले.
लॅब भेटीनंतर, डॉ. जितेंद्र सिंह यांनी लिक्विड हेलियम सुविधेचे उद्घाटन केले. क्वांटम कॉम्प्युटरची जागतिक मागणी वाढत असताना, भारताने त्याच वेळी आपल्या क्रायोजेनिक्स पायाभूत सुविधांना बळकट केले पाहिजे, असे मंत्री म्हणाले. स्वदेशी क्रायोजेनिक क्षमता वाढवण्यासाठी अधिक राष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
क्वांटम लॅबमधील प्रगती आणि नवीन क्रायोजेनिक्स सुविधा दोन्ही अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये भारताचे वेगाने विस्तारणारे नेतृत्व दर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की ही कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, जिथे गहन तंत्रज्ञान संशोधन, धोरणात्मक नवकल्पना आणि स्वदेशी विकास भारताच्या जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देतात. शिक्षण क्षेत्र, सरकार आणि उद्योग भविष्यातील तंत्रज्ञान घडवण्यास सक्षम असलेली जागतिक दर्जाची वैज्ञानिक परिसंस्था संयुक्तपणे कशी तयार करू शकतात, याचे दर्शन आयआयटी मुंबईच्या कार्यातून घडत आहे, असे ते म्हणाले.




निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193829)
Visitor Counter : 4