विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक एक लाख कोटी रुपयांच्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष निधी योजनेची केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली प्रशंसा, भारताच्या वैज्ञानिक प्रवासामधील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल असा व्यक्त केला विश्वास
Posted On:
05 NOV 2025 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक एक लाख कोटी रुपयांच्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष निधी योजनेची प्रशंसा केली आणि ही योजना भारताच्या वैज्ञानिक प्रवासातील एक परिवर्तनकारी टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
भारत मंडपम येथे आयोजित पहिल्या उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषदेत समारोपाचे भाषण करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी या तीन दिवसीय परिषदेच्या यशाबद्दल अभिमान आणि आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले की, या परिषदेने "भारत मंडपमला खऱ्या अर्थाने नवोन्मेषाच्या मंदिरात रूपांतरित केले, जिथे कल्पनांची प्रेरणेशी, संशोधनाची उपयुक्ततेशी आणि शोधाची दृढनिश्चयाशी सांगड घालण्यात आली.
मिशन 2047 च्या प्रेरणेने भारत वैज्ञानिक प्रतिभा, तंत्रज्ञान निर्मिती आणि नवोन्मेष-आधारित विकासाचे जागतिक केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. तरुण संशोधक आणि डीप-टेक स्टार्ट-अप्सच्या सहभागावर प्रकाश टाकताना, डॉ. सिंह म्हणाले की त्यांची ऊर्जा, कल्पकता आणि बांधिलकी हे "नव्या भारताच्या नवोन्मेषाचे चैतन्य" दर्शवते. पोस्टर आणि स्टार्ट-अप सत्रांनी सहकार्य आणि गुंतवणूक शोधणाऱ्या तरुण नवोन्मेषकांसाठी एक महत्त्वाचे नेटवर्किंग व्यासपीठ म्हणून काम केले, असे त्यांनी नमूद केले.
"आमच्या अनेक तरुण सहभागींनी शैक्षणिक सादरीकरणे देण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. भविष्यातील विज्ञान नेते म्हणून विकसित होण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे संशोधन कसे सादर करावे, यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे," असे ते म्हणाले.
मंत्र्यांनी सादरीकरणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि अध्ययनाचे परिणाम वाढवण्यासाठी पोस्टर सादरीकरणकर्त्यांसाठी आभासी कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला. डॉ. जितेंद्र सिंह यांनी असेही सुचवले की ESTIC च्या पुढील आवृत्त्यांमध्ये स्टार्ट-अप्स आणि गुंतवणूकदार यांच्यात संरचित संवाद संस्थात्मकरित्या स्थापित केले जाऊ शकतात, ज्यामुळे आश्वासक नवोन्मेषकांना संभाव्य भागीदारांशी जोडण्यास मदत मिळेल.
अशा कार्यक्रमांना उपस्थित असलेले गुंतवणूकदार फक्त निरीक्षण करण्यासाठी आलेले नसतात; ते ठोस सहकार्य शोधत असतात. जर आम्ही स्टार्ट-अप प्रोफाइलची योग्य गुंतवणूकदारांशी आगाऊ जुळणी केली, तर आम्ही उत्पादक संबंध सुलभ करू शकतो," असे त्यांनी पुढे सांगितले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, या परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पित केलेला 'संपूर्ण सरकार, संपूर्ण राष्ट्र' हा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणला आहे, ज्यामुळे विविध मंत्रालये, शिक्षण संस्था आणि उद्योग एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की ESTIC 2025 ही भारताच्या वैज्ञानिक उत्क्रांतीमधील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. परिषदेतून पुढे आलेले विचार आणि सहकार्य विकसित भारत 2047 शी संरेखित धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये रूपांतरित केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
"आमचे उद्दिष्ट स्पष्ट आहे: भारताला विज्ञान, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाचे जागतिक पॉवरहाऊस बनवणे. तुमच्या कल्पना, तुमचे सहकार्य आणि तुमचे प्रयोग हे आत्मनिर्भर, भविष्यासाठी सज्ज असलेल्या राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत," असे ते म्हणाले.




निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186781)
Visitor Counter : 5