विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लक्झेंबर्गच्या राजदूतांनी घेतली डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट, अंतराळ आणि विज्ञान सहकार्यातील संबंध मजबूत करण्याबाबत केली चर्चा


भारत आणि लक्झेंबर्ग युरोपियन बाजारपेठेत भारतीय अंतराळ स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या मार्गांचा शोध घेणार

Posted On: 06 NOV 2025 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 नोव्हेंबर 2025

 

भारत आणि लक्झेंबर्ग विज्ञान तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे लक्झेंबर्गचे राजदूत ख्रिश्चयन बीव्हर यांची भेट घेतली. या बैठकीला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अंतराळ विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सायबर सुरक्षा, क्वांटम तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी यासारख्या नवोन्मेष आधारित क्षेत्रातील संयुक्त उपक्रमांना पुढे नेण्यावर भर देण्यात आला.

बैठकीतील चर्चेचा एक महत्त्वाचा विषय होता, लक्झेंबर्गमध्ये भारतीय अंतराळ स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देणे, ज्यामुळे भारताच्या वेगाने वाढणाऱ्या खाजगी अंतराळ परिसंस्थेला युरोपच्या प्रगत अंतराळ अर्थव्यवस्थेशी येईल. सरकारी उपक्रम आणि इस्रो च्या उद्योग-अनुकूल धोरणामुळे भारतातील उत्साही स्टार्ट-अप क्षेत्र जागतिक सहकार्यासाठी प्रचंड संधी निर्माण करत आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. मजबूत अंतराळ वित्त आणि नवोन्मेष परिसंस्थेसाठी ओळखले जाणारे लक्झेंबर्ग, भारतीय अवकाश स्टार्ट-अप्सना युरोपियन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी, संयुक्त संशोधन आणि विकास उपक्रमांसाठी तसेच गुंतवणूकीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून काम करू शकते, असे सिंह यांनी सुचवले. यामुळे दोन्ही देशात परस्पर लाभाचे आणि दीर्घकालीन सहकार्य मजबूत होईल असेही त्यांनी सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी विज्ञान आणि नवोन्मेषात जागतिक नेतृत्व म्हणून भारताच्या उदयावर भर दिला. जगभरातील वैज्ञानिक प्रकाशने आणि स्टार्टअप उपक्रमांमध्ये भारताने पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवले आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने नवीकरणीय ऊर्जा, सायबर-भौतिक प्रणाली, क्वांटम तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था आणि परवडणारी आरोग्यसेवा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अनेक राष्ट्रीय मोहिमा सुरू केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीत परस्पर हिताच्या क्षेत्रात संयुक्त संशोधन आणि औद्योगिक संबंधांना चालना देण्यासाठी नवोन्मेषी कार्यक्रमांची रचना करण्यावर चर्चा झाली. उदयोन्मुख तंत्रज्ञान, ऊर्जा उपाय आणि अंतराळ नवोन्मेष या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत, त्यांच्या पूरक शक्तींची उभारणी करण्याबाबत दोन्ही बाजूंनी आशावाद व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्झेंबर्गच्या नेतृत्वाच्या शाश्वत जागतिक विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सामायिक दृष्टिकोनाला अनुसरून, अंतराळ आणि विज्ञान क्षेत्रातील भारत-लक्झेंबर्ग सहकार्याला या चर्चेतून नवीन चालना मिळेल, असा विश्वास डॉ. जितेंद्र सिंह यांनी बैठकीचा समारोप करताना व्यक्त केला.

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187150) Visitor Counter : 2