इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

44 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (IITF 2025) मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या दालनाचे केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन


सुरक्षित, विश्वासार्ह आणि समावेशक एआय परिसंस्था निर्माण करण्याप्रति  भारताची  वचनबद्धता अधोरेखित करणाऱ्या व्यापार मेळाव्यात Meity च्या दालनाला अभ्यागतांचा उत्साही प्रतिसाद

या दालनात डिजिटल इंडिया, इंडियाएआय आणि मायगव्ह हे तीन प्रमुख संकल्पनाधारित विभाग एकत्र असून ते  अभ्यागतांना डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी भारताच्या दृष्टिकोनाची आकर्षक माहिती प्रदान करतात

भारत-एआय इम्पॅक्ट शिखर परिषद  2026 च्या पार्श्वभूमीवर  जबाबदार एआय मधील कृती ते प्रभावापर्यंत भारताचा प्रवास दाखवणाऱ्या इंडियाएआय झोनचे अनावरण

Posted On: 15 NOV 2025 12:11PM by PIB Mumbai


भारत मंडपम येथे 44 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय  राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी MeitY च्या दालनाचे उद्घाटन केले.

या दालनात डिजिटल इंडिया, इंडियाएआय आणि मायगव्ह हे तीन प्रमुख संकल्पनाधारित विभाग एकत्र असून ते  अभ्यागतांना डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा , सामाजिक कल्याणासाठी  कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सहभागात्मक प्रशासनाबाबत भारताच्या दृष्टिकोनाची माहिती आकर्षक पद्धतीने प्रदान करतात.

इंडिया-एआय इम्पॅक्ट शिखर परिषद  2026 च्या निमित्ताने या दालनात इंडियाएआय झोन हा एक प्रमुख उपक्रम घोषित करण्यात आला आहे, जो सुरक्षित, विश्वासार्ह आणि समावेशक एआय परिसंस्था निर्माण करण्याप्रति भारताची वचनबद्धता अधोरेखित करतो. "कृती ते प्रभाव" या भारताच्या प्रवासाचे चित्रण दाखवण्यासाठी डिझाइन केलेला हा  झोन जबाबदार एआयमधील देशाची प्रगती प्रदर्शित करतो आणि अभ्यागतांना शिखर परिषदेची उत्कंठावर्धक  माहिती प्रदान करतो.

यावेळी मंत्र्यांनी इंडियाएआय दालनाच्या  समर्पित अनुभव क्षेत्राला देखील भेट दिली जिथे इंडियाएआय मिशनचे सात धोरणात्मक स्तंभ - एआय कोश, अनुप्रयोग, भविष्यातील कौशल्ये, स्टार्टअप्स, संगणक, पायाभूत मॉडेल्स आणि सुरक्षित आणि विश्वसनीय एआय प्रदर्शित केले आहेत.

त्यांनी एआय कोश, वास्तविक जगातील एआय वापर , भविष्यातील कौशल्य उपक्रम आणि मिशन अंतर्गत उभारली जाणारी व्यापक परिसंस्था दर्शविणाऱ्या परस्परसंवादी स्क्रीन्सची देखील माहिती घेतली. मंत्र्यांनी उत्साहाने दालनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांशी तसेच इंडियाएआय टीमशी मोकळेपणाने  संवाद साधला आणि त्यांना भारताच्या एआय प्रवासाला गती देण्यासाठी प्रोत्साहित केले.

दालनात  इंडिया-एआय इम्पॅक्ट एक्स्पो, पिच फेस्ट, ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंजेस आणि इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट  2026 संबंधित  इतर अनेक उपक्रमांचे प्रदर्शित  करण्यात आले:

जागतिक प्रभाव आव्हाने: या झोनमध्ये शिखर परिषदेची तीन प्रमुख जागतिक प्रभाव आव्हाने आहेत ज्यासाठी  6 कोटी रुपये  पर्यंत  एकत्रित बक्षीस रक्कम असून त्यामध्ये मार्गदर्शन, गुंतवणूकदार सुविधा  आणि क्लाउड क्रेडिट्स उपलब्ध आहेत.

सर्वांसाठी एआय: समावेशक, उच्च-प्रभावी नवोन्मेषाला चालना देण्यासाठी प्रमुख क्षेत्रांमध्ये व्यापक एआय सोल्यूशन्स  आमंत्रित करते.

एआय बाय हर  : महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मसह भागीदारीत समर्पित दृश्यमानता आणि संसाधनांद्वारे महिलांच्या नेतृत्वाखालील एआय नवोन्मेषाना  समर्थन देते.

YUVAi: 13-21 वयोगटातील तरुण नवोन्मेषकांना कल्याण -आधारित  एआय प्रकल्प तयार करण्यास आणि जागतिक स्तरावर त्यांची  कल्पना प्रदर्शित करण्यास सक्षम करते.

एआय आणि त्याच्या प्रभावावरील संशोधन : भारत आणि ग्लोबल साऊथ मधील आघाडीच्या संशोधकांना एकत्र आणून आघाडीचे, धोरण-संबंधित एआय कार्य सादर करते .

इंडियाएआय-आयईए इंटरनॅशनल कॉल फॉर अ‍ॅबस्ट्रॅक्ट्स: इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये अनावरण करण्यात येणाऱ्या एआयच्या वास्तविक-जगातील प्रभावावरील केसबुकसाठी कॉल फॉर अ‍ॅबस्ट्रॅक्ट्स  प्रदर्शित करते.

एआय एक्स्पो शोकेस: शिखर परिषदेच्या जागतिक स्तरावरील एआय एक्स्पोची  प्रारंभिक झलक सादर करते ज्यात उद्योग आणि समाजात परिवर्तन घडवणाऱ्या अभूतपूर्व अनुप्रयोगांचा आणि कृतीशील संवादांचा समावेश आहे.

इंडियाएआय टिंकरप्रेन्योर: इयत्ता 6 ते 12 मधील विद्यार्थ्यांसाठी एक राष्ट्रीय बूटकॅम्प अधोरेखित करतो जो मूलभूत एआय कौशल्ये तयार करतो आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावी नवोपक्रमांना प्रोत्साहन देतो.

आयआयटीएफ 2025 मधील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे  दालन  समावेशकता , नवोन्मेष आणि जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा भारताचा प्रवास प्रतिबिंबित करतो. या उत्कंठावर्धक प्रदर्शनाला अभ्यागत भेट देऊन वास्तविक जगातील वापराच्या केसेसचा शोध घेऊ शकतात आणि भारत नागरिक-प्रथम, भविष्यासाठी सज्ज डिजिटल अर्थव्यवस्थेला कसा आकार देत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात.

***

शैलेश पाटील/सुषमा काणे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2190429) Visitor Counter : 3