पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ब्राझीलमधील बेलेम येथे यूएन एफ सी सी सी कॉर्प - 30 च्या उच्चस्तरीय विभागात सादर केले भारताचे राष्ट्रीय निवेदन
भारताने कॉप-30 ची ओळख अंमलबजावणीची परिषद आणि आश्वासनांच्या पूर्ततेची परिषद म्हणून व्हावी, अशी केली मागणी
Posted On:
18 NOV 2025 1:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 17.11.2025 रोजी ब्राझीलमधील बेलेम येथे यूएन एफ सी सी सीच्या 30 व्या पक्ष परिषदेच्या (कॉर्प - 30) उच्चस्तरीय विभागात भारताचे राष्ट्रीय निवेदन सादर केले. मंत्र्यांनी काॅप 30 ला 'अंमलबजावणीची परिषद' आणि 'वचनांच्या पूर्ततेची परिषद' अशी ओळख मिळवून देण्याचे आवाहन केले.

"आपल्या ग्रहाच्या पर्यावरणीय संपत्तीचे जिवंत प्रतीक" असलेल्या अमेझॉनच्या केंद्रस्थानी कॉर्प - 30 आयोजित केल्याबद्दल मंत्र्यांनी ब्राझील सरकार आणि जनतेचे भारताच्या वतीने कौतुक केले.
यादव यांनी विकसित देशांना हवामान बदलाबाबत अधिक महत्त्वाकांक्षा दाखवण्याचे आणि त्यांच्या वचनबद्धतेचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी ठामपणे सांगितले की, "विकसित देशांनी सध्याच्या संकल्पित तारखांपेक्षा खूप लवकर निव्वळ शून्य गाठले पाहिजे आणि अब्जावधी नव्हे तर ट्रिलियनच्या प्रमाणात नवीन, अतिरिक्त आणि सवलतीच्या दरातील हवामान वित्तपुरवठा केला पाहिजे".
त्यांनी परवडणाऱ्या, सुलभ हवामान तंत्रज्ञानाच्या गरजेवर भर दिला आणि सांगितले की हवामान तंत्रज्ञान हे प्रतिबंधात्मक बौद्धिक संपदा अडथळ्यांपासून मुक्त असले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकास आणि पर्यावरणीय व्यवस्थापन एकत्रितपणे प्रगती करू शकते हे यशस्वीरित्या दाखवून दिले आहे यावर मंत्र्यांनी भर दिला.
वर्ष 2005 पासून भारताच्या कार्बन उत्सर्जनाची तीव्रता 36 टक्क्यांनी कमी झाली असून स्थापित वीज निर्मिती क्षमतेमध्ये बिगर-जीवाश्म स्त्रोतांचा वाटा निम्म्याहून अधिक ( सध्या सुमारे 256 गिगावॅट) आहे, तसेच भारताने आपले राष्ट्रीय स्तरावरील निर्धारित योगदान (NDC) उद्दिष्ट 2030 या निर्धारित कालावधीच्या पाच वर्षे आधीच साध्य केले आहे, हे यादव यांनी अधोरेखित केले. भारत 2035 पर्यंतचे आपले सुधारित राष्ट्रीय स्तरावरील निर्धारित योगदान लवकरच जाहीर करेल आणि आपला पहिला द्विवार्षिक पारदर्शकता अहवाल ठरलेल्या वेळी सादर करेल, असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि जागतिक जैवइंधन आघाडीसारख्या उपक्रमांमधून भारताचे जागतिक नेतृत्त्व दिसून येते तसेच वर्ष 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचा टप्पा गाठण्यासाठी सुरु असलेल्या भारताच्या प्रयत्नांना अणु मिशन आणि हरित हायड्रोजन मिशन यांनी गती दिल्याचे यादव यांनी सांगितले.. कार्बन सिंक आणि जलाशयांच्या संवर्धन आणि विकासाबाबत पॅरिस कराराच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने, केवळ 16 महिन्यांत समुदाय-प्रणित उपक्रमांतर्गत 2 अब्जाहून अधिक झाडे लावण्यात आली, असे यादव यांनी सांगितले. खरोखरच हे सामूहिक हवामान कृतींच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.
जागतिक हवामान विषयक सहकार्य आणि न्याय याप्रति भारताच्या वचनबद्धतेचा यादव यांनी पुनरुच्चार केला. " हे पुढील दशक अंमलबजावणीचे, लवचिकतेचे आणि सामायिक जबाबदारीचे असावे " असे ते म्हणाले.
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2191141)
Visitor Counter : 14