कंपनी व्यवहार मंत्रालय
भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेने पुनर्वसन महासंचालनालय आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयासोबतच्या सहकार्यपूर्ण भागीदारी अंतर्गत संरक्षण अधिकाऱ्यांसाठी संयुक्तपणे राबवलेल्या कॉर्पोरेट प्रशासनासाठीच्या संचालक प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी सांगता
प्रविष्टि तिथि:
22 NOV 2025 4:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025
भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेच्या (IICA) वतीने संरक्षण अधिकाऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या कॉर्पोरेट प्रशासनासाठीच्या संचालकांच्या प्रमाणपत्र कार्यक्रमांतर्गत तिसऱ्या तुकडीच्या प्रशिक्षणाची दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी गुरुग्राम मधील मानेसर इथल्या IICA च्या शाखेत यशस्वी सांगता झाली. भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेने पुनर्वसन महासंचालनालय (DGR) आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयासोबतच्या सहकार्यपूर्ण भागीदारीअंतर्गत संयुक्तपणे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम दोन आठवड्यांचा होता. भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रतिनिधित्व करणारे अधिकाऱ्यांचे या कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण झाले. यात सध्या सेवेत असलेल्या तसेच नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या 30 अधिकाऱ्यांचा समावेश होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विद्यमान तिसऱ्या तुकडीसह, ऑगस्ट 2024 पासून आत्तापर्यंत आयोजित केल्या गेलेल्या तीन तुकड्यांमधून एकूण 90 प्रतिष्ठित संरक्षण अधिकाऱ्यांनी कॉर्पोरेट प्रशासन आणि स्वतंत्र संचालनाचे सर्वसमावेशक ज्ञान आणि प्राविण्य मिळवले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला अनेक मान्यवरांनी संबोधित केले. IICA चे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर कुमार सिंह यांनी स्वागतपर भाषण केले. तर केंद्र सरकारचे माजी सचिव आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सचिव आणि सध्या अशोका विद्यापीठातील आयझॅक सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी इथले फेलो (पाठ्यवृत्तीधारक) डॉ. के. पी. कृष्णन यांनी समारोप कार्यक्रमाचे उद्घाटनपर भाषण केले. याशिवाय, संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाच्या सचिव सुकृती लिखी यांनीही बीजभाषण केले.

IICA चे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर कुमार सिंह यांनी आपल्या स्वागतपर भाषणात या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे हा दोन आठवड्यांचा विस्तृत प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कॉर्पोरेट प्रशासनाच्या आराखड्याची चौकट, नियामक तरतुदी, आर्थिक व्यवस्थापन, लेखापरीक्षण समितीच्या जबाबदाऱ्या, उद्योग-व्यवसाय जोखीम व्यवस्थापन, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि शाश्वत प्रशासन या आणि अशा महत्वाच्या विषयांवरील 35 विशेष सत्रांचा समावेश होता असे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वर कुमार सिंह यांनी आपले विद्यमान लष्करी सामर्थ्य आणि प्रभावी स्वतंत्र संचालकपदासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेतील गहीरे साम्य अधोरेखित केले. धोरणात्मक विचार करण्याची क्षमता, जोखीम मूल्यांकनाचा अनुभव, नीतीमूल्यांची मर्यादा आणि दडपणाच्या परिस्थितीत तटस्थ राहण्याची क्षमता अशा क्षमतांमुळे संरक्षण अधिकाऱ्यांना कॉर्पोरेटच्या संचालक मंडळांच्या कार्यालयांत संरक्षण अधिकाऱ्यांना एक निष्पक्षतेने मते मांडणारे व्यक्तीमत्व म्हणून स्थान प्राप्त झाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पुनर्वसन महासंचालनालयासोबतच्या दृढ सहकार्यपूर्ण भागीदारीचीही त्यांनी प्रशंसा केली. या प्रशिक्षण कार्यक्रमापलीकडेही IICA दृढ वचनबद्धतेने, सातत्यपूर्ण शिक्षण आणि व्यावसायिक संपर्क विस्ताराच्या संधींच्या माध्यमातून, सहभागी झालेल्या मदत करत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. के. पी. कृष्णन यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणातून या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कॉर्पोरेट प्रशासनाची मूलभूत तत्त्वे आणि स्वतंत्र संचालकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. स्वतंत्र संचालक हे, स्वतःचे संरक्षण करू शकत नसलेल्या घटकांचे, विशेषतः अल्पसंख्याक भागधारकाचे आणि निर्णय घेणाऱ्या मंडळांमध्ये प्रतिनिधित्व नसलेल्या इतर भागधारकांच्या संरक्षकाची महत्वाची जबाबदारी पार पाडत असतात ही बाब त्यांनी अधोरेखित केली. हे पद प्रामुख्याने विविध भागधारकांप्रति असलेल्या कर्तव्यनिष्ठ जबाबदाऱ्यांशी जोडलेले असून. अधिकच्या कामाऐवजी कामांमध्ये संतुलन राखणे हेच या जबाबदारीचे सार आहे असे त्यांनी नमूद केले. तांत्रिक बाबी, क्षेत्राचे ज्ञान आणि कंपनीचे तपशील समजून घेण्यापलीकडे जात, लोक आणि साधनसामग्रीचे व्यवस्थापन करताना संतुलित आणि न्यायिक पद्धतीने, परिणाम हाती येतील, अशा रितीने कामे करण्याचा आपला तीन दशकांच्या अनुभवाने हे सगळेजण स्वतंत्र संचालक म्हणून काम करण्यासाठी थेट पात्र असल्याची जाणीवही डॉ. के. पी. कृष्णन यांनी या सहभागींना करून दिली.

सचिव ईएसडब्ल्यू यांच्या मुख्य भाषणात, नागरी कॉर्पोरेट क्षेत्रात संरक्षण कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपवादात्मक नेतृत्व क्षमतांचे योगदान देण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी आयआयसीए आणि डीजीआर यांच्यातील सततच्या सहभागावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनामुळे सहभागींना प्रशासनाच्या परिस्थितीची आणि कॉर्पोरेट भूमिकांमध्ये बदलणाऱ्या संरक्षण अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची व्यावहारिक माहिती मिळाली. भारतीय कंपन्यांमध्ये गतिमान, दूरदर्शी आणि नैतिक मंडळ सदस्यांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी आणि संरक्षण कर्मचाऱ्यांच्या अद्वितीय कौशल्यांचा आणि अनुभवांचा फायदा घेण्यासाठी त्यांनी या भागीदारीचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले.
दोन आठवड्यांचा हा भरगच्च कार्यक्रम सहभागींना कॉर्पोरेट गव्हर्नन्सची संकल्पनात्मक आणि नियामक जाण आणि समज देण्यासाठी आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बोर्ड सदस्य म्हणून प्रभावीपणे काम करण्यासाठी, तयार करण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता. व्यापक अभ्यासक्रमात कॉर्पोरेट गव्हर्नन्सची तत्त्वे, बोर्ड संरचना आणि प्रभावीपणा, स्वतंत्र संचालकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या, कंपनी कायदा 2013 अंतर्गत नियामक चौकट आणि सेबी एलओडीआर नियम यांचा समावेश होता.
शिवाय त्यात आर्थिक विवरणपत्र विश्लेषण, ऑडिट समितीची कार्ये, एंटरप्राइझ जोखीम व्यवस्थापन, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि ईएसजी विचारांचा समावेश होता. या कार्यक्रमात विषय तज्ञांची वर्ग व्याख्याने, केस स्टडी चर्चा, सराव करणाऱ्या स्वतंत्र संचालकांसह परस्परसंवादी सत्रे आणि अनुभवात्मक शिक्षण संधी यासह विविध शिक्षण पद्धतींचा वापर करण्यात आला.
या कार्यक्रमाचा उद्देश अनुभवी व्यावसायिकांना समांतर व्यावसायिक अनुभव, स्वतंत्र संचालक म्हणून विकसित होणे आणि कॉर्पोरेट आणि सार्वजनिक क्षेत्रातील नेतृत्वाकडून अनुभवात्मक शिक्षण यावरील सत्रांद्वारे लष्करी आणि कॉर्पोरेट संदर्भांमधील ज्ञानातील तफावत भरून काढणे हा आहे. येथे मिळणाऱ्या प्रमाणपत्रामुळे सहभागींना स्वतंत्र संचालकांच्या डेटाबँक (IDDB) मध्ये नोंदणी करता येते. हा IICA द्वारे व्यवस्थापित कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचा उपक्रम आहे. यात सध्या 35,000 हून अधिक नोंदणीकृत स्वतंत्र संचालक आहेत ज्यात 10,000 हून अधिक महिला स्वतंत्र संचालकांचा समावेश आहे, 3,600 हून अधिक नोंदणीकृत कंपन्या या टॅलेंटपूलचा वापर करतात.
आयआयसीए आणि डीजीआर यांच्यातील ही भागीदारी भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये गतिमान, दूरदर्शी आणि नैतिक मंडळ सदस्यांची वाढती गरज पूर्ण करताना नागरी कॉर्पोरेट क्षेत्रात संरक्षण कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपवादात्मक नेतृत्व क्षमतांचे योगदान देण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी एक धोरणात्मक पुढाकार दर्शवते. हा कार्यक्रम प्रभावी कॉर्पोरेट प्रशासनाच्या मुख्य तत्त्वांसह विश्वास, सचोटी आणि धोरणात्मक विचारसरणीच्या लष्करी मूल्यांमधील एकरूपता अधोरेखित करतो. कार्यक्रमाचे संचालन आणि समन्वय अनुक्रमे आयआयसीएच्या स्कूल ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसीचे प्रमुख डॉ. निरज गुप्ता आणि आयआयसीएच्या सेंटर फॉर इंडिपेंडेंट डायरेक्टर सेक्रेटरीएटच्या प्रिन्सिपल रिसर्च असोसिएट डॉ. अनिंदिता चक्रवर्ती यांनी केले.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2192880)
आगंतुक पटल : 27