संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राजस्थानमध्ये 'अजेय वॉरियर-25’ या भारत-युनायटेड किंग्डम संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाचा प्रारंभ

Posted On: 17 NOV 2025 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 नोव्हेंबर 2025

 

राजस्थानमध्ये महाजन फिल्ड फायरिंग रेंजेस मध्ये विदेश प्रशिक्षण केंद्रात आठव्या 'अजेय वॉरियर-25’ या भारत-युनायटेड किंग्डम संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाचा प्रारंभ झाला. हा 14 दिवसांचा द्विपक्षीय सराव 17 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होत आहे.

या युद्धसरावात एकूण 240 जवान सहभागी असून, त्यात भारतीय लष्कर आणि ब्रिटिश लष्कराचे समसमान प्रतिनिधित्व आहे. भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व शीख रेजिमेंटचे जवान करत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या एका आदेशान्वये हा युद्धसराव केला जात असून, निमशहरी वातावरणातील दहशतवाद-विरोधी कारवाया हा त्याचा प्रधान विषय आहे. येत्या दोन आठवड्यांत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात- ब्रिगेड स्तरावर संयुक्तपणे मोहिमेचे नियोजन, एकात्मिक तंत्रसराव, सिम्युलेशनवर आधारित परिस्थिती आणि वास्तव जीवनात अचानक उद्भवणाऱ्या स्थितीचा नमुना उभारून त्यावेळी करण्याच्या दहशतविरोधी कारवाईचे कंपनीस्तरावरील क्षेत्रीय प्रशिक्षण उपक्रम यांचा अंतर्भाव असेल. उभय देशांमधील सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतीची देवाणघेवाण करणे, तांत्रिक नैपुण्य वाढवणे, आणि आह्वानात्मक स्थितीत जटिल मोहिमा व्यवस्थापित करण्यासाठी समन्वयाने प्रतिसाद देणे अशा उद्देशांनी हा युद्धसराव केला जात आहे.

2011 पासून दर दोन वर्षांनी अजेय वॉरियर हा युद्धसराव आयोजित केला जात असून, आता त्याला भारतीय लष्कर आणि ब्रिटिश लष्कर यांच्यातील प्रमुख उपक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 2025 च्या युद्धसरावाद्वारे, व्यावसायिकता, सहकार्य आणि जागतिक शांतता तसेच प्रादेशिक स्थैर्याप्रति वचनबद्धता या सामायिक मूल्यांना बळकटी मिळणार आहे.  

 

* * *

शैलेश पाटील/जाई वैशंपायन/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2191061) Visitor Counter : 5