कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते नवी दिल्लीत शेतकऱ्यांना पीक वाण संरक्षक पुरस्कारांचे वितरण

Posted On: 12 NOV 2025 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्हेंबर 2025

 

केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री  शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीतील पुसा कॅम्पसमधील सी. सुब्रमण्यम सभागृहात आयोजित ‘पीक वाण संरक्षक पुरस्कार वितरण समारंभात सहभागी झाले. हा कार्यक्रम पीक वाण आणि कृषक अधिकार संरक्षण कायदा (PPV&FRA), 2001 च्या रौप्य महोत्सवी वर्षाबद्दलआणि प्राधिकरणाच्या 21 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कृषी मंत्र्याच्या हस्ते बियाणे संवर्धन आणि जैवविविधतेमध्ये केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल देशभरातील निवडक  पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

तेलंगणामधील समुदाय बियाणे बँक, पश्चिम बंगाल मधील पूर्व बर्धमान येथील शिक्षा निकेतन, मिथिलांचल मखाना उत्पादक संघ,  आसाम मधील CRS-ना दिहिंग तेन्गा उन्नयन समिती, उत्तराखंड मधील  भूपेंद्र जोशी, केरळ मधील टी. जोसेफ, बिहार मधील लक्षण प्रमाणिक, अनंतमूर्ती जे., नकुल सिंह आणि उत्तराखंड मधील नरेंद्र सिंह यांचा विविध श्रेणींमधील पुरस्कार विजेत्यांचा समावेश होता.

गेल्या दोन दशकांत पीक वाण  आणि कृषक अधिकार संरक्षण प्राधिकरणाने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा शिवराज सिंह यांनी आपल्या भाषणात गौरवपूर्ण  उल्लेख केला. भारतीय कृषी पद्धती या जगातील सर्वात प्राचीन पद्धतींपैकी एक असून त्यांनी देशाच्या संस्कृतीचा पाया रचला आहे. कित्येक देशी पिकांचे प्रकार पोषण आणि पर्यावरणीय संतुलनात अतिशय महत्त्वाचे असल्याचे  त्यांनी सांगितले. पिकांची कित्येक पारंपरिक वाणे अस्तंगत होण्याच्या मार्गावर असताना शेतकरी बांधवानी केलेल्या कठोर परिश्रमामुळे त्यांची बियाणे जतन करण्यात यश मिळाल्याचे ते म्हणाले.

या कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज अधोरेखित करत शिवराज सिंह यांनी सांगितले की विविध हितधारकांकडून मिळालेल्या शिफारशींनुसार पीक वाण आणि कृषक अधिकार संरक्षण कायद्यात बदल केला जाईल.

पीक वाण आणि कृषक अधिकार संरक्षण कायद्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये आवश्यक तेवढी जागरूकता नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आजही अनेक शेतकरी या कायद्याच्या लाभांविषयी अनभिज्ञ आहेत. नोंदणी प्रक्रियेत काही तांत्रिक गुंतागुंती आहेत ज्या सुलभ करणे आवश्यक आहे. तसेच पारदर्शकता वाढवणे आणि खरे फायदे तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे,” असे  शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे नमूद केले.

केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वनस्पतींच्या वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण (PPV&FRA) आणि इतर संबंधित कायद्यांमध्ये उत्तम समन्वय साधला जाण्याची गरजही यावेळी अधोरेखित केली. स्वदेशी वाणांचे ज्ञान जपण्यासाठी एक मजबूत वैज्ञानिक माहितीसाठा तयार करावा असे आवाहनही त्यांनी केले.  जे शेतकरी आपली बियाणे आणि जैवविविधतेचे जतन-संवर्धन करतात, तेच आपल्या कृषी वारशाचे खरे संरक्षक आहेत असे ते म्हणाले. अशा शेतकऱ्यांची दखल घेतली गेली पाहिजे, त्यांचे सक्षमीकरण केले पाहिजे आणि त्यांना पाठबळ पुरवले पाहिजे असे ते म्हणाले.

  

पार्श्वभूमी:

वनस्पतींच्या वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण (PPV&FRA) ही केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितील वनस्पतींच्या वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क अधिनियम, 2001 नुसार स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. या प्राधिकरणाचे मुख्यालय नवी दिल्ली इथे आहे.

वनस्पतींच्या वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाची (PPV&FRA) प्राथमिक उद्दिष्टे खाली नमूद केली आहेत :

  • वनस्पतींची नवीन वाणे विकसित करण्यासंबंधातील नवोन्मेषासाठी वनस्पती वाण उत्पादकांना बौद्धिक मालमत्ता हक्क प्रदान करणे.
  • पारंपरिक वाणांचे आणि जैवविविधतेचे जतन-संवर्धन करणाऱ्या शेतकरी आणि समुदायांच्या कामाची दखल घेणे आणि त्यांना पुरस्कार देणे.
  • नोंदणीकृत वाणांच्या शेतात जतन केलेल्या बियाण्यांचे जतन-संवर्धन करणे, त्याचा वापर करणे, ती पेरणे, दुबार पेरणे, त्यांची देवाणघेवाण करणे, ते परस्परांसोबत सामायिक करणे आणि विकण्यासंबंधीच्या शेतकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणाला चालना देणे.
  • वनस्पतींच्या वाणांचे उत्पादन तसेच कृषी क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देणे.
  • वनस्पतींच्या वाणांची राष्ट्रीय पातळीवर नोंदही राखणे तसेच मौलिक जनुकीय स्त्रोतांशी संबंधित संसाधनांच्या जतन-संवर्धनासह, दस्तऐवजीकरणाची सुनिश्चिती करणे.

हे प्राधिकरण शेतकऱ्यांकडील पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण करण्यासह, स्वदेशी वाणांच्या वापरामुळे मिळणारे लाभ समन्यायी तत्वावर सामायिक केले जातील याची सुनिश्चिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. भारताच्या कृषी जैवविविधतेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने वनस्पतींच्या वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाने (PPV&FRA), वैज्ञानिक नवोन्मेष आणि पारंपरिक आकलनात दुवा साधला आहे. या माध्यमातून या व्यवस्थेने त्या त्या बियाणांचे सार्वभौमत्व सुनिश्चित करणारे तसेच शाश्वत विकासाला चालना देणारा एक मुख्य घटक म्हणून ओळख निर्माण केली आहे.

गेल्या 21 वर्षांत, वनस्पतींच्या वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाने (PPV&FRA) हजारो नवीन आणि पारंपरिक वाणांची नोंद केली आहे, त्यासोबतच शेतकरी समुदायांनी दिलेल्या विविधांगी योगदानाची दखलपूर्ण नोंदही या व्यवस्थेने घेतली आहे. याव्यतिरिक्त त्या त्या कामाची आर्थिक आणि संस्थात्मक पातळीवरील प्रोत्साहनाच्या स्वरुपात दखल घेऊन, जतन - संवर्धनाच्या प्रयत्नांनाही चालना दिली आहे.

या अधिनियमाचा रौप्यमहोत्सव आणि प्राधिकरणाचा 21 वा स्थापना दिवस हा भारताच्या समावेशक, शाश्वत आणि शेतकरी केंद्रित कृषी विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. आत्मनिर्भर भारतासाठी आखलेल्या तत्त्वांनुसार एका लवचिक आणि जैवविविधतेने परिपूर्ण कृषी परिसंस्थेची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने प्राधिकरणाने आपली वाटचाल सुरु ठेवली आहे.

 

* * *

शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्‍के/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189397) Visitor Counter : 27