वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरातील स्टार्टअप्सना दिल्या जाणाऱ्या आर्थिक आणि बिगर आर्थिक साहाय्याचा विस्तार करण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि कोटक महिंद्रा बँकेदरम्यान सामंजस्य करार

Posted On: 23 OCT 2025 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर  2025

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने देशभरातील स्टार्टअप्सना दिल्या जाणाऱ्या आर्थिक आणि बिगर आर्थिक साहाय्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने कोटक महिंद्रा बँक लिमिटेडसोबत एक सामंजस्य करार केला आहे.

स्टार्टअप्सना त्यांच्या गरजांना अनुकुल स्वरुपातील बँकिंग क्षेत्रातील सोयीसुविधा, कर्ज आणि निधी साहाय्यविषयक संधी, डिजिटल आणि देयकांशी संबंधित पायाभूत सुविधा, तसेच क्षमता निर्माण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यासाठी एक सर्वसमावेशक रूपरेषा तयार करणे, हा या धोरणात्मक सहकार्यपूर्ण भागीदारीचा उद्देश आहे. नवोन्मेषाधारित अर्थव्यवस्थेला चालना देत राहण्याच्या आणि भारताला जागतिक स्टार्टअप केंद्र बनण्याच्या वाटचालाली गती देण्याच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग वचनबद्ध असून, या भागीदारीमुळे या वचनबद्धतेलाही बळकटी मिळाली आहे.

या सामंजस्य करारांतर्गत, कोटक महिंद्रा बँकेद्वारा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सना  शून्य शिल्लकीचे चालू खाते, खेळते भांडवल आणि मुदत कर्ज, एपीआय आधारित बँकिंग मंच, डिजिटल देयक विषयक सोयीसुविधा आणि स्टार्टअप्सकरताची विशेष कार्डे यांसारख्या विविध समर्पित सेवा देणार आहे. यासोबतच स्टार्टअप्सना मार्गदर्शन, गुंतवणूक विषयक सल्ला, व्यवसाय वाढीसाठीचे सहाय्य आणि संपर्क जोडणी विस्तारासाठीचा मंच उपलब्ध करून देण्याकरताही बँकेद्वारा मदत दिली जाणार आहे. यामुळे स्टार्टअप्सना कल्पना मांडण्यापासून तिचा विस्तार करण्याच्या वाटचालीत मोठी मदत होणार आहे.

यावेळी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सहसचिव संजीव यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ही भागीदारीतून स्टार्टअप्सना त्यांच्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यासाठी सक्षम करू शकेल अशा, एका उत्साहपूर्ण आणि समावेशक नवोन्मेषी  परिसंस्थेच्या निर्मितीसाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग करत असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब उमटले असल्याचे त्यांनी सांगितले. धोरण, उद्योग आणि वित्त या तिन्ही घटकांच्या एकात्मिकीकरणातून उद्योजकीय महत्त्वाकांक्षा आणि शाश्वत परिणाम यांच्यातला दुवा अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट दोन्ही संस्थांनी समोर ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे भारतातील नवोन्मेषकांना स्वतःचा जागतिक पटलावर विस्तार करण्यासाठी योग्य साधने उपलब्ध होतील ही बाब  त्यांनी नमूद केली.

कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे अध्यक्ष राघवेंद्र सिंग यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. या सहकार्यपूर्ण भागीदारीमुळे गरजेनुसारच्या आर्थिक उपाययोजना, मार्गदर्शक कार्यक्रम आणि स्टार्टअप्सना त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी मदतीची ठरू शकेल अशा प्रकारची संपर्क व्यवस्था, या सगळ्याच्या माध्यमातून  स्टार्अप  समुदायासोबतचा संपर्कही वाढत जाईल असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे बँकिंग सेवा, सल्ला, तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने सक्षमीकरण, निधीची उपलब्धता आणि बाजारपेठेसोबतची जोडणी अशा सर्व आवश्यक घटकांचा अंतर्भाव असलेली एक बहुआयामी सहाय्यकारी व्यवस्था उभी राहू शकणार आहे. स्टार्टअप्सना त्यांच्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यासाठी, म्हणजेच  आपल्या उद्योग व्यवसाच्या प्राथमिक स्तरावरील कल्पनेपासून ते बाजारपेठेपर्यंतच्या विस्तारापर्यंतच्या टप्प्यासाठी सक्षम करता यावे, या हेतूनेच या उपक्रमाची आखणी केली गेली आहे.

या भागीदारीच्या निमित्ताने कोटकची महिंद्राची आर्थिक क्षेत्रातील तज्ञता, आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे धोरणात्मक नेतृत्व यांचा मिलाफ घडून येणार असून, त्यामुळे भारताला आत्मनिर्भर, नवोन्मेषाधारीत अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करणे शक्य होणार आहे.


शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2181920) Visitor Counter : 6