वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यासाठी परकीय अवलंबित्व कमी करण्याची आवश्‍यकता : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Posted On: 29 OCT 2025 8:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑक्‍टोबर 2025

 

भारताने स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करणे आणि महत्त्वाच्या माहितीसाठी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांवरील अवलंबित्व कमी करणे, आवश्यक असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज टायकॉन दिल्ली-एनसीआर (द इंडस आंत्रप्रेन्योर्स) परिषदेला संबोधित करत होते. भारताने स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करणे आणि महत्त्वाच्या माहितीसाठी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. "इंडियाज डीप टेक मोमेंट: फ्रॉम डिजिटल लीडरशिप टू टेक्नोलॉजिकल सॉव्हर्निटी", ही या परिषदेची संकल्पना होती. त्यांनी नमूद केले की, स्वदेशीची भावना म्हणजे केवळ भारतात बनवणे, रचना करणे अथवा सेवा देणे नसून, वाढत्या अनिश्चित जागतिक वातावरणात दीर्घकालीन विकास, सार्वभौमत्व आणि सुरक्षा सुनिश्चित करणे, ही आहे. गोयल म्हणाले की, भारताने एक राष्ट्र म्हणून जगाचे केवळ बॅंक ऑफिस किंवा सॉफ्टवेअर प्रदाता राहण्यापासून दूर जाऊन, भविष्यासाठी नवीन कल्पना, उत्पादने आणि तंत्रज्ञानाला चालना देणाऱ्या नवोन्मेशाचे जागतिक इंजिन म्हणून उदयाला येण्याचा संकल्प केला आहे.

गोयल यांनी अलीकडील जागतिक व्यत्ययांमधून जो त्रासदायक अनुभव आला, त्यावर  प्रकाश टाकला, आणि  लवचिक पुरवठा साखळी, स्वदेशी नवोन्मेश आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानावरील नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत, कोविड-19 साथीच्या आजारानंतरच्या काळात, सर्व देशांना महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये लवचिकता, स्वावलंबन आणि आवश्यक पुरवठ्यांवर नियंत्रण या गोष्टींचे महत्व समजले.  2014 मध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाची सुरुवात झाल्याचे नमूद करून, त्यांनी गेल्या दशकभरातील भारताच्या उल्लेखनीय डिजिटल परिवर्तनावर प्रकाश टाकला.

भारताचा डिजिटल प्रवास हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापासून, ते दोन वर्षांत तिसऱ्या स्थानावर पोहोचण्याच्या आणि 2047 पर्यंत 30-32 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. भारताच्या विकासाचा पाया तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या सामर्थ्यावर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले.

डीपटेक परिसंस्थेबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाची सविस्तर माहिती देताना गोयल म्हणाले की, डीपटेक मध्ये कृत्रिम प्रज्ञा, क्वांटम कॉम्प्युटिंग, मशीन लर्निंग, संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर मिशन आणि भारताच्या बौद्धिक संपदा परिसंस्थेचे बळकटीकरण, याचा समावेश आहे.

स्टार्टअप फंड ऑफ फंड्सच्या दुसर्‍या टप्प्यात प्रामुख्याने डीपटेक उपक्रमांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील गुंतवणूकीवर लक्ष केंद्रित करण्यात येईल, यामुळे नवोन्मेषींना मालकी हक्क टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करायला सहाय्य करण्यासाठी जोखीम भांडवल उपलब्ध होईल, असे त्यांनी घोषित केले.

भारताच्या सामूहिक क्षमतांचा वापर करण्यासाठी गुंतवणूकदार, स्टार्टअप्स, ‘टीआयई’ यासारख्या उद्योग संस्था आणि आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्कसारख्या संस्था यांच्यात सहकार्याचे आवाहन त्यांनी केले. भारताचा तांत्रिक पाया मजबूत करणाऱ्या कल्पनांचे सदैव स्वागत असल्याचे सांगून त्यांनी नवोन्मेषकांना सरकारचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला.

भारताला डीपटेक  नवोन्मेषाचे केंद्र बनवण्यासाठी आणि भविष्यातील तंत्रज्ञानाला आकार देण्यात आघाडीची भूमिका बजावण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्र काम करावे, असे आवाहन करून गोयल यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2183990) Visitor Counter : 6