विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
शिक्षकांसाठी भारतीय ज्ञान प्रणालीच्या संवाद आणि प्रसारावर आधारित क्षमता वृद्धी राष्ट्रीय कार्यशाळा
Posted On:
21 OCT 2025 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च (NIScPR) यांनी शिक्षकांसाठी ‘भारतीय ज्ञान प्रणालीच्या (IKS) संवाद आणि प्रसारावर आधारित क्षमता वृद्धी राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा ‘स्वस्तिक’ (SVASTIK- वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित सामाजिक पारंपारिक ज्ञान) या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आली. समाजापर्यंत वैज्ञानिकरित्या प्रमाणीत पारंपरिक ज्ञान पोहचवणे, हा स्वस्तिक उपक्रमाचा उद्देश आहे. भारतीय राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमीचा (INYAS) प्रमुख कार्यक्रम RuSETUp (ग्रामीण विज्ञान शिक्षण प्रशिक्षण उपयुक्तता कार्यक्रम) आणि रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठ (MDU) यांच्या संयुक्त विद्यमाने, 16 ऑक्टोबर 2025 रोजी रोहतक मधील महर्षी दयानंद विद्यापीठात ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत 75 वेगवेगळ्या संस्थांमधील 100 पेक्षा जास्त सहभागींनी नोंदणी केली आणि कार्यशाळेत सक्रियपणे भाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात महर्षी दयानंद विद्यापीठातील डॉ. सुरेंदर यादव यांच्या स्वागतपर भाषणाने झाली आणि त्यानंतर सीएसआयआर- एनआयएससीपीआर त्या संचालक डॉ. गीता वाणी रायसम यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत प्रास्ताविक भाषण केले. डॉ. रायसम यांनी उपस्थितांना ‘स्वास्तिक’ उपक्रमाची ओळख करून दिली तसेच प्रादेशिक संस्था आणि शिक्षकांपर्यंत आयकेएसचा प्रसार पोहोचवण्यासाठी सीएसआयआर-एनआयएससीपीआर, आयएनवायएस आणि एमडीयूच्या सहयोगी प्रयत्नांचे कौतुक केले.
या कार्यशाळेचे मुख्य पाहुणे तसेच डेहराडून येथील हिमालयीन पर्यावरण अभ्यास आणि संवर्धन संघटनेचे (हेस्को) संस्थापक, पद्मभूषण डॉ. अनिल पी. जोशी यांनी प्रेरणादायी भाषण दिले. "भारताचे माउंटन मॅन" म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. जोशी यांनी आपल्या भाषणात अर्थव्यवस्था, पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांवर प्रकाश टाकला. पारंपारिक भारतीय ज्ञान नेहमीच शाश्वतता आणि स्वावलंबनावर आधारित आहे यावर त्यांनी भर दिला. शिक्षकांनी भारताच्या स्थानिक पारंपरिक ज्ञानाच्या संदर्भात वैज्ञानिक शिक्षणाचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेचा समारोप एका परस्परसंवादी अभिप्राय आणि आभार प्रदर्शन सत्राने झाला, ज्यामधे शाळा आणि महाविद्यालयातील सहभागी सदस्यांनी समृद्ध अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समारोपाच्या भाषणात, सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. संध्या लक्ष्मणन यांनी सर्व मान्यवर, वक्ते आणि सहभागींचे सक्रिय सहभागाबद्दल आभार मानले.



माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2181234)
Visitor Counter : 8