वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिवांनी मुंबईतील वस्त्रोद्योग संस्था, निर्यात परिषदा आणि संशोधन संघटनांच्या कामकाजाचा आढावा घेतला
Posted On:
13 NOV 2025 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2025
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव आणि वस्त्रोद्योग समितीच्या अध्यक्ष नीलम शमी राव, वस्त्रोद्योग मंत्रालया अंतर्गत कार्यरत विविध संस्थांमध्ये सध्या सुरू असलेले कार्यक्रम, संस्थात्मक कामगिरी आणि धोरण अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आजपासून दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी हातमाग आणि संलग्न क्षेत्राशी संबंधित उपक्रमांचा आढावा घेतला. विकास आयुक्त (हातमाग) डॉ. एम. बीना त्यांच्या समवेत होत्या.
या भेटीदरम्यान, नीलम शमी राव यांनी महाराष्ट्र सरकारच्या प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) अंशु सिन्हा, आयएएस आणि महाराष्ट्र सरकारच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रात केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये राज्य आणि केंद्र दोन्हीचा समन्वय साधण्यावर, तसेच राज्यात या क्षेत्राच्या विकासावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.

या भेटीची सुरुवात वस्त्रोद्योग समितीच्या सविस्तर आढावा बैठकीने झाली. सचिवांनी वस्त्रोद्योग समिती कायदा, 1963 मध्ये वस्त्रोद्योग समितीच्या संस्थापकांनी नमूद केलेल्या कामांसह, संस्थेच्या एकूण कामकाजाची पाहणी केली, आणि कायद्याची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपल्या उपक्रमांची पुनर्रचना करण्याची, त्याला नवी दिशा देण्याची, आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचा दृष्टिकोन पूर्ण करण्यासाठी या उद्योगाला पाठबळ देण्याची सूचना केली. त्यांनी वैज्ञानिक, तांत्रिक आणि आर्थिक संशोधनातील उद्योगाच्या वाढत्या गरजांवर भर दिला आणि वस्त्रोद्योग समितीच्या कामाचे श्रेय या गोष्टींना दिले, तसेच उद्योग आणि सरकार या दोघांच्याही आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्राधान्यक्रमांची पुनर्रचना करण्याची सूचना केली. वस्त्रोद्योग समितीने या क्षेत्राच्या वास्तविकतेबद्दल माहिती देऊन उद्योग आणि सरकार यांच्यातील दुव्यासारखे काम करायला हवे, जेणेकरून वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या धोरणात्मक हस्तक्षेपांच्या मदतीने उद्योगांना या समस्या कमी करायला मदत होईल, असे त्या म्हणाल्या.

त्यानंतर राव यांनी सिंथेटिक अँड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च असोसिएशनला (एसएएसएमआयआरए) भेट दिली. SASMIRA च्या सध्या सुरु असलेल्या तांत्रिक वस्त्रोद्योग, मानवनिर्मित तंतू आणि हरित वस्त्राच्या नवोन्मेषातील संशोधन आणि विकास यावर या आढावा भेटीत भर देण्यात आला. सचिवांनी प्रशिक्षण आणि शिक्षण, तांत्रिक वस्त्रोद्योग यंत्रणेला प्रोत्साहन देणे, औद्योगिक चाचणी सुविधा आणि कृत्रिम क्षेत्राची स्पर्धात्मकता बळकट करण्याच्या उद्देशाने क्षमता-निर्मिती कार्यक्रमांमध्ये SASMIRA देत असलेल्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी SASMIRA च्या संशोधन उपक्रमांना जागतिक शाश्वतता आणि पुनर्वापर उद्दिष्टांशी जोडण्याच्या गरजेवर भर दिला.
विकास आयुक्त (हातमाग) यांच्या कार्यालयातील विणकर सेवा केंद्रात (डब्ल्यूएससी), राव आणि डॉ. बीना यांनी, राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम, क्लस्टर विकास कार्यक्रम आणि प्रदर्शने, डिझाइन नवोन्मेष आणि विणकरांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म यांसारखे विपणन उपाय, यासह इतर प्रमुख योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. भारताच्या हातमाग उत्पादनांची देशात आणि निर्यातीमधील पोहोच वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाच समावेश, ई-कॉमर्स सक्षमीकरण आणि हातमाग चिन्हाला प्रोत्साहन, यासारख्या उपायांचे महत्त्व सचिवांनी अधोरेखित केले.

त्यानंतर, या प्रतिनिधीमंडळाने सुती वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषदेला (TEXPROCIL) भेट दिली, आणि सुती कापड निर्यात क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी निर्यात स्पर्धात्मकता, बाजारपेठेतील वैविध्य, कस्तुरी कॉटन भारत आणि मूल्यवर्धित सूती वस्त्र उत्पादनांना प्रोत्साहन, यावर चर्चा झाली. व्यापार मेळे, खरेदीदार-विक्रेता बैठका आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग उपक्रमांद्वारे निर्यातदारांना पाठिंबा देण्याच्या टेक्सप्रोसिलच्या सक्रिय भूमिकेची राव यांनी प्रशंसा केली. मानवनिर्मित वस्त्रोद्योग निर्यात प्रोत्साहन परिषदेतही (MATEXIL) अशीच आढावा बैठक घेण्यात आली. निर्यात कामगिरीचा कल, कृत्रिम आणि मिश्र धागा कापड निर्यातदारांना भेडसावणारी आव्हाने आणि भारतीय मानवनिर्मित धाग्यांचे जागतिक पातळीवर अस्तित्व वाढवण्याच्या धोरणांचा सचिवांनी आढावा घेतला. त्यांनी परिषदेला शाश्वतता-संचालित निर्यात मॉडेल्स स्वीकारण्यासाठी आणि मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एफटीए आणि व्यापार करारांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.

संध्याकाळी, सचिवांनी वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयात एक सर्वसमावेशक आढावा बैठक घेतली, यामध्ये मंत्रालयाच्या पीएम मित्र (PM MITRA) पार्क्स योजना, वस्त्रोद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना आणि समर्थ (SAMARTH)-कौशल्य विकास योजना, यासारख्या मंत्रालयाच्या प्रमुख योजनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. संध्याकाळी, राव यांनी प्रमुख उद्योग संघटनांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी धोरणात्मक अभिप्राय, शाश्वतता उपक्रम आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन यावर वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील आघाडीच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली.
* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2189863)
Visitor Counter : 12