रेल्वे मंत्रालय
रेल्वेने बल्क सिमेंटच्या वाहतुकीवरील शुल्कात कपात करून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वतःच्या घराच्या स्वप्नपूर्तिला दिले पाठबळ
Posted On:
18 NOV 2025 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज कंटेनरमधून बल्क सिमेंटच्या (मोठ्या प्रमाणातील) वाहतुकीवरील शुल्काचे सुसूत्रीकरण आणि बल्क सिमेंट टर्मिनल्ससाठी धोरण जाहीर केले. हे धोरण सिमेंट वाहतुकीसाठीच्या रेल्वे सुधारणांचा एक भाग आहे.

नवी दिल्लीतील रेल्वे भवनात या धोरणाची सुरुवात करताना, केंद्रीय मंत्र्यांनी हा क्षण परिवर्तनकारी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की या धोरणामुळे सीमेंटची किंमत कमी होईल, आणि गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. नवीन धोरणानुसार, अंतर आणि वजनाचे टप्पे काढून टाकण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, नवीन दर तर्कसंगत करण्यात आला असून, फ्लॅट ग्रॉस टन किमी. साठीचा नवीन दर 0.90 रुपये प्रति टन प्रति किलोमीटर इतका करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, टँक कंटेनर हा मोठ्या प्रमाणात सिमेंट वाहतुकीसाठीचा संपूर्ण प्रदूषणमुक्त लॉजिस्टिक उपाय असेल. ते म्हणाले की, भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मालवाहतूकदार देश असून, त्याने अमेरिकेला मागे टाकले आहे. रेल्वे जाळ्याचा विस्तार प्रतिदिन 4 कि.मी. वरून (2004–14 दरम्यान) 12–14 कि.मी.पर्यंत झाला असून, तो तिप्पट वेगवान झाला आहे. ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कचे आता जवळजवळ 100% विद्युतीकरण झाले आहे. सध्या देशभरात 1,300 हून अधिक अमृत स्थानके विकसित केली जात आहेत, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
टँक कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या मालवाहतुकीचे सुसूत्रीकरण
रेल्वे गाडीच्या एकूण टन किलोमीटर (GTKM) म्हणून मोजल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष टनेजवर आधारित शुल्क लागू करून नवीन दर रचना सोपी आणि तर्कसंगत करण्यात आली आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी यापूर्वीचे अंतर आणि वजनाचे टप्पे हटवले आहेत. सुधारित प्रणाली अंतर्गत, प्रत्यक्ष कापलेल्या अंतरासाठी प्रति किलोमीटर प्रति टन 0.90 रुपये या दराने शुल्क आकारले जाईल.
बल्क सिमेंट टर्मिनल्ससाठी धोरण
उत्पादन प्रकल्पापासून वापर केंद्रांजवळील टर्मिनल्सपर्यंत विशेष वॅगनरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात सिमेंटची वाहतूक करणे किफायतशीर आणि पर्यावरण स्नेही आहे. कार्यक्षम लॉजिस्टिक्सच्या दिशेने या बदलाला आणखी पाठिंबा देण्यासाठी, भारतीय रेल्वे "बल्क सिमेंट टर्मिनल" धोरणांतर्गत देशभरात बल्क सिमेंट टर्मिनल्सच्या विकासाला गती देईल, त्यामुळे सिमेंटची सुलभ हाताळणी, साठवणूक आणि वितरण सुलभ होईल.
या धोरणाचे अनेक महत्वाचे फायदे असून, यात सिमेंट वाहतूकीच्या खर्चात मोठी घट आणि रस्ते वाहतुकीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट याचा समावेश आहे, त्यामुळे पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा मिळेल आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल. यामुळे एकाच खेपेत मोठ्या प्रमाणात सिमेंटची वाहतूक करणे शक्य होईल, आणि पॅकेजिंगची आवश्यकता कमी झाल्यामुळे गळती कमी होऊन, नुकसान कमी होईल. याशिवाय, हे धोरण यांत्रिक चढ – उताराद्वारे यासाठी लागणाऱ्या वेळेच्या बचतीची खात्री देत असून, त्यामुळे सिमेंट लॉजिस्टिक्सची एकूण कार्यक्षमता वाढेल.
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2191476)
Visitor Counter : 7