पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये 12,100 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण


दरभंग्यात अनेक विकास प्रकल्पांचे झालेले उद्घाटन आणि भूमिपूजनामुळे राज्यातील जनजीवन होणार सुलभ – पंतप्रधान

दरभंगा AIIMS (एम्स) च्या उभारणीमुळे बिहारच्या आरोग्य क्षेत्रात होणार मोठा आमूलाग्र बदल – पंतप्रधान

देशभरात आरोग्याबाबत, सरकार सर्वांगीण दृष्टिकोनातून कार्यरत – पंतप्रधान

‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ योजनेखाली मखाणा उत्पादकांना मोठा लाभ; मखाणा संशोधन केंद्राला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा, मखाणाला मिळाले भौगोलिक ओळख मानांकन (जी आय टॅग) – पंतप्रधान

आम्ही पाली भाषेला केला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान – पंतप्रधान

Posted On: 13 NOV 2024 1:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 नोव्‍हेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील दरभंगा येथे सुमारे 12,100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. आरोग्य, रेल्वे, रस्ते, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील  विकास प्रकल्पांचा यात समावेश आहे.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, शेजारच्या झारखंड राज्यात सध्या मतदान सुरू आहे आणि तेथील लोक विकसित भारतासाठी मतदान करत आहेत. त्यांनी झारखंडच्या नागरिकांना मोठ्या संख्येने पुढे येऊन मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांनी दिवंगत शारदा सिन्हा यांना श्रद्धांजली वाहिली आणि विशेषतः छठ महापर्व गीतांमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाची प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, संपूर्ण भारतासह बिहारमध्येही महत्त्वाच्या विकासात्मक उद्दिष्टांमध्ये मोठी प्रगती होत आहे. ते म्हणाले की, पूर्वीच्या काळात योजना आणि प्रकल्प फक्त कागदावर राहत असत, पण आज त्यांची वास्तवात यशस्वी पूर्तता होत आहे. "आम्ही विकसित भारताच्या दिशेने वेगाने आणि ठामपणे वाटचाल करत आहोत," असे उद्गार त्यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, आपली सध्याची पिढी विकसित भारताची साक्षीदार असण्यासोबतच, तिला या ध्येयासाठी योगदानही देता येत आहे, हे त्यांचे भाग्य आहे.

जनतेचे कल्याण आणि राष्ट्रसेवा यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना, पंतप्रधानांनी आजच्या सुमारे 12,000 कोटी रुपयांच्या रस्ते, रेल्वे आणि गॅस या पायाभूत सुविधा क्षेत्रातील विकास प्रकल्पांचा उल्लेख केला. याव्यतिरिक्त, दरभंगा एम्सचे (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे, ज्यामुळे बिहारच्या आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडून येईल. मिथिला, कोसी आणि तिरहुत भागांसोबतच पश्चिम बंगाल आणि जवळपासच्या प्रदेशांना तसेच नेपाळमधून येणाऱ्या रुग्णांनाही याचा फायदा होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी मिथिला, दरभंगा आणि संपूर्ण बिहारच्या जनतेचे आजच्या विकास प्रकल्पांसाठी अभिनंदन केले.

भारतातील सर्वाधिक लोकसंख्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांची आहे. या वर्गालाच आजारांचा सर्वाधिक फटका बसतो आणि उपचारांसाठी मोठा खर्च करावा लागतो, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. कुटुंबातील कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब किती विचलित होते, याची मला पूर्ण जाणीव आहे, असे  मोदी म्हणाले. ते म्हणाले की, पूर्वी रुग्णालये आणि डॉक्टरांची कमतरता, महागडी औषधे आणि अपुरे  निदान आणि संशोधन केंद्रे यामुळे वैद्यकीय पायाभूत सुविधांची परिस्थिती खूपच बिकट होती. देशाची प्रगती या कमकुवत आरोग्य पायाभूत सुविधांमुळे आणि गरिबांना होणाऱ्या अडचणींमुळे थांबली होती. त्यामुळे जुनी विचारसरणी आणि दृष्टिकोन बदलणे आवश्यक होते, असे त्यांनी नमूद केले.

आरोग्याबाबत सरकारने स्वीकारलेल्या सर्वांगीण दृष्टिकोनावर पंतप्रधानांनी जोर दिला आणि सरकारने लक्ष केंद्रीत केलेल्या पाच प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा स्पष्ट केली. ते म्हणाले की पहिले क्षेत्र आहे रोगांपासून प्रतिबंध, दुसरे आहे रोगांचे योग्य निदान, तिसरे आहे मोफत किंवा कमी किमतीत उपचार आणि औषधे उपलब्ध करणे, चौथे लहान शहरांमध्ये उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे, तर पाचवे आहे आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विस्तार करणे.

योग, आयुर्वेद, पौष्टिक मूल्य आणि तंदुरुस्त भारत  (फिट इंडिया) चळवळीवर सरकारचा असलेला विशेष भर यांचा पंतप्रधानांनी ठळकपणे उल्लेख केला. जंक फूड आणि घातक जीवनशैली ही सामान्य आजारांची मुख्य कारणे आहेत, याकडे लक्ष वेधून, त्यांनी,  स्वच्छता वाढून रोगांना वाव कमी राहील अशा स्वच्छ भारत, प्रत्येक घरात शौचालय आणि नळ जोडणी यांसारख्या अभियानांचाही उल्लेख केला. दरभंगा येथे मागील काही दिवसांपासून स्वच्छता मोहीम राबवल्याबद्दल आणि ही मोहीम अधिक बळकट केल्याबद्दल, मुख्य सचिव, त्यांचा चमू आणि राज्यातील नागरीकांच्या  प्रयत्नांची, त्यांनी प्रशंसा केली आणि ही मोहीम आणखी काही दिवस राबवण्याचे आवाहन केले.

अनेक रोगांची तीव्रता लवकर निदान झाल्यास कमी करता येते असे सांगत, मात्र, निदानाचे आणि तपासण्यांचे शुल्क जास्त असल्याने लोकांना आपल्याला काही झाले आहे हेच  कळत नव्हते असे त्यांनी नमूद केले. "आम्ही देशात 1.5  लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे सुरू केली आहेत," असे  मोदी म्हणाले, ज्यामुळे रोगांचे लवकर निदान होण्यास मदत होईल.

आजपर्यंत 4 कोटींहून अधिक रुग्णांवर आयुष्मान भारत योजने अंतर्गत उपचार झाले आहेत. ही योजना नसती, तर अनेक आजारी लोकांना रुग्णालयात भर्ती देखील होता आले नसते, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आयुष्मान भारत योजनेमुळे अनेक गरिबांच्या चिंता दूर झाल्या आहेत. या योजनेमुळे कोट्यवधी कुटुंबांचे सुमारे 1.25 लाख कोटी रुपये वाचले आहेत आणि त्यांच्यावर सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार झाले आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

निवडणुकीदरम्यान दिलेल्या, 70 वर्षांवरील नागरिकांना आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आणण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना पंतप्रधान म्हणाले, "ही हमी पूर्ण झाली आहे. कुटुंबाच्या उत्पन्नाचे निकष न लावता 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत उपचार सुरू झाले आहेत." सर्व लाभार्थ्यांकडे लवकरच आयुष्मान वय वंदना कार्ड असेल, असे त्यांनी सांगितले. अत्यंत कमी किमतीत औषधे देणाऱ्या जन औषधी केंद्रांचाही त्यांनी उल्लेख केला.

भारतात उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी लहान शहरांमध्ये उत्तम वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टर उपलब्ध करण्याच्या चौथ्या टप्प्यावर भर देताना पंतप्रधानांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर 60 वर्षे देशात केवळ एकच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे रुग्णालय (एम्स) होते  आणि पूर्वीच्या सरकारांच्या काळात नवीन एम्स स्थापन करण्याच्या योजना पूर्ण झाल्या नाहीत. ते म्हणाले की, आजच्या सरकारने केवळ आजारांवरच लक्ष केंद्रीत केले नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात नवीन एम्सची स्थापना केली आहे आणि त्यांची संख्या सुमारे 24 पर्यंत वाढवली आहे. गेल्या 10 वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली असून, अधिक डॉक्टर तयार होत आहेत. "दरभंगा एम्स मुळे, बिहार आणि देशाच्या सेवेसाठी अनेक नवीन डॉक्टर तयार होतील," असे ते म्हणाले. त्यांनी मातृभाषेत उच्च शिक्षण घेता येण्याच्या पर्यायाचाही उल्लेख केला आणि  कर्पुरी ठाकूर यांच्या स्वप्नांना वाहिलेली ही सर्वात मोठी आदरांजली आहे, असे सांगितले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या गेल्या 10 वर्षांत 1 लाख नवीन जागा वाढवल्या गेल्या असून, पुढील 5 वर्षांत आणखी 75,000 जागा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याचा पर्यायही तयार करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

कर्करोगाशी (कॅन्सर) लढण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर आपल्या भाषणात भर देताना, मुझफ्फरपूर येथे बांधल्या जात असलेल्या कॅन्सर रुग्णालयामुळे बिहारमधील कॅन्सर रुग्णांना मोठा लाभ होईल, असे  मोदी म्हणाले. एकाच ठिकाणी एकाच सुविधेत, कॅन्सर निदान आणि उपचारांच्या  विविध प्रकारच्या गरजा पूर्ण होतील आणि रुग्णांना दिल्ली किंवा मुंबईला जावे लागणार नाही, असे ते म्हणाले. बिहारमध्ये लवकरच नवीन नेत्र रुग्णालय उपलब्ध होणार असल्याची घोषणा करताना आपल्याला आनंद होत आहे, असे त्यांनी सांगितले. काशीमध्ये नुकत्याच उद्घाटन केलेल्या शंकर नेत्र रुग्णालयाप्रमाणेच बिहारमध्येही नेत्र रुग्णालयाच्या स्थापनेसाठी, आपण कांची कामकोटीच्या श्री शंकराचार्यांना विनंती केली होती आणि ते काम प्रगतीपथावर आहे, असे त्यांनी सांगितले.

सुशासनाचे ( उत्तम राज्यकारभार) मॉडेल (नमुना) विकसित केल्याबद्दल,  बिहारच्या मुख्यमंत्र्यांची,पंतप्रधानांनी  प्रशंसा केली. डबल इंजिन सरकार ( केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार) बिहारमध्ये जलद विकास साधण्यासाठी वचनबद्ध आहे आणि लहान शेतकरी तसेच उद्योगांना बळकट करण्याच्या कृती आराखड्यावर काम करत आहे, असे ते म्हणाले. पायाभूत सुविधांचा विकास, विमानतळ आणि दृतगती महामार्ग (एक्स्प्रेस वे) यामुळे बिहारची ओळख वाढत आहे. दरभंगा येथे नवीन विमानतळ विकसित झाल्याचे श्रेय,  त्यांनी उडान योजनेला दिले. आज उद्घाटन झालेल्या अन्य विकास प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला. यात  5,500 कोटी रुपयांचे एक्स्प्रेस वे आणि सुमारे  3,400 कोटी रुपयांचे शहरात नैसर्गिक वायू पुरवठा करणारे जाळे (सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन-सीजीडी नेटवर्क) यांचा समावेश आहे. "विकासाचा हा महायज्ञ, बिहारला नवीन उंचीवर घेऊन जात आहे," असे म्हणत,  रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

या भागातील शेतकरी, मखाणा उत्पादक आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास यांना सरकारचे सर्वोच्च प्राधान्य  आहे, असे त्यांनी सांगितले. मिथिला येथील शेतकऱ्यांसह बिहारमधील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत  25,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 'एक जिल्हा एक उत्पादन' (One District One Product) योजनेमुळे मखाणा उत्पादकांची प्रगती झाली आहे आणि मखाणा संशोधन केंद्राला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. "मखाणाला भौगोलिक ओळख मानांकन (जीआय टॅग) ही मिळाले आहे," असे त्यांनी नमूद केले. मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम मत्स्य संपदा योजनेचा लाभ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठा मासे निर्यातदार देश म्हणून भारताचा विकास करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, यावर त्यांनी जोर दिला.

कोसी आणि मिथिला भागात वारंवार येणाऱ्या पुरापासून लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बिहारमधील पुराचा सामना करण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात व्यापक योजनेची घोषणा करण्यात आली होती. नेपाळच्या सहकार्याने पुरावर तोडगा काढला जाईल आणि 11,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची संबंधित विकास कामे सुरू आहेत, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

"बिहार हे भारताच्या वारशाचे सर्वात मोठे केंद्र आहे," असे मोदी म्हणाले आणि या वारशाचे जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच सरकार "विकास भी, विरासत भी" (विकासही आणि वारसाही) या मंत्राचे पालन करत आहे, असे त्यांनी सांगितले. नालंदा विद्यापीठ आज आपला पूर्वीचा वैभवशाली इतिहास पुन्हा मिळवण्यासाठी वाटचाल करत आहे, यावर पंतप्रधानांनी जोर दिला.

भाषांच्या संवर्धनाची गरज अधोरेखित करताना, भगवान बुद्धाची शिकवण आणि बिहारचा गौरवशाली भूतकाळ शब्दबद्ध करणाऱ्या पाली भाषेला अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. याच सरकारने मैथिली भाषेला भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले, याची त्यांनी आठवण करून दिली. "झारखंडमध्ये मैथिलीला राज्याच्या दुसऱ्या भाषेचा दर्जा देण्यात आला आहे," असे त्यांनी पुढे सांगितले.

रामायण सर्किट (रामायणकालीन स्थळांचे प्रवासी जाळे) मध्ये जोडल्या गेलेल्या देशातील 12 हून अधिक शहरांपैकी दरभंगा एक आहे, ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळत आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. दरभंगा - सीतामढी - अयोध्या मार्गावरील अमृत भारत रेल्वे सेवेचा नागरिकांना मोठा फायदा झाला आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी दरभंगा संस्थानाचे महाराज श्री.  कामेश्वर सिंह जी यांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कामेश्वर सिंह यांचे समाजकार्य दरभंगाच्या अभिमानाचा विषय आहे आणि सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या चांगल्या कामाबाबत काशीमध्येही बोलले जाते, असे ते म्हणाले. भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी सांगितले की, राज्य आणि केंद्र सरकार लोकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन केले.

यावेळी बिहारचे राज्यपाल  राजेंद्र आर्लेकर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री  चिराग पासवान यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

प्रकल्पांची पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी, 1,260 कोटींहून अधिक खर्चाच्या दरभंगा एम्सची पायाभरणी केली. यात विशेषोपचार रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल)/आयुष विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, रात्र निवारा आणि निवासी सुविधांचा समावेश असेल. यामुळे बिहार आणि जवळपासच्या प्रदेशातील लोकांना तृतीयक (अत्याधुनिक प्रगत) आरोग्यसेवा सुविधा मिळतील.

या प्रकल्पांचा विशेष भर, रस्ता आणि रेल्वे क्षेत्रातील नव्या प्रकल्पांद्वारे या प्रदेशातील संपर्क व्यवस्था आणि दळणवळण वाढवण्यावर आहे. पंतप्रधानांनी बिहारमध्ये सुमारे 5,070 कोटी रुपयांच्या अनेक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

त्यांनी राष्ट्रीय महामार्ग -327E च्या गलगलिया-अररिया या चौपदरीकरण झालेल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा टप्पा, अररिया येथील पूर्व-पश्चिम पट्ट्यापासून (राष्ट्रीय महामार्ग-27)  शेजारच्या पश्चिम बंगाल राज्यातील गलगलियापर्यंत पर्यायी मार्ग उपलब्ध करेल. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग- 322 आणि राष्ट्रीय महामार्ग-31 वरील दोन रेल्वे उड्डाणपूलांचेही (RoB) उद्घाटन केले. जेहानाबाद आणि बिहारशरीफ यांना जोडणाऱ्या, बंधुगंज इथल्या राष्ट्रीय महामार्ग-110 वरील एका महत्त्वाच्या पुलाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.

राम नगर ते रोसेरा या दुपदरी रस्त्याचे बांधकाम, बिहार-पश्चिम बंगाल सीमा ते राष्ट्रीय महामार्ग-131A चा मनिहारी विभाग, हाजीपूर ते बछवारा- महनार आणि मोहिउद्दीन नगर मार्गे, सरवान-चकई विभाग यांसह आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. तसेच, राष्ट्रीय महामार्ग-327E वरील राणीगंज वळणरस्ता (बायपास); राष्ट्रीय महामार्ग-333A वरील कटोरिया, लखपुरा, बांका आणि पंजवारा वळणरस्ता; आणि राष्ट्रीय महामार्ग-82 ते राष्ट्रीय महामार्ग-33 पर्यंत चौपदरी जोड रस्त्याची (चार लेन लिंक रोड) पायाभरणी, त्यांनी केली.

पंतप्रधानांनी  1,740 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. त्यांनी बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील, 220 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या चिरलापोथू ते बाघा  बिशनपूर पर्यंतच्या सोननगर बायपास रेल्वे मार्गाची पायाभरणी केली.

त्यांनी 1,520 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांचेही लोकार्पण केले. यात झंझारपूर-लौकाहा बाजार रेल्वे विभागाचे गेज रूपांतरण (रेल्वेरुळांचे रुंदीकरण), दरभंगा जंक्शनवरील रेल्वे वाहतूक कोंडी कमी करणारा दरभंगा बायपास रेल्वे मार्ग, प्रादेशिक दळणवळण सुधारणारे रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

झंझारपूर-लौकाहा बाजार या टप्प्यात धावणाऱ्या रेल्वे सेवांना पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखवला. या विभागात मेमू (MEMU- लघू टप्प्यांसाठी धावणारी गाडी) रेल्वे सेवा सुरू झाल्याने जवळपासच्या शहरांमध्ये नोकरी, शिक्षण आणि आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतील .

पंतप्रधानांनी देशभरातील विविध रेल्वे स्थानकांवर 18 पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्रांचे लोकार्पण केले. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर, परवडणाऱ्या दरात औषधे मिळतील आणि जेनेरिक (ब्रॅन्डेड- उत्पादक नाम चिन्ह नसलेली) औषधांना प्रोत्साहन मिळेल.

पंतप्रधानांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील, 4,020 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक उपक्रमांची पायाभरणी केली. घराघरांमध्ये वाहिनीद्वारे नैसर्गिक वायू (PNG) पोहोचवण्याच्या आणि व्यावसायिक तसेच औद्योगिक क्षेत्रांना स्वच्छ ऊर्जा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत बिहारमधील दरभंगा, मधुबनी, सुपौल, सीतामढी आणि शिवहर या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये, शहर नैसर्गिक  वायू वितरण जाळ्याच्या (सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन-CGD नेटवर्क) विकासासाठी पंतप्रधानांनी पायाभरणी केली. त्यांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बरौनी तेल शुद्धीकरण प्रकल्पातील (रिफायनरी), डांबर (बिटुमेन) उत्पादन विभागाची पायाभरणी केली. यामुळे बिटुमेनचे उत्पादन, देशांतच होईल आणि  बिटुमेन आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

 

 

 

 

 

* * *

आशिष सांगळे/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2185886) Visitor Counter : 10