राष्ट्रपती कार्यालय
आदि कर्मयोगी अभियानावरील राष्ट्रीय परिषदेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती
विकास हा निसर्गाशी सुसंगत असला पाहिजे, याचे स्मरण आदिवासी परंपरा आपल्याला करून देतात : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना, आपण देश आणि समाजाची खरी प्रगती समाजातील सर्व घटकांच्या विकासात असल्याचे भान जपायला हवे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
17 OCT 2025 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (17 ऑक्टोबर 2025) नवी दिल्ली येथे आयोजित आदि कर्मयोगी अभियान या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या राज्ये, जिल्हे, तालुके तसेच एकात्मिक आदिवासी विकास संस्थांना पुरस्कारही प्रदान केले गेले.

या परिषदेतून प्रशासन खऱ्या अर्थाने सहभागपूर्ण, सर्वसमावेशक आणि लोकसहभागाधारित बनवण्याचा राष्ट्रीय संकल्प दिसून येतो असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. प्रत्येक आदिवासी गाव आत्मनिर्भर आणि गौरवशाली गाव बनवण्याच्या परिवर्तनकारी दृष्टिकोनातून आदि कर्मयोगी अभियान सुरू करण्यात आले, असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी समुदायांची देशाच्या विकासाच्या वाटचालीतील सहभाग सुनिश्चिती करणे, तसेच सर्व आदिवासी भागांपर्यंत आणि लोकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आदिवासी लोकांच्या आणि देशाच्या विकासात आदिवासी कृती आराखडा महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामसभा आणि सामुदायिक नेतृत्वाअंतर्गत काम करत असलेल्या संस्थांना सक्षम करण्याच्या माध्यमातून आदि कर्मयोगी अभियानांतर्गत लोकसहभागाच्या भावनेला बळकटी दिली जात आहे असे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या अर्थपूर्ण सहभागामुळे राष्ट्रीय धोरणावर मोठा प्रभाव पडेल आणि योजनांची अधिक प्रभावीपणे आखणी करता येईल असे त्या म्हणाल्या.

आपले आदिवासी समुदाय देशाच्या सामाजिक सांस्कृतिक विविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आदिवासी परंपरा आपल्याला विकास हा निसर्गाशी सुसंगत असला पाहिजे याचे स्मरण करून देतात. अलिकडच्या वर्षांत सरकारने आदिवासी समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक ठोस पाऊले उचलली आहेत, असे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. आर्थिक मदत देण्यासोबतच शिक्षण, आरोग्य, रोजगार, तांत्रिक कौशल्ये आणि शासनामध्ये समान सहभागासाठी संधी उपलब्ध करून देणे हाच या प्रयत्नांचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
आदिवासी भागात सरकारने पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार केला असून, आदिवासी युवा वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवासी शाळा आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमही सुरू करण्यात आले आहेत, असे राष्ट्रपतींनी सांगितले. कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार योजनांमुळे पारंपरिक कला, हस्तकला आणि उद्योजकतेला नवी गती मिळाली असल्याचे त्या म्हणाल्या. या प्रयत्नांमुळे उपजीविकेच्या संधींसोबतच, आदिवासी समुदायातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरताही वाढली आहे असे त्यांनी सांगितले आणि याबद्दल आनंदही व्यक्त केला.

विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना, आपण देश आणि समाजाची खरी प्रगती समाजातील सर्व घटकांच्या विकासात असल्याचे भान जपले पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. सर्व नागरिक अर्थपूर्ण सहभाग नोंदवू शकतील आणि आपले स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी सक्षम असतील अशा प्रकारचा समाज घडवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा-
सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2180598)
Visitor Counter : 10