रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्गाचा वापर करणाऱ्यांसाठी मासिक आणि वार्षिक पास बद्दलची माहिती टोल नाक्यांवर करणार प्रदर्शित

Posted On: 24 OCT 2025 4:14PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय महामार्गाचा वापर करणाऱ्यांमध्ये स्थानिक मासिक पास आणि वार्षिक पास उपलबद्धतेविषयी पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपल्या  अखत्यारीत येणाऱ्या  राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर या पासची विस्तृत माहिती ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत. वापरकर्त्यांना स्थानिक मासिक पास आणि वार्षिक पासची उपलब्धता, दर आणि हे पास घेण्याच्या प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती देण्याचा यामागील उद्देश आहे.

ही माहिती सहज दिसेल अशा ठिकाणी  साइनबोर्डवर प्रदर्शित केली जाईलज्यामध्ये टोल नाक्याचा प्रवेशमार्ग, ग्राहक सेवा केंद्रे आणि प्रवेश/निर्गमन बिंदूंचा समावेश असेल. तसेच ही माहिती इंग्रजी, हिंदी आणि किंवा स्थानिक प्रादेशिक भाषांमध्ये साइनबोर्डवर लिहिली जाईल. हे फलक 30 दिवसांच्या आत टोलनाक्यांवर लावण्याचे निर्देश प्राधिकरणाने आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले असून लागू असलेल्या शुल्क नियमांनुसार दिवसा आणि रात्री सर्व साइन बोर्ड स्पष्टपणे दिसतील याची खात्री करावी अशा सूचना दिल्या आहेत. ही माहिती अधिक व्यापकपणे लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी राजमार्गयात्रा या मोबाईल अप्लिकेशन वर आणि संबंधित NHAI प्रकल्प संकेतस्थळावर  देखील अपलोड केली जाईल.

आपला प्रवास अधिक सुखकर आणि किफायतशीर व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे वापरकर्ते इतर विविध सवलत पासांचा लाभ देखील घेऊ शकतात. या पासमध्ये ‘स्थानिक मासिक पास’सुविधा समाविष्ट असून ज्या प्रवाशांची खाजगी वाहने आहेत आणि जे संबंधित टोल प्लाझाच्या 20 किमी (किंवा  लागू असेल ते ) परिसरात राहतात, त्यांना याचा लाभ घेता येऊ शकेल.  ‘स्थानिक मासिक पास’मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि निवासी पत्त्याचा पुरावा यांचा समावेश होतो. ही सर्व माहिती प्रत्येक टोल प्लाझावर स्पष्टपणे फलकांवर प्रदर्शित केली जाईल.

कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर हे मासिक पास टोलनाक्यांच्या मदतकक्षात वितरित केले जातील. त्याचप्रमाणे   ‘वार्षिक पास’ सुविधा केवळ कार, जीप आणि व्हॅनसारख्या खाजगी वाहनांसाठी लागू असेल. या पासची वैधता एक वर्ष किंवा 200 टोल प्लाझा पार करण्यांपर्यंत मर्यादित असते. वार्षिक पास, राजमार्गयात्रा ऍप वरुन विकत घेता येईल आणि 3,000 रुपयांचे एकवेळ शुल्क भरल्यानंतर वाहनाला लावलेल्या  वैध फास्टटॅगवरुन  डिजिटली कार्यरत करता येईल.  ‘वार्षिक पास’ देशभरातील सुमारे 1,150  टोल प्लाझा — राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर — वैध आहे. यामुळे खाजगी वाहनधारकांना अनेक मार्गांवर सुलभ आणि सवलतीचा प्रवास करता येतो.

टोल नाक्यांवर  ‘स्थानिक मासिक पास’ आणि ‘वार्षिक पास’ उपलब्धतेविषयीची माहिती स्पष्टपणे प्रदर्शित करण्यातून , प्रवास अधिक किफायतशीर करण्यासाठी,   देशभरातील टोल व्यवस्थापन अधिक पारदर्शक बनवण्यासाठी  आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठीच्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बांधिलकीचा प्रत्यय येतो.

***

निलिमा चितळे / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2182319) Visitor Counter : 17