आदिवासी विकास मंत्रालय
देशभरातील एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये 1 ते 15 नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव वर्ष पंधरवडा’ साजरा करण्यात येणार
Posted On:
31 OCT 2025 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2025
राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था आणि आदिवासी कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ‘जनजातीय गौरव वर्ष पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी जननायक आणि थोर आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात ‘जनजातीय गौरव दिवस’ साजरा केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाने प्रेरित होऊन आदिवासी वीरांचा गौरव करण्याचा आणि आदिवासी युवकांना सक्षम बनवण्याचा संकल्प या पंधरवड्याच्या निमित्ताने घेण्यात आला आहे. देशभरातील एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांची परंपरा व गौरव सांगणारे सर्जनशील, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातील. या माध्यमातून भारताच्या विविधतेने नटलेल्या आदिवासी संस्कृती, कलेची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाईल. पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, अभिमान आणि जाणीव निर्माण व्हावी, यासाठी सर्व शाळांमध्ये पदयात्रा व विविध विषयांवर आधारित कार्यक्रम घेतले जातील. या पंधरवड्यात उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करणाऱ्या दोन शाळांचा विशेष सत्कार केला जाईल.
यावर्षी देशभरातील 497 एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील दीड लाखांहून अधिक विद्यार्थी या उत्सवात सहभागी होणार असून, आपल्या सांस्कृतिक परंपरा तसेच स्वातंत्र्यसैनिकांना आणि राष्ट्रीय अभिमानाला उजाळा देणार आहेत. या उपक्रमांद्वारे राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, ओळख आणि प्रेरणा चेतवण्याचा प्रयत्न करत असून भगवान बिरसा मुंडा यांच्या साहसी कार्याचा वारसा जपत ‘विकसित भारत’ घडवण्याचा विचार पुढे नेत आहे.
* * *
सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2184806)
Visitor Counter : 12