कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 4.0 अंतर्गत अहमदाबादमधील टागोर हॉल इथे 4 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य शिबिराचे आयोजन
Posted On:
04 NOV 2025 9:06AM by PIB Mumbai
कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या अखत्यारीतील निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या वतीने 1 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 4.0, अर्थात या मोहिमेचा चौथा टप्पा राबवला जाणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया आणि जीवन सुलभतेच्या उद्दिष्टांना अनुसरूनच या मोहीमेची आखणी केली गेली आहे. ही मोहिम म्हणजे निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी राबवला जात असलेला एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.
देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 4.0 अंतर्गत, दूरसंवाद विभागाच्या वतीने 4 नोव्हेंबर 2025 रोजी अहमदाबादमधील पालडी येथील टागोर हॉल इथे एका भव्य शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे सचिव आणि विभागातील वरिष्ठ अधिकारी या शिबिराला भेट देणार आहेत. निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या जीवन प्रमाणपत्रांची विविध डिजिटल माध्यमांतून नोंदणी करण्यासाठी मदत करणे हे या भव्य शिबिराचे उद्दिष्ट आहे. यासोबतच जिथे जिथे आवश्यकता भासेल, तिथे तिथे आधार नोंदीच्या अद्ययावतीकरणासाठी, आणि संबंधित तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या वतीने सहकार्यपूर्ण पाठबळही पुरवले जाणार आहे.
संतृप्तता आधारित प्रचार - प्रसार आणि उपलब्धतेचा अवलंब करून, 2,000 पेक्षा जास्त शहरे आणि नगरे, तसेच दोन कोटी निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचणे हा या मोहीमेचा उद्देश आहे. या मोहीमेअंतर्गत आधारवर आधारित चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर दिला गेला आहे. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना बायोमेट्रिक उपकरणांच्या वापरा अथवा गरजेशिवाय जीवन प्रमाणपत्र सुलभतेणे सादर करता येणार आहे. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या घरपोच डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवेच्या माध्यमातून, अति-ज्येष्ठ आणि दिव्यांग निवृत्तीवेतनधारकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 नोव्हेंबर 2024 प्रसारित झालेल्या आपल्या मन की बात या कार्यक्रमातील, आणि 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनानिमीत्त केलेल्या संबोधनांदनात डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गतच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्रासारख्या सुविधेमुळे देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीवेतन प्रक्रिया कशी सुलभ झाली आहे, हे अधोरेखित केले होते.
निवृत्तीवेतनधारकांचे डिजिटल समावेशन साध्य करण्याच्या उद्देशाने, एकसंधतेने काम करता यावे म्हणून, या मोहिमेच्या माध्यमातून बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, दूरसंवाद विभाग, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय माहिती केंद्र, केंद्रीय निवृत्त कर्मचारी मंडळ, बडोदा केंद्रीय निवृत्तीवेतनधारक संघटना, तसेच टपाल आणि टेलिग्राफ आणि इतर केंद्रीय सरकारी निवृत्तीवेतनधारक संघटना अशा गुजरातमधील निवृत्तीवेतनधारक कल्याण संघटना यांसारख्या सर्व प्रमुख भागधारक एकत्र आणले गेले आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या पोर्टलवर, विविध यंत्रणांद्वारे वितरीत होणाऱ्या डिजिटल जीवन प्रमाणपत्रांसंबंधीची वास्तव वेळेतील स्थितीगती पाहता येते.
या भव्य शिबिरादरम्यान निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे सचिव आणि दळणवळण लेखाधिकाराचे महानियंत्रक यांच्यासोबत संवादात्मक सत्रांचे आयोजनही केले गेले आहे. अहमदाबाद मधील या भव्य शिबिरात विविध विभाग आणि संस्थांमधील अंदाजे 2000 निवृत्तीवेतनधारक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 4.0 चा भाग म्हणून, गुजरात राज्यातील 82 शहरे आणि 107 ठिकाणी, विविध जिल्हे आणि उपविभागांना व्यापता येईल अशा स्वरुपातील शिबिरांचे आयोजनही केले जाणार आहे. या सर्व मोहिमांच्या सुरळीत आयोजनासाठी एकूण 107 समन्वय अधिकारीही त्यात सहभागी होणार आहेत.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेसारख्या सातत्यपूर्ण सुधारणा विषयक आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रमांच्या माध्यमातून जीवन सुलभता आणि निवृत्तीवेतनधारकांचे डिजिटल सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी
निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग वचनबद्ध आहे.
***
JaydeviPujariSwami/TusharPawar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186150)
Visitor Counter : 17