वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेला केले संबोधित
2030 पर्यंत 500 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके इलेक्ट्रॉनिक उत्पादन करण्याचे भारताचे लक्ष्य
भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातदार देश बनला आहे
Posted On:
29 OCT 2025 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे आयोजित मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी इलेक्ट्रॉनिक्स मूल्य साखळीत देशांतर्गत क्षमता वाढवण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी नमूद केले की, तयार उत्पादने आणि घटक यामध्ये अधिक स्वयंपूर्णता भारताच्या निर्यातीची गती कायम राखण्यासाठी आणि आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरेल.
दूरदर्शी धोरणात्मक उपक्रम, विक्रमी गुंतवणूक आणि जागतिक भागीदारी वाढवणारे उपक्रम यामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र अभूतपूर्व परिवर्तनाचा काळ पाहत आहे . 2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात 500 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला अनुसरून भारताने इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन, उत्पादन आणि निर्यातीसाठी एक विश्वासार्ह जागतिक केंद्र म्हणून झपाट्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
भारताची निर्यात कामगिरी उल्लेखनीय वाढ दर्शवत असून एप्रिल-सप्टेंबर 2025 दरम्यान एकूण इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 41.9% ने वाढून 22.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 15.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
युरोपियन संघ, ब्रिटन आणि ईएफटीए सोबत सुरू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींचा उद्देश भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांसाठी नवीन बाजारपेठ प्रवेशाच्या संधी खुल्या करणे आहे. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग उत्पादन योजना आणि उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना देशांतर्गत उत्पादनाची व्याप्ती वाढवत आहेत आणि आयात अवलंबित्व कमी करत आहेत.
वार्षिक सर्वसाधारण सभेत 2031 पर्यंत 180–200 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी इलेक्ट्रॉनिक्स निर्यात साध्य करण्याच्या भारताच्या मार्गदर्शक आराखड्यावर देखील चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये धोरण सातत्य, मजबूत पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा एकात्मता आणि सक्रिय उद्योग सहकार्याचे महत्त्व यावर भर देण्यात आला.
मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी सर्वोच्च निर्यात प्रोत्साहन संस्था म्हणून एमईडीईपीसी, उद्योग आणि सरकारी प्राधान्ये यांची सांगड घालण्यात मध्यवर्ती भूमिका बजावत आहे. धोरणातील अडथळे ओळखून, निर्यातदारांना पाठिंबा देऊन आणि उद्योगाच्या वाढीच्या दृष्टिकोनाला अनुरूप असे भारताची जागतिक स्पर्धात्मकता आणि निर्यात क्षमता मजबूत करणारे उपक्रम एमईडीईपीसी राबवत आहे.
एमईडीईपीसी बद्दल
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत स्थापन झालेली मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे निर्यात प्रोत्साहन परिषद (एमईडीईपीसी) भारतातील मोबाइल फोन, सुटे भाग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणारी सर्वोच्च संस्था म्हणून काम करते.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2184020)
Visitor Counter : 5