संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जैसलमेरमधील लष्करी कमांडर परिषदेदरम्यान सुरक्षा परिस्थिती आणि लष्कराच्या सज्जतेचा घेतला आढावा, तनोट आणि लौंगेवाला इथल्या सीमावर्ती भागांनाही दिली भेट


शत्रूंना कधीही कमी न लेखण्याचे तसेच सदैव  सतर्क आणि सज्ज राहण्याचे संरक्षण मंत्र्यांचे सशस्त्र दलांना आवाहन

Posted On: 24 OCT 2025 4:25PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी जैसलमेरमधील लष्करी कमांडर परिषदेदरम्यान सुरक्षा परिस्थिती तसेच लष्कराच्या सज्जतेचा आढावा घेतला तसेच राजस्थानमधील तनोट आणि लौंगेवाला इथल्या सीमावर्ती भागाला भेट दिली, आणि. या परिषदेदरम्यान त्यांनी लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत  ग्रे झोन वॉरफेअर (छुप्या कारवायांचे युद्ध) तसेच संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि नवोन्मेष यासंदर्भातील मार्गदर्शक आराखड्याशी संबंधीत महत्त्वाच्या पैलूंवर सवीस्तर चर्चा करण्यात आली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, उप-लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह आणि सर्व लष्करी कमांडर यावेळी उपस्थित होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या परिषदेला संबोधित केले. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या लष्करी सामर्थ्याचे आणि राष्ट्रीय भूमिकेचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे ते म्हणाले. या मोहीमेदरम्यान भारताच्या जवानांनी आपले सामर्थ्य हे  केवळ शस्त्रांवर अवलंबून नसून, नैतिक शिस्तबद्धता आणि व्यूहात्मक स्पष्टता ही आपली ताकद असल्याचे दाखवून दिले असे ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरमुळे एक नवीन व्यूहरचनात्मक विचारसरणी उदयाला आली आहे. आता भारत कोणत्याही दहशतवादी कृत्याला स्वतःच्या अटीशर्तींवरच प्रत्युत्तर देऊ लागला आहे. हेच नव्या भारताचे संरक्षण धोरण असून, ते दृढनिश्चय आणि धैर्याचे प्रतिक असल्याचे ते म्हणाले. यावेळी राजनाथ सिंह यांनी देशाच्या एकात्मतेचे 24 तास संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. शत्रूंना कधीही कमी न लेखण्याचे तसेच कायम सतर्क आणि सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

भविष्याच्या दृष्टीने सज्ज लष्कराच्या सुनिश्चिततेसाठी, कमांडरांनी संरक्षण विषयक मुत्सद्देगिरी, आत्मनिर्भरता, माहितीशी संबंधित युद्ध, संरक्षण विषयक पायाभूत सुविधा आणि सैन्य दलाच्या आधुनिकीकरणावर भर द्यायला हवा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी भारतीय सशस्त्र दलांची निपुणता , धैर्य आणि लवचिकतेची प्रशंसाही केली. आपल्या सशस्त्र दलाला उच्च गुणवत्तेची सज्जता राखता यावी यासाठी त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि समर्थन पुरवण्याकरता सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही देखील त्यांनी पुन्हा एकदा दिली.

कलम 370 रद्द केल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि विकासाची सुनिश्चिती करण्यात भारतीय लष्कराने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचेही राजनाथ सिंह यांनी कौतुक  केले.

सैनिकांची  इच्छाशक्ती आणि शिस्तबद्धतेचेही त्यांनी कौतुक केले. यामुळेच भारतीय लष्कर हे जगातील कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या दलांमधले एक असल्याचे मानले जाते असे ते म्हणाले. आपले जवान आव्हानात्मक परिस्थिती आणि विविधांगी आव्हाने असतानाही, बदलांशी जुळवून घेतात आणि राष्ट्रीय सुरक्षेला अधिक बळकटी देतात असे ते म्हणाले.

आधुनिक युद्ध हे सायबरस्पेस, माहिती, इलेक्ट्रॉनिक व्यवस्थेत अडथळे निर्माण करणे आणि अंतराळ क्षेत्रातली  पकड आणि वर्चस्व या अदृश्य अशा पटलांवर लढले जात आहे, अशावेळी तंत्रज्ञानातील नव्या तांत्रिक प्रगतीशी  जुळवून घेण्यासोबतच, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, आणि इच्छाशक्ती महत्त्वाची असते ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी संरक्षण मंत्र्यांनी लौंगेवाला इथे भेट देऊन लौंगेवाला युद्ध स्थळावर पुष्पचक्र अर्पण करत, भारतीय लष्कराच्या शूरवीरांना आदरांजली वाहिली.

यावेळी त्यांनी भारतीय लष्कराचे शौर्य आणि लवचिकतेचे दर्शन घडवणाऱ्या तसेच राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक म्हणून विकसित केल्या जात असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावाही घेतला.

***

निलिमा चितळे / तुषार पवार / परशुराम कोर


(Release ID: 2182272) Visitor Counter : 10