विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
ईएसटीआयसी 2025 मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने घडवले प्रगत साहित्य आणि उत्पादन क्षेत्रातील भारताच्या भरारीचे दर्शन
Posted On:
05 NOV 2025 7:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025
ईएसटीआयसी 2025 - अर्थात ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष सशक्तीकरण परिषद 2025' च्या तिसऱ्या दिवशी सीएसआयआर म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने अतिशय परिणामकारक असे तांत्रिक सत्र घेतले. प्रगत साहित्य आणि उत्पादन क्षेत्रातील भारताच्या भरारीचे दर्शन यातून घडले. या सत्राने आघाडीचे शास्त्रज्ञ, नवोन्मेषक आणि उद्योजक यांना एकत्र आणून देशाच्या नवोन्मेषी परिसंस्थेला आकार देणाऱ्या परिवर्तनकारी तंत्रज्ञानाविषयी चर्चा घडवून आणली.
सीएसआयआर च्या महासंचालक डॉ.एन.कलाइसेल्वी यांनी प्रगत साहित्य आणि उत्पादन क्षेत्राविषयीच्या पूर्ण सत्राचे अध्यक्षस्थान भूषवले. उत्पादन साकार करण्याची प्रक्रिया, औद्योगिक संरचना, आणि शाश्वतता हे सर्व प्रगत साहित्याद्वारे कशाप्रकारे पुन्हा परिभाषित केले जात आहे, यावर सत्राने प्रकाश टाकला.
डॉ.एन.कलाइसेल्वी यांनी या सत्रात बोलताना विज्ञान, संशोधन तथा विकास आणि प्रगत साहित्य हे 2047 च्या विकसित भारताचे आधारस्तंभ आहेत, यावर भर दिला. साहित्य विज्ञान, स्वच्छ ऊर्जा, जैवतंत्रज्ञान आणि उगवत्या तंत्रज्ञान क्षेत्रांतील विलक्षण प्रगतीनेच भारताच्या विकासवाटेला आकार येणार आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. सीएसआयआर आणि भारताच्या प्रमुख वैज्ञानिक संस्था अद्ययावत संशोधनात देशाला आघाडीवर नेत असताना; तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर आणि नवोन्मेष-संचालित भविष्याची पायाभरणीच भारत करत आहे- असेही त्या म्हणाल्या.
कल्पना, विज्ञान आणि प्रगत तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणणारा आणि भविष्यासाठी सज्ज तसेच ज्ञानशक्तीधारी भारताचे चित्र वास्तवात आणण्यास वेग देणारा अत्यंत प्रभावी मंच म्हणून ईएसटीआयसी 2025 काम करत आहे- असेही त्यांनी नमूद केले.
आघाडीच्या नवोन्मेषक आणि उद्योजकांनी दिलेल्या उत्तम आणि माहितीपूर्ण सादरीकरणांचाही या सत्रात समावेश होता.
वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक आघाड्यांवर भारताला पुढे नेण्यात सीएसआयआरची अविचल वचनबद्धता या यशस्वी अशा समारोप सत्रातून अधोरेखित झाली. कल्पना, विषयाचे सखोल ज्ञान, आणि नवोन्मेष यांचे या परिषदेत झालेले आदान-प्रदान पाहता हेच लक्षात येते की- संशोधक, उद्योग-धुरीण आणि धोरणकर्ते यांच्यातील सहयोगात्मक प्रयत्नांमुळे एका ज्ञानचालित अर्थव्यवस्थेकडे देशाची वाटचाल वेगाने होत आहे. विकसित भारत 2047 कडे भारत वाटचाल करत असताना, येथे दिसून आलेले प्रगत साहित्य आणि उत्पादन क्षेत्रातील उपयोजित संशोधन, स्वयंपूर्णता, शाश्वत प्रगती, आणि जागतिक स्पर्धात्मकता यांसाठी आधारभूत ठरेल. नवोन्मेषाचे जागतिक ऊर्जाकेंद्र म्हणून भारताचे भवितव्य घडवणारी ही प्रगती जारी ठेवण्याचे उद्देश्य घेऊन, सहभागी या परिषदेतून परतले.


निलीमा चितळे/जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186706)
Visitor Counter : 10