संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र आणि गोवा किनाऱ्यालगत भारतीय तटरक्षक दलाकडून ‘सागर कवच’अंतर्गत दोन दिवसीय किनारा सुरक्षा सरावाचे आयोजन

Posted On: 21 NOV 2025 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025

भारतीय तटरक्षक दलाने 19-20 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र आणि गोवा किनाऱ्यालगत सागर कवच 02/25 हा सर्वंकष किनारा सुरक्षा सराव आयोजित केला होता. विभिन्न संस्थांदरम्यानचा उच्च समन्वय, प्रत्येक कृतीसाठीची प्रबळ सिद्धता आणि सागरी सुरक्षेसमोरील आह्वानांना तोंड देण्याच्या प्रचंड क्षमता यांचे दर्शन यातून घडले. राष्ट्रविरोधी घटकांमुळे महत्त्वाच्या किनारी मालमत्ता/संस्थांना निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा सामना करण्याचाही यात समावेश होता. या दोन दिवसीय सरावात 6,000 पेक्षा अधिक जवान सहभागी झाले. 115 पेक्षा अधिक समुद्री आणि हवाई सामग्री यात समाविष्ट होती. तर केंद्र तथा राज्य सरकारी संस्थांचे, बंदरे आणि किनारी संस्थांचे अधिकारीही सहभागी झाले होते.

किनारी सुरक्षेविषयी उद्भवणारी आणीबाणीजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी, तसेच महत्त्वाच्या किनारी संस्थांवरचे हल्ले थोपवण्यासाठी सर्व सहभागी संस्थांची सज्जता तपासणे, आणि बहु-स्तरीय किनारी सुरक्षा नेटवर्क आणखी बळकट करणे- असा या सरावाचा उद्देश होता. किनारी आणि सागरी सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या केंद्र तथा राज्य सरकारी संस्थांम्डझिल समन्वय वाढवण्याचाही हेतू यात ठेवण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात सागरी आणि हवाई सामग्री यासाठी कार्यान्वित करण्यात आली होती- यामध्ये भारतीय नौदलाच्या आणि भारतीय तटरक्षक दलाच्या नौका, आयसीजी डॉर्निअर विमान,  चेतक हेलिकॉप्टर, आणि एअर कुशन याने (ACV) यांत समाविष्ट होती. सागरी पोलिसांच्या नौका, सीमाशुल्क तसेच सीआयएसएफ  विमाने, महाराष्ट्र सागरी मंडळाचे साहित्य यावेळी तैनात केले गेले.शिवाय पोलीस आणि मासेमारी विभागाच्या होड्याही वापरल्या गेल्या, जेणेकरून- सर्व क्षेत्रांमध्ये अडथळा-विरहित समन्वय साधला जाण्याचा सराव केला जावा, असा हेतु होता.

सुरक्षा, हेरगिरी, आणि बंदर-व्यवस्थापन संस्थांमधील समन्वय, संवाद नेटवर्क्स, आणि आंतर-क्रियान्वयन क्षमता यांमध्ये या सरावामुळे लक्षणीय वाढ झाली. केंद्र सरकारच्या 19 आणि राज्य सरकारांच्या 13 संस्था, एक मोठे बंदर, 21 छोटी बंदरे, आणि जिल्हा-स्तरीय किनारी अधिकारी या सर्वांनी मिळून सागरी आणि किनारी प्रतिसाद सर्वसामावेशकपणे मिळेल, याची काळजी घेतली.   

सुवर्णा बेडेकर /जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2192762) Visitor Counter : 3