संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जपान-भारत सागरी सराव (जेएआयएमईएक्स) – 2025

Posted On: 22 OCT 2025 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2025

 

भारतीय नौदलाचे स्वदेशी बनावटीचे शिवालिक गटातील गाईडेड मिसाईल स्टील्थ फ्रिगेट जहाज आयएनएस सह्याद्री, 16 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीत जेएआयएमईएक्स-25 अर्थात जपान-भारत सागरी सरावाच्या सागरी टप्प्यात सहभागी झाले आणि 21 ऑक्टोबर रोजी जपानमधील योकोसुका  बंदरात दाखल झाले. 

योकोसुका बंदरात पोहोचण्याआधी, आयएनएस सह्याद्री आणि जपानच्या सागरी स्वसंरक्षण बल - जेएमएसडीएफची जहाजे असाही, ओउमी आणि पाणबुडी जिन्र्यु यांनी सागरी सरावात भाग घेतला.  या टप्प्यात प्रगत पाणबुडीविरोधी युद्ध सराव, क्षेपणास्त्र संरक्षण सराव, उड्डाण कार्ये आणि समुद्रातच इंधन भरणे यांचा समावेश होता. जेएआयएमईएक्स-25 भारत आणि जपान यांच्यातील 2014 मध्ये स्थापन झालेल्या 'विशेष रणनीतिक आणि जागतिक भागीदारी'ला अधोरेखित करते. ही भागीदारी हिंद-प्रशांत सागरी क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी एक महत्त्वाचा स्तंभ आहे. 

योकोसुका इथे बंदर टप्प्यात, आयएनएस सह्याद्री  आणि जेएमएसडीएफ च्या सहभागी तुकड्यांचे नौदल कर्मचारी विविध व्यावसायिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाग घेणार आहेत. यामध्ये एकमेकांच्या जहाजांना भेटी, संयुक्त कार्यात्मक नियोजन, सर्वोत्तम पद्धतींची देवाण-घेवाण आणि सौहार्द व एकतेसाठी एकत्रित योग सत्र यांचा समावेश आहे. ही बंदर भेट जहाजाच्या हिंद-प्रशांत मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 

2012 मध्ये कार्यान्वित झालेले आयएनएस सह्याद्री हे जहाज भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे आणि ‘आत्मनिर्भर भारत’ दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. हे बहुउद्देशीय स्टील्थ फ्रिगेट विविध मोहिमा, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सरावांमध्ये भाग घेत आहे. 

भारत आणि जपान यांच्यातील रणनीतिक भागीदारी दीर्घ काळापासून मजबूत असून, संरक्षण व सागरी सहकार्यावर तिचा विशेष भर आहे. भारतीय नौदल आणि जेएमएसडीएफ हे या भागीदारीच्या अग्रभागी असून, मुक्त, खुल्या व सर्वसमावेशक हिंद-प्रशांत क्षेत्राच्या सामायिक दृष्टिकोनाला अनुसरून कार्यरत आहेत.

   

 

* * *

माधुरी पांगे/रेश्‍मा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2181597) Visitor Counter : 22