निती आयोग
azadi ka amrit mahotsav

नीती आयोगाने ‘उत्पादन पुनर्कल्पना : प्रगत उत्पादनात जागतिक नेतृत्वासाठी भारताचा आराखडा’ याचे केले अनावरण

Posted On: 29 OCT 2025 5:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2025

नीती आयोगाच्या फ्रंटिअर टेक हबने आज उत्पादन पुनर्कल्पना : प्रगत उत्पादनात जागतिक नेतृत्वासाठी भारताचा आराखडा याचे अनावरण केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार, नीति आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम,  राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि मित्रा सीईओ प्रवीण परदेशी, नीति आयोगाच्या सदस्य देबजानी घोष; सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी आणि इतर मान्यवरांसह याचे अनावरण केले.

फ्रंटिअर टेक्नालॉजीज किंवा आघाडीचे तंत्रज्ञान म्हणजे वैज्ञानिक क्रांती घडवण्याची क्षमता असलेले उदयोन्मुख आणि अत्यंत वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी आणि भारताची निर्मिती स्पर्धात्मकता उंचावण्यासाठी क्षेत्र-केंद्रित मार्ग या रोडमॅपमध्ये मांडण्यात आला आहे. यात  कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग,ऍडव्हान्स्ड मटेरिअल्स, डिजिटल ट्विन्स आणि रोबोटिक्स यांची उच्च परिणाम घडवण्याची क्षमता ओळखण्यात आली असून 13 प्राधान्य निर्मिती क्षेत्रांमध्ये त्यांच्या प्रभावाचे संकल्पन करण्यात आले आहे. लक्ष्यीत हस्तक्षेपांसह भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात निर्मिती क्षेत्राचे 25% हून अधिक योगदान,  100 दशलक्षांहून अधिक रोजगार निर्मिती आणि वर्ष 2035 पर्यंत भारताला प्रगत निर्मितीसाठी आघाडीच्या तीन जागतिक केंद्रांमध्ये स्थान मिळवून देण्याची संकल्पना या रोडमॅपमध्ये असून विकसित भारत @2047च्या दिशेने हा महत्वाचा  टप्पा आहे. 

भारताची निर्मिती स्पर्धात्मकता मर्यादित करणाऱ्या सध्याच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी संशोधन आणि विकास परिसंस्था, औद्योगिक पायाभूत सुविधा, कार्यदल विकास आणि क्षेत्र-विशिष्ट मार्गांनी आघाडीच्या तंत्रज्ञानाचा विस्तारित वापर यांचे समन्वित बळकटीकरण करण्याची शिफारस 10 वर्षांच्या व्यापक हस्तक्षेपांच्या तपशीलवार धोरणात्मक रोडमॅपद्वारे केली गेली आहे.

उच्च प्रभाव क्षेत्रांमध्ये आघाडीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब देशाने केला नाही तर ऐतिहासिक संधीपासून मुकण्याचा धोका भारताला उद्भवून 2035 पर्यंत 270 अब्ज अमेरिकी डॉलर्स आणि 2047 पर्यंत 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सएवढे संभाव्य नुकसान अतिरिक्त निर्मिती क्षेत्र जीडीपीमध्ये होण्याची शक्यता आहे. 

"भारताच्या निर्मिती क्षेत्राच्या विकासासाठी आघाडीच्या तंत्रज्ञानावर आधारित हा दूरदर्शी रोडमॅप तयार केल्याबद्दल आणि या प्रवासाचे नेतृत्व करण्यासाठी पुण्याची निवड केल्याबद्दल महाराष्ट्र, नीती आयोगाचे आभार मानत आहे,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ''भारत नियमित व्यवसायातून तीव्र  वृद्धी साध्य करू शकत नाही,आघाडीचे तंत्रज्ञान हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम  आहे आणि त्यांचा एकत्रित वापर जेव्हा निर्मिती क्षेत्रात होतो तेव्हा त्यातून ऑटोमेशन, कार्यक्षमता आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना मिळते. राष्ट्रीय निर्मिती अभियानाशी पूर्णपणे संलग्न असणारे आणि प्रगत निर्मितीचे जागतिक केंद्र बनणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल,'' असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

"भारताची आर्थिक प्रगती आपल्या निर्मिती क्षेत्राच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे, मात्र टप्याटप्याने होणारे बदल पुरेसे नाहीत. हा आराखडा देशाला 2035 पर्यंत निर्मितीचे प्रगत शक्ती केंद्र होण्यासाठीचा निर्णायक, कालबद्ध मार्ग निश्चित करतो; हे करताना तो आपल्या निर्मितीविषयक प्रणालीत अचूकता,लवचिकपणा आणि टिकाऊपणा निर्माण करण्यासाठी आघाडीच्या तंत्रज्ञानांचा समावेश करून जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठरणारी “मेड इन इंडिया” ओळख निर्माण करतो," नीती आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुब्रमण्यम म्हणाले.

"आघाडीच्या तंत्रज्ञानांनी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या निर्मिती क्षेत्राचे अधुनिकीकरण केले पाहिजे," नीती आयोगाच्या प्रख्यात फेलो देबजानी घोष म्हणाल्या.

नीती आयोगाच्या आघाडीच्या तांत्रिक केंद्राने सीआयआय आणि डेलॉंईट कंपनीच्या सहकार्याने आणि उद्योग क्षेत्रातील धुरीणांच्या तज्ञ मंडळाच्या मार्गदर्शनासह “निर्मिती क्षेत्राची पुनर्परिकल्पना: आधुनिक निर्मिती क्षेत्रात जागतिक नेतृत्वासाठी भारताचा आराखडा” ही संकल्पना विकसित केली.

आराखडा मिळवण्यासाठी येथे क्लिक करा:

https://niti.gov.in/sites/default/files/2025-10/Reimagining_Manufacturing_Indias_Roadmap_to_Global_Leadership_in_Advanced_Manufacturing.pdf

नीती आयोगाच्या आघाडीच्या तांत्रिक केंद्राविषयी माहिती:

नीती आयोगाचे आघाडीचे तांत्रिक केंद्र हे  विकसित भारतासाठी कृती केंद्र  आहे. सरकार, उद्योग क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रातील 100 तज्ञांच्या सहयोगासह हे केंद्र परिवर्तनकारी वृद्धी तसेच सामाजिक विकास यासाठी आघाडीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून 20 हून अधिक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आगामी 10 वर्षांच्या आराखड्याला आकार देत आहे.  देशभरातील भागधारकांना सक्षम करून आणि सामुहिक कृतीला चलना देऊन, हे केंद्र त्वरित कृतीची तातडी जाणवून देत असून वर्ष 2047 पर्यंत समृध्द, लवचिक आणि तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत भारताच्या उभारणीसाठीचा पाया घालत आहे.

 
निलीमा चितळे/सोनाली काकडे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2183817) Visitor Counter : 18