आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘जनजातीय गौरव वर्ष पंधरवडा’ अंतर्गत ‘आदी चित्र’ या राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शनाचे मुंबईत आयोजन

Posted On: 09 NOV 2025 6:49PM by PIB Mumbai

 

मुंबई, नोव्हेंबर 9, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकारच्या आदिवासी कामकाज मंत्रालयाने कला, संस्कृती, उद्योजकता आणि शाश्वत उपजीविका या क्षेत्रांचे एकत्रीकरण करून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या भावनेतून आदिवासी कामकाज मंत्रालय आणि भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित (टीआरआयएफइडी) यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘आदी चित्र’   – राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जनजातीय गौरव वर्ष पंधरवडा’ (1–15 नोव्हेंबर 2025) अंतर्गत धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी, 10 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2:00 वाजता, प्रभादेवी येथील पु . ल .  देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे होणार आहे.

या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास विभागाचे सचिव आणि आदिवासी कामकाज मंत्रालयाचे संचालक उपस्थित राहणार आहेत. आदिवासी कामकाज मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि  टीआरआयएफइडी   महाराष्ट्र यांच्या समन्वयाने आयोजित हे आठवडाभर चालणारे प्रदर्शन 10 ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दररोज सकाळी 11:00 ते सायंकाळी 7:00 या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन, मूल्ये आणि योगदान यांच्या सन्मानार्थ समर्पित असलेल्या, जनजातीय गौरव दिवसाआधी (15 नोव्हेंबर 2025) देशभरात साजऱ्या होणाऱ्या उत्सवांच्या कार्यक्रमाचा हा अविभाज्य भाग आहे.

100 हून अधिक उत्कृष्ट आदिवासी कलाकृती एकत्र समोर आणणारे 'आदि चित्रभारताच्या जिवंत स्थानिक कला परंपरांचा एक सर्वसमावेशक प्रवास घडवते. या प्रदर्शनामध्ये-

महाराष्ट्रातील वारली चित्रे

ओडिशातील सौरा आणि पट्टचित्रे कला

मध्य प्रदेशातील गोंड आणि भिल्ल कला

गुजरातमधील पिथोरा चित्रे

या प्रत्येक कलाकृतीतून निसर्ग, अध्यात्म, समुदाय जीवन यांच्यातील गहिरे नाते प्रतिबिंबित होते- सुसंवाद, लवचिकता आणि माणूस आणि त्याच्या  पर्यावरणाशी असलेल्या  अनादि बंधनाच्या कथा सांगते.

भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे रक्षण करण्यासाठी या पारंपरिक कला प्रकारांचे जतन आणि प्रचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आदिवासी कला ही केवळ सौंदर्याच्या अभिव्यक्तिचे माध्यम नाही तर पारंपरिक ज्ञान, परिसंस्थेचे ज्ञान आणि स्थानिक अस्मितेचे  भांडार देखील आहे.

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2188124) Visitor Counter : 6