वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल न्यूझीलंडला भेट देणार
Posted On:
04 NOV 2025 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल 5 नोव्हेंबर 2025 रोजी न्यूझीलंडला भेट देणार असून न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅकक्ले यांच्याशी सध्या सुरु असलेल्या मुक्त व्यापार करार (एफटीए) वाटाघाटींवर चर्चा करतील. ही भेट एफटीए प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि अधिक व्यापक व परस्पर हितावह आर्थिक भागीदारी निर्माण करण्याप्रति दोन्ही देशांची सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित करते.
भारत-न्यूझीलंड एफटीए वाटाघाटींची चौथी फेरी 3 नोव्हेंबर 2025,रोजी ऑकलंड येथे सुरू झाली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संवाद अधिक दृढ करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या भेटीदरम्यान, गोयल भारत आणि न्यूझीलंडमधील व्यापार, गुंतवणूक आणि नवोन्मेष संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होतील. यामध्ये न्यूझीलंडच्या व्यापारी समुदायातील प्रमुख सदस्य आणि भेट देणाऱ्या भारतीय उद्योग प्रतिनिधी मंडळाबरोबर समर्पित संवादाचा समावेश आहे, ज्यामुळे दोन्ही देशांच्या खाजगी क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्य वाढेल.
दुपारी ऑकलंडमध्ये न्यूझीलंड-भारत उद्योग मंच आयोजित केला जाईल, त्यानंतर उत्साही भारतीय समुदायाच्या सदस्यांबरोबर सामुदायिक संवाद कार्यक्रम होईल.
पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅकक्ले यांच्यात एक विशेष संवाद देखील होईल, ज्याचे संचालन ऑकलंड बिझनेस चेंबरचे सीईओ सायमन ब्रिजेस करतील. हा संवाद व्यापार सहकार्य वाढवणे, आर्थिक अभिसरणाची नवीन क्षेत्रे ओळखणे आणि नवोन्मेष , तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासात सहकार्य वाढवणे यावर केंद्रित असेल.
या संवादात उद्योग धुरीण , चेंबर ऑफ कॉमर्स आणि न्यूझीलंडमधील सरकारी प्रतिनिधींचा सहभाग अपेक्षित आहे, ज्यामुळे द्विपक्षीय संबंधांमधील वाढत्या गतीला आणि मजबूत, भविष्याभिमुख आर्थिक भागीदारीसाठी सामायिक दृष्टिकोनाला दुजोरा मिळेल.
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186491)
Visitor Counter : 6