नौवहन मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक 2025 चे केले उद्घाटन
"भारताचे सागरी सामर्थ्य सहकार आणि जागतिक भागीदारीमध्ये असून त्याची पाळेमुळे त्याच्या समृद्ध सागरी परंपरेत रुजलेली आहेत"-अमित शाह यांचे प्रतिपादन
"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सागरी विकासाचे नवे मापदंड प्रस्थापित करत आहे"- सर्बानंद सोनोवाल
Posted On:
27 OCT 2025 6:04PM by PIB Mumbai
मुंबई, 27 ऑक्टोबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया मेरिटाईम वीक-2025(आयएमडब्ल्यू) चे उद्घाटन केले ज्यामुळे जगातील सर्वात मोठ्या सागरी संमेलनाचा प्रारंभ झाला.

"महासागरांना एकत्र आणणारा ,सागरी दृष्टीकोन" या संकल्पने अंतर्गत आयोजित केलेल्या या पाच दिवसीय कार्यक्रमात सुमारे 85 देशांमधील 100,000 हून जास्त सहभागी एकत्र येत आहेत. ज्यामध्ये 500 प्रदर्शक, 350 वक्त्यांचा आणि 12 परिषदा आणि प्रदर्शनांचा समावेश आहे. आयएमडब्ल्यू 2025 मध्ये भारताच्या सागरी पुनरुत्थानाचे आणि 2047 पर्यंत देशाचे जागतिक सागरी नेतृत्वामध्ये रुपांतर करण्यासाठीच्या दृष्टीकोनाचे दर्शन घडवले जात आहे.
सागरी क्षेत्र भारताचे सामर्थ्य, स्थैर्य आणि शाश्वतता दर्शवते असे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले. हा क्षण भारताचा सागरी क्षण आहे जो गेट वे ऑफ इंडियाला गेट वे ऑफ वर्ल्डमध्ये रुपांतरित करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या सखोल संरचनात्मक सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत, त्याच्या आधारे भारत आता जगाच्या सागरी नकाशावर एक उदयोन्मुख ताकद म्हणून उभा आहे, असे गृहमंत्री म्हणाले.

भारताचे धोरणात्मक स्थान आणि विस्तीर्ण किनारपट्टी अद्वितीय सागरी लाभ प्रदान करते. आपली 11 हजार किलोमीटरहून अधिक लांबीची किनारपट्टी , 13 किनारपट्टीलगतची राज्ये आणि 23.7 लाख चौरस किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र भारताला नैसर्गिक सागरी शक्ती बनवितात. जीडीपीमध्ये सुमारे 60 टक्के योगदान आपल्या किनारी राज्यांचे आहे आणि सुमारे 80 कोटी लोकसंख्या आपल्या उपजीविकेसाठी समुद्रावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंद-प्रशांत क्षेत्रात भारताचे वाढते नेतृत्व अधोरेखित करत भारत आपले सागरी स्थान, लोकशाही स्थैर्य आणि नौदल क्षमतेद्वारे हिंद-प्रशांत आणि ग्लोबल साउथ दरम्यान एका सेतूची भूमिका बजावत विकास, सुरक्षा आणि पर्यावरणाच्या विकासाला गती देत असल्याचे शाह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘महासागर’ (म्हणजेच -म्युच्युअल अँड होलिस्टिक अॅडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अॅक्रॉस रिजन्स) या दृष्टीकोनाला अनुसरत देशाचे सागरी धोरण जागतिक सागरी केंद्र म्हणून भारताच्या भूमिकेला बळकटी देण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे यावर शाह यांनी भर दिला. भारताचे सागरी सामर्थ्य स्पर्धेमध्ये नव्हे तर सहकार्यामध्ये सामावले आहे. विकासाला चालना देण्यासोबतच निसर्गाशी समतोल राखणारे हरित सागरी भविष्य उभारणे हे भारताचे उद्दिष्ट आहे असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.
UIPT.jpeg)
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आयएमडब्ल्यू 2025 म्हणजे भारताच्या सागरी प्रवासातील एक अतिशय महत्त्वाचे वळण असल्याचे सांगितले. हे शिखर संमेलन धोरण सुधारणा, डिजिटल परिवर्तन आणि विक्रमी गुंतवणुकीद्वारे भारताला जगातील आघाडीच्या सागरी महासत्तांमध्ये समाविष्ट करण्याच्या सरकारच्या दृढनिश्चयावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
"भारत सध्या सागरी व्यापारापैकी सुमारे 10 टक्के व्यापाराची हाताळणी करतो आणि 2047 पर्यंत हे प्रमाण तिप्पट करण्याचे आमचे लक्ष्य आहे," ते म्हणाले. "बंदर क्षमतेत चौपट वाढ आणि जास्त खोलीच्या मेगा पोर्ट्सच्या विकासामुळे या ध्येयाला पाठबळ मिळेल,"असे त्यांनी सांगितले.
गेल्या दशकात भारताची बंदर क्षमता सुमारे दुप्पट होऊन 2,700 एमटीपीए झाली आहे, माल हाताळणी प्रमाण 1,640 एमएमटीपर्यंत वाढले आहे आणि अंतर्देशीय जलमार्गावरील मालवाहतूक 6.9 एमएमटी वरून 145 एमएमटीपेक्षा जास्त झाली आहे. भारतीय खलाशांची संख्या 200 टक्क्यांनी वाढून 3.2 लाख झाली आहे, अशी माहिती सोनोवाल यांनी दिली.
L017.jpeg)
पंतप्रधान मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत केवळ वेग कायम राखत नाही तर भारत नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे," असे सोनोवाल म्हणाले.
"इंडिया मेरिटाइम वीक 2025 हा जागतिक विश्वासाचा कौल आहे. 85 देशांचे प्रतिनिधित्व आणि 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या वचनबद्धतेमुळे, जग भारताला सागरी नेतृत्वातील पुढील मोठी शक्ती म्हणून ओळखत आहे," सोनोवाल यांनी पुढे सांगितले.
केंद्रीय बंदरे,नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित करताना, शाश्वतता,नवोन्मेष तसेच मनुष्यबळ विकासावर भारताने एकाग्र केलेले लक्ष अधोरेखित केले. “भारत उद्योगांना सक्षम करणाऱ्या, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या आणि भारताला जगाशी जोडणाऱ्या स्मार्ट, टिकाऊ आणि जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक सागरी परिसंस्थेची उभारणी करत आहे,” ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन दिनी, आज नवोन्मेष, शाश्वतता तसेच गुंतवणूक या विषयांवर केंद्रित मंत्रीस्तरीय परिषदा, द्विपक्षीय बैठका तसेच राज्य सरकारच्या नेतृत्वाखालील सत्रे यांचे आयोजन करण्यात आले. श्रीलंका, नेदरलँड्स आणि सौदी अरेबिया या देशांसोबत, जहाजबांधणी, हरित बंदरे आणि सागरी लॉजिस्टिक्स या क्षेत्रांतील सहकार्याचा शोध घेणाऱ्या, तीन द्विपक्षीय सत्रांचे आयोजन करण्यात आले.
भारतीय सागरी सप्ताह 2025 मधील पूर्ण सत्रात अँथनी स्मिथ ज्युनियर (अँटीग्वा आणि बर्बुडा), मॅग्डालीन दागोसेह(लायबेरिया), डॉ. अर्विन बूलेल(मॉरीशस), रॉबर्ट टाईमन(नेदरलँड्स), मरियन सिव्हर्टसेन नेस(नॉर्वे), अनुरा करुणाथीलाका(श्रीलंका), आँग क्याव तुन(म्यानमार), डॉ.रुमैह अल-रुमैह(सौदी अरेबिया) तसेच ली ह्यून(दक्षिण कोरिया) यांच्यासह जागतिक सागरी क्षेत्रातील अनेक प्रख्यात नेत्यांनी भाग घेतला. या नेत्यांनी जागतिक सहकार्य, शाश्वत नवोन्मेष तसेच लवचिक आणि समावेशक नील अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यातील सामायिक जबाबदारी या मुद्य्यांवर अधिक भर दिला.
दरम्यान, सागरी अर्थव्यवस्था आणि संपर्क जोडणी केंद्राने (सीएमईसी) जागतिक वित्तपुरवठादार, जहाज मालक आणि धोरणकर्त्यांच्या सहभागासह जहाज नोंदणी आणि वित्तपुरवठा या विषयांवर अमृत काल सत्रांचे आयोजन केले.
महाराष्ट्र, गुजरात, ओदिशा, गोवा तसेच अंदमान आणि निकोबार यांसह सागरी दृष्टीने समृद्ध असलेल्या अनेक राज्यांनी सागरी अमृत काल संकल्पना 2047 शी सुसंगत असलेले बंदर-प्रेरित औद्योगिक प्रकल्प, नील अर्थव्यवस्था उपक्रम तसेच सागरी समूहविकास प्रकल्प यांचे सादरीकरण केले.
मुंबईत जिओ कन्व्हेन्शन केंद्रात आयोजित “सागरमंथन: द ग्रेट ओशन्स डायलॉग्ज” हा कनेक्टीव्हिटी, शाश्वतता तसेच सागरी प्रशासन यांवर चर्चा करण्यासाठी राजकीय मुत्सद्दी, धोरणकर्ते आणि सागरी क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणणारा विचार-प्रवर्तक मंच आजच्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरला.
या उद्घाटन सोहोळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन सरन माझी यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच अनेक जागतिक प्रतिनिधी, विचारवंत, उद्योगक्षेत्रातील अग्रणी, ज्येष्ठ सरकारी अधिकारी आणि सागरी क्षेत्राचे अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते.
भारतीय सागरी सप्ताह 2025 हा कार्यक्रम 31 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असून त्यात 100 पेक्षा जास्त संकल्पनाधारित सत्रे, सीईओ गोलमेज बैठका तसेच मंत्रीस्तरीय चर्चा होणार आहेत. सामायिक सागरी आकांक्षांच्या माध्यमातून जागतिक भागीदारांना जोडणारा हा कार्यक्रम ‘वसुधैव कुटुंबकम – संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे’ या भारताच्या नागरी संस्कृती मूल्याला दुजोरा देतो.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183063)
Visitor Counter : 27